अमित पाटकर यांचा सरकारवर आरोप
काँग्रेसकडून 6 सप्टेंबरला टाउन हॉल
गोव्याचे भविष्य घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पूर्वप्राथमिक शिक्षकांना महिन्याला केवळ 5 हजार ते 10 हजार रुपये मानधन दिले जात असल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. पूर्वप्राथमिक शिक्षकांवर होत असलेला हा अन्याय दूर करून त्यांना योग्य मानधन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील अल्पसंख्याक विद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांनंतर आता पूर्वप्राथमिक शिक्षकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचा निर्णय पाटकर यांनी घेतला आहे. या शिक्षकांच्या समस्या व गाऱ्हाणी जाणून घेण्यासाठी येत्या 6 सप्टेंबर रोजी पणजी येथे विशेष टाउन हॉलचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
राज्यातील पूर्वप्राथमिक शिक्षकांना त्यांच्या कामाच्या तुलनेत अत्यल्प मानधन दिले जात असून त्यांच्या सेवेकडे सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सर्व पूर्वप्राथमिक शिक्षकांना गोवा शिक्षण नियमावलीच्या कक्षेत आणावे व त्यांना योग्य मानधन व आवश्यक सेवा-सुविधा द्याव्यात, अशी मागणी पाटकर यांनी केली.
शिक्षक दिनानंतर लगेचच, 6 सप्टेंबर रोजी पणजीत या टाउन हॉलचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पूर्वप्राथमिक शिक्षकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी लढा उभारण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल, असे पाटकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ॲड. अजय प्रभुगांवकर व पेलागिया रापोस उपस्थित होते.

