यापुढे पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवलेल्या उमेदवारांनाच सरकारी नोकरी मिळणार असून त्यासाठी भरती नियमांत आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत सांगितले. प्रश्नोत्तराच्या तासाला आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवणारी कितीतरी शैक्षणिक आस्थापने गोव्यात येत असून आठवी इयत्तेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना थेट दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होता येत असल्याचे आढळून आले असल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले. एकदा दहावी झाल्यानंतर हेच विद्यार्थी मग सदर विद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतात, तर काही जण यशवंतराव चव्हाण विद्यापीठ, इग्नू आदीतून पदवीची प्रमाणपत्रे मिळवतात. यातील बरेच विद्यार्थी वर्गांनाही जात नसतात. थेट जाऊन परीक्षा देऊन उत्तीर्ण होतात व नंतर सरकारी नोकरी मिळवतात असे डॉ. सावंत यांनी सभागृहाच्या नजरेत आणून दिले असता मुख्यमंत्री म्हणाले की, यापुढे पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवलेल्या उमेदवारांनाच सरकारी नोकरी मिळेल.
चांगल्या शैक्षणिक आस्थापनात पूर्णवेळाचा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी तसे करण्याचा विचार सरकारने चालवला असल्याचे पर्रीकर म्हणाले.
पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण न करता पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्या या बोगस असतात असे नव्हे, असे स्पष्ट करतानाच आठवी अथवा नववी इयत्तेत नापास झालेला विद्यार्थी जर थेट दहावीची परीक्षा देऊन नंतर पदवीप्रमाणपत्रेही मिळवित असेल तर अशा उमेदवारांना सरकारी नोकरी मिळू शकणार नसल्याचे पर्रीकर म्हणाले. अशा उमेदवारांना नोकर्या मिळाल्यास मेहनत करून शिकून पदवी मिळवलेल्या उमेदवारांवर अन्याय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे राज्यात विद्यापीठांची मान्यता नसलेल्या शैक्षणिक संस्थांना थारा दिला जाणार नसल्याचेही पर्रीकर यांनी स्पष्ट केले. यावेळी बोलताना विरोधी नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, राज्यात बोगस शैक्षणिक आस्थापनांचा सुळसुळाट आहे. ही आस्थापने गरीब विद्यार्थ्यांची फसवणूक करीत असल्याचे ते म्हणाले. त्यावर बोलताना अशा शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाईल असे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. सरकारी नोकर्या मिळवण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे घेऊन येणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी पर्रीकर यांनी दिला.

