– वरद सुधीर सबनीस
‘संवर्धन’ या आस्थापनाद्वारे इतिहास, संस्कृती, पुरातत्त्व या विषयांवर संशोधन व ऐतिहासिक वारशाचे संवर्धन केले जाते. अभ्यासक्रमापलीकडे जाऊन या विषयांकडे ज्ञानपिपासू युवकांची पावले वळावीत व पुरातत्त्वशास्त्रासारखा संशोधनपर विषय पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या पलीकडे सामान्य लोकांपर्यंत पोचावा, यासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कला आणि संस्कृती संचालनालय, गोवा सरकारच्या सहकार्याने ‘संस्कृती भवन’ पाटो- पणजी येथे दि. २५ ते २७ मे दरम्यान ही कार्यशाळा सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० या वेळेत संपन्न झाली.
कार्यशाळेचे स्वरूप
कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी युवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, इतिहास प्राध्यापक व संशोधक, पुरातत्त्वशास्त्राचे विद्यार्थी यांचा समावेश होता. सहभागी झालेल्यांना वयाची अट न ठेवल्यामुळे १८ ते ६५ वर्षे या वयोगटातील लोकांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला.
कला आणि संस्कृती खात्याने उपलब्ध करून दिलेल्या ‘लेक्चर हॉल’मध्ये साधारणतः १ तास वेळेची प्रत्येक दिवशी ५ व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. ‘पॉवर पॉइंट’ सादरीकरणावर आधारित असलेल्या प्रत्येक व्याख्यानानंतर सुमारे १५ मिनिटे चर्चा होत होती. व्याख्यानावर आधारित प्रश्न, शंका यांचे निरसन त्याच वेळी व्हावे हा त्यामागील हेतू होता.
कार्यशाळेचे मार्गदर्शक
सदर कार्यशाळेला व्याख्यान देण्यासाठी आलेले सर्व मार्गदर्शक हे पुरातत्त्वशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाशी संलग्न असलेले हे मार्गदर्शक व त्यांचा संपूर्ण चमू हा पुरातत्त्वशास्त्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारतभर कार्यरत आहे. त्या मार्गदर्शकांमध्ये खालील नावांचा समावेश होता.
डॉ. अभिजित दांडेकर
हे पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये ‘नाणकशास्त्र’ (र्छीाळीारींळली) आणि ‘पुराभिलेखशास्त्र’ (एळिसीरहिू) या विषयांचे व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. चौल, संझानसारख्या इतिहासकालीन बंदरे व बालाथलसारख्या इतिहासपूर्व स्थळांच्या उत्खननामध्ये सहभाग होता. कोकणच्या पुरातत्त्वशास्त्रीय अवशेषांवर ते सध्या संशोधन करीत आहेत.
डॉ. श्रीकांत प्रधान
हे नामवंत चित्रकार म्हणून सुप्रसिद्ध आहेतच, पण प्राचीन कलेचे अभ्यासक अशीदेखील त्यांची ख्याती आहे. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ते कार्यरत आहेत. अजिंठा, वेरुळ, अमरावती येथील चित्रशैली, शिल्पे यांवर त्यांचा गाढा अभ्यास आहे.
डॉ. श्रीकांत गणवीर
प्राचीन भारतीय मूर्तिशास्त्र, मंदिर स्थापत्यकला यांचे गाढे अभ्यासक म्हणूून श्रीकांत गणवीर प्रसिद्ध आहेत. सामाजिक-आर्थिक व धार्मिक इतिहास यांवर ते डेक्कन महाविद्यालयात व्याख्याने देतात. प्राचीन भारतीय गुंफा व त्यांचे महत्त्व यावर ते मोलाचे कार्य करीत आहेत.
डॉ. तेजस गर्गे
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण या केंद्र सरकारच्या खात्यामध्ये औरंगाबाद विभागात ते कार्यरत आहेत. अजिंठा, वेरुळ, दौलताबाद, बीबी का मकबरा यांसारख्या जगप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांवर ते कार्यरत आहेत. इतिहासपूर्व (झीेींे-हळीींेीळल) कालखंडातील अवशेषांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे.
डॉ. अखिलेश कुमार
‘शर्मा सेंटर फॉर हेरिटेज स्टडिज’ या बिगर सरकारी संस्थेमध्ये चेन्नई येथे कार्यरत आहेत. प्राग्ऐतिहासिक कालखंड (झीश-हळीींेीळल) हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. ‘अत्तीरामपक्कम्’ या भारतातील सर्वात जुने मानवी अस्तित्वाचे अवशेष असलेल्या स्थळाचा अभ्यास त्यांनी केला आहे. या पुरास्थलाचे संवर्धन करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.
डॉ. पंकज गोयल
पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातून पुराजीवशास्त्र (नेे-ईलहरशेश्रेसू) या विषयातून पी.एच्डी. पदवी घेतली आहे. सिंधुसंस्कृतीमध्ये सापडलेल्या जीवशास्त्रीय अवशेषांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. पुरातत्त्वशास्त्राशी संलग्न विज्ञानशाखांचा अभ्यास करून गतकाळचे परिपूर्ण चित्र कसे रेखाटता येईल यावर ते अभ्यास करतात.
सचिन जोशी
डेक्कन महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत. मध्ययुगीन पुरातत्त्वशास्त्र, किल्ले व त्यांचे बांधकाम हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत. विस्मृतीत गेलेल्या ५ किल्ल्यांचा शोध त्यांनी लावलेला आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील किल्ल्यांवर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.
डॉ. पार्थ चौहान
प्राग्ऐतिहासिक कालीन मानवी संस्कृती व त्यांचे अवशेष, जीवाश्मांचा अभ्यास यासाठी सुपरिचित असलेले डॉ. पार्थ हे नर्मदा खोर्यातील प्राचीन जैवअवशेषांवर संशोधन करीत आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, डेक्कन महाविद्यालयाशी संबंधित प्रकल्पांवर ते काम करतात. अहमदाबाद येथे ते वास्तव्यास आहेत.
अभिजित आंबेकर
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, ओल्ड गोवा येथे कार्यरत आहेत. गोव्याच्या पुरातत्त्वीय अवशेषांचा ते अभ्यास करतात. मध्ययुगीन युद्धकला हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. गोव्यातील तोफा यांवर त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
तोषवंत पधान
डेक्कन महाविद्यालयामध्ये संशोधन करीत असलेल्या तोषवंत यांनी पोर्तुगाल व स्पेनमध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. प्राग्ऐतिहासिक कालखंड त्यांचा विषय आहे. महानदी व जोंक (ओदीशा) येथील पुरावशेषांवर ते संशोधन करतात.
वरद सबनीस
डेक्कन महाविद्यालयात संशोधन करत असताना मुंबई विद्यापीठामध्ये अतिथी व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. गोव्यामध्ये वास्तव्यास असतात. गोव्याच्या ऐतिहासिक व पुरातत्त्वीय अवशेषांवर विशेष अभ्यास आहे.
कार्यशाळेतील विषय
१. पुरातत्त्वशास्त्र एक परिचय : वरद सबनीस
२. मानवी उत्क्रांती व प्राग्ऐतिहासिक कालखंड : डॉ. पार्थ चौहान
३. इतिहासपूर्व कालखंडाची ओळख : डॉ. तेजस गर्गे
४. इतिहासकालीन पुरावशेष : डॉ. अभिजित दांडेकर
५. पुरातत्त्वशास्त्र व विज्ञानशाखा : डॉ. पंकज गोयल
६. प्राग्ऐतिहासिक कलाविष्कार : तोषवंत पधान
७. मूर्तिशास्त्राची ओळख : डॉ. श्रीकांत गणवीर
८. प्राचीन भारतीय चित्रकला : डॉ. श्रीकांत प्रधान
९. गुंफा, वास्तू रचना : डॉ. श्रीकांत गणवीर
१०. मूर्तिकला- भारतीय परंपरा : डॉ. श्रीकांत प्रधान
११. मंदिर स्थापत्यशास्त्र : डॉ. श्रीकांत गणवीर
१२. संरक्षणात्मक स्थापत्यशास्त्र : सचिन जोशी
१३. पुराभिलेखशास्त्र- एक ओळख : डॉ. अभिजित दांडेकर
१४. नाणकशास्त्र- एक ओळख : डॉ. अभिजित दांडेकर
१५. पुरावशेष व विविध कायदे : अभिजित आंबेकर
१६. पुरावशेष व संवर्धन : डॉ. अखिलेश कुमार
१७. खुली चर्चा
दि. २५ मे रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक ‘संवर्धन’चे समन्वयक वरद सबनीस यांनी केले. सदर सत्रासाठी प्रमुख पाहुणे प्रा. राजेंद्र केरकर होते. मार्गदर्शक संघातील डॉ. अभिजित दांडेकर हेदेखील व्यासपीठावर होते.
डॉ. दांडेकर यांनी ‘संवर्धन’तर्फे आयोजित कार्यक्रम हा पुरातत्त्वशास्त्र जनतेपर्यंत नेण्यासाठी केलेला एक स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. प्रा. राजेंद्र केरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून गोव्यातील पुरातत्त्वीय अवशेषांची दयनीय स्थिती, त्यास कारणीभूत असलेली अनास्था व लोकाश्रय- राजाश्रयांचा अभाव याकडे लक्ष वेधले. खाण-व्यवसाय व त्यामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे ऐतिहासिक वारसा प्रभावित होत आहे. संस्कृती-पर्यावरण यांचे कालातीत असलेले नाते जपण्यासाठी व ते लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने ‘संवर्धन’ने आयोजित केलेली कार्यशाळा हा एक अभिनव उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रथम सत्र
१. पुरातत्त्वशास्त्र म्हणजे काय? : वरद सबनीस
मानवी गतकाळाचा अभ्यास करण्यासाठी पुरातत्त्वशास्त्र फार महत्त्वाचे योगदान देते. प्राचीन संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या किंवा त्या काळात वापरात असलेल्या भौतिक अवशेषांचा अभ्यास करून गतकाळ जाणून घेणे हे पुरातत्त्वशास्त्राचे काम आहे. हा विषय अनेक समाजशास्त्रीय विद्याशाखा, विज्ञानशाखा व त्यांच्या योगदानावर अवलंबून असतो. पुरातत्त्वीय अभ्यासाच्या दृष्टीने वापरण्यात येणार्या विविध सर्वेक्षण पद्धती, उत्खनने यावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. इतिहास व पुरातत्त्वशास्त्र यांचा एकमेकांशी असलेला पूरक संबंध याकडेदेखील लक्ष वेधले.
२. मानवी उत्क्रांती व प्राग्ऐतिहासिक कालखंड : पार्थ चौहान
आफ्रिकेपासून जगभर पसरलेल्या विविध मानवी प्रजाती व त्यांचे अवशेष यांवर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकताना त्यांनी जगभरात सापडलेल्या मानवी जीवाश्मांची छायाचित्रे दाखवली व मानवी उत्क्रांतीशी निगडीत अनेक पैलूंवर मार्गदर्शन केले. भारतामध्ये नर्मदा नदीच्या खोर्यात सापडलेले मानवी जीवाश्म व त्यानंतरच्या कालखंडातील मानवाची शारीरिक व सांस्कृतिक उत्क्रांती याकडे लक्ष वेधले. अश्मयुगीन मानवी संस्कृती, त्यांनी बनवलेल्या दगडी अवजारांची नावे, दगडी अवजारे बनविण्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत विकासाचे विविध टप्पे यावर विस्तृत भाष्य केले.
३. इतिहासपूर्व कालखंड : डॉ. तेजस गर्गे
प्राग्ऐतिहासिक काळ व ऐतिहासिक कालखंड यांना जोडणारा हा काळ आहे. याच काळात ग्रामीण संस्कृतीचा उदय व विकास झालेला दिसून येतो. याच कालखंडात भारतीय उपखंडामध्ये प्रथमतः नगरे विकसित झाली. सिंधू नदीच्या खोर्यातील हडप्पा, मोहेंजोदाडो, धोलाविरा, कालीबंगन येथील अवशेष, संशोधन, त्या काळातील जीवनपद्धती यांवर श्री. गर्गे यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. दख्खन परिसरात नांदणार्या सावाल्दा, जोर्वेसारख्या संस्कृतीचे इतिहासपूर्वकालीन अवशेष यांवरदेखील त्यांनी प्रकाश टाकला.
४. इतिहासकालीन पुरातत्त्वीय अवशेष : डॉ. अभिजित दांडेकर
लिखित साधनांच्या उपलब्धतेपासून इतिहासाची सुरुवात होते. म्हणूनच या कालखंडाच्या अभ्यासासाठी ‘लिपी’चा विकास झालेला असणे गरजेचे असते. भारताच्या संदर्भात ‘ब्राह्मी’ व ‘खरोष्टी’ या दोन प्राचीन लिपींचा विकास साधारणपणे इसवी सन पूर्व ३०० ते ४०० वर्षे या काळात झाला आणि तेव्हापासून भारताचा इतिहास सुरू होतो. त्यापूर्वीचा काळ हा इतिहासपूर्व काळ म्हणून समजला जातो.
भारतीय इतिहासाच्या सुरुवातीचा काळ हा नागरीकरणाचा काळ होता. अयोध्या, काशी, हस्तिनापूर, तक्षशिला यांसारखी नगरे या काळात उत्तर भारतात बहरली. भारताच्या पश्चिम किनार्यावरील बंदरे या काळात आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली होती. धर्म-संस्कृती, अर्थकारण या सर्व दृष्टीने हा काळ महत्त्वाचा आहे असे डॉ. दांडेकर म्हणाले.
५. पुरातत्त्वशास्त्र आणि विज्ञानशास्त्र : डॉ. पंकज गोयल
मानवी जीवनावर समाजशास्त्राचा जेवढा प्रभाव असतो त्याहूनही अधिक विज्ञानाचा असतो. विज्ञान क्षेत्रात घडणारे बदल व प्रगती यावर मानवाची वाटचाल घडत असते. म्हणूनच मानवी इतिहास जाणून घेताना विज्ञान शाखांचे योगदान महत्त्वाचे ठरते. उत्खननातून सापडलेले जैविक अवशेष व त्यांचा अभ्यास करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र व प्राणिशास्त्र, संगणक विज्ञान यांचे अतुलनीय योगदान असते. उत्खननात सापडलेल्या वस्तूंचे कालमापन करणे, प्राण्यांच्या हाडांचा अभ्यास करणे, यासारख्या अनेक अभ्यासप्रक्रियांमध्ये विज्ञान सहभागी असते.
६. प्राग्ऐतिहासिक कला : तोषवंत पधान
प्राग्ऐतिहासिक कालखंडामध्ये तेव्हा मानव अगदी एखाद्या जंगली स्वापदाप्रमाणे जीवन जगत होता, अगदी त्या काळापासून मानवाने आपले अनुभव चित्रांच्या माध्यमाने व्यक्त केले आहेत. पाटणे येथे शहामृगाच्या अंड्याच्या कवचावर केलेले नक्षीकाम, भीमबैठक येथे काढलेली प्रस्तरचित्रे, दक्षिण भारतातील- विशेषतः गोव्यातील पणसायमळ, म्हाऊस येथील प्रस्तरचित्रे यांचा त्यांनी छायाचित्रांसहित उल्लेख केला. आज आपल्या सभोवतालच्या अनेक विकसित कलांचा उगम हा प्राग्ऐतिहासिक कालखंडात झाल्याचे त्यांनी नमूद केले.
७. मूर्तिशास्त्र- एक ओळख : डॉ. श्रीकांत गणवीर
मंदिरे, गुंफा, चित्रे यांमध्ये आढळणारी देवी-देवतांची प्रतिमा यामागे अनेक वर्षांपूर्वीचे मूर्तिशास्त्र आहे. प्रत्येक मूर्ती कशी असावी, मूर्तीमधील विविध घटकांच्या लांबी-रुंदी-उंचीचे प्रमाण कसे असावे यांसारख्या विषयांवर सखोल अभ्यास आपल्या पूर्वजांनी केला होता. शंकराची-विष्णूची तसेच इतर देवी-देवतांच्या मूर्ती कशा कोराव्यात, त्यांची आयुधे कोणती याविषयीचे ज्ञान आपल्या पूर्वजांनी मूर्तिशास्त्राच्या रूपात विकसित केले होते.
८. प्राचीन भारतीय चित्रकला परंपरा : डॉ. श्रीकांत प्रधान
प्राग्ऐतिहासिक काळापासून सुरू झालेली परंपरा नंतरच्या ऐतिहासिक कालखंडामध्ये अधिकच बहरली. नानाविध विषय, वेगवेगळ्या रंगछटा, निरनिराळी माध्यमे वापरून चित्रकलेचा होत असलेला विकास डॉ. प्रधान यांनी आपल्या व्याख्यानातून उलगडवला. अजिंठा येथील चित्रशैली व त्यानंतरची मुघल चित्रशैली, काही स्थानीय चित्रशैली यांकडे त्यांनी विशेष लक्ष वेधले. चित्रशैलींच्या विकासाबरोबरच गोव्यामधील काही पोर्तुगीजकालीन तैलचित्रांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
९. प्राचीन भारतीय गुंफा व त्यांची रचना : डॉ. श्रीकांत गणवीर
लोमश ऋषी गुंफा ही भारतातली सर्वात पहिली गुंफा होय. बिहारमध्ये असलेल्या या गुंफेचे उत्खनन दगडात केलेले आहे, परंतु अशा प्रकारचे उत्खनन हे तत्कालीन लाकडी वास्तूंची नक्कल असल्याचे डॉ. गणवीर यांनी सांगितले. पश्चिम भारतात, विशेषतः सह्याद्रीच्या कातळामध्ये इसवी सनाच्या सुरुवातीच्या काही शतकांमध्ये ‘सातवाहन’ शासकांच्या मदतीने अनेक गुंफा खोदल्या गेल्या. डॉ. रणवीर यांनी भाजे, कार्ले, कोंदीवीटे यांसारख्या बौद्ध गुंफा, घारापुरीसारख्या हिंदू गुंफा यांचे सचित्र दर्शन घडविले.
१०. मूर्तिकला- एक आढावा : डॉ. श्रीकांत प्रधान
भारतामध्ये साधारणपणे इतिहासपूर्व काळापासून मूर्ती घडविण्याची प्रथा अस्तित्वात आहे. मातीच्या भाजलेल्या मूर्ती, दगडी मूर्ती व नंतरच्या काळातील धातुमूर्ती या सर्व अगदी आपल्या सामाजिक-धार्मिक विचारांचे प्रतिबिंब असल्याचे डॉ. प्रधान यांनी प्रतिपादन केले.
वेगवेगळ्या काळातील मूर्ती व त्यांचे विविध प्रकार याकडे श्री. प्रधान यांनी लक्ष वेधले. देशभरातील काही प्रसिद्ध मूर्तींचे छायाचित्रांसहित त्यांनी वर्णन केले.
११. मंदिर स्थापत्यशास्त्र- एक परिचय : डॉ. श्रीकांत गणवीर
कुषाण व गुप्त राजांच्या राजवटीपासून खर्या अर्थाने मंदिरांच्या स्थापत्याला सुरुवात झाली. साधारण इसवी सन दुसरे शतक ते ५-६ वे शतक हा काळ मंदिरांच्या बांधकामाच्या दृष्टीने महत्त्वाचा काळ आहे. नाचना, भुमरा, देवगड, सांची येथील मंदिरे ते कोणार्क, वेरुळसारखी विकसित स्थापत्यशैलीतील मंदिरे या प्रवासावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. स्थानिक स्थापत्यशैलीबरोबरच त्यांनी नागर, द्रविड, भूमिजसारख्या वास्तुपद्धतींवर प्रकाश टाकला.
१२. संरक्षणात्मक स्थापत्य पद्धती- एक आढावा : सचिन जोशी
अगदी अतिप्राचीन काळापासून मानवाने निसर्गाच्या विविध घटकांचा वापर करून जंगली प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक बांधकामाचा उपयोग केला असावा. त्यानंतरच्या कालखंडामध्ये सिंधुसंस्कृतीची अनेक शहरे तटबंदीयुक्त असल्याचे आढळून येतात. ऐतिहासिक कालखंडातील पाटलीपुत्रसारखे शहरदेखील संरक्षणात्मकदृष्ट्या सज्ज असे होते. मध्ययुगीन किल्ले, त्यांचे प्रकार यावर श्री. जोशी यांनी प्रकाश टाकताना गोव्यातील किल्ल्यांसंदर्भात विस्तृत माहिती दिली.
१३. पुराभिलेखशास्त्र- एक परिचय : डॉ. अभिजित दांडेकर
ब्राह्मी-खरोष्टीसारख्या लिपींचा उदय व विकास यामुळे आपला इतिहास आपल्या समोर ज्ञात स्वरूपात आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. या सत्रामध्ये त्यांनी ब्राह्मी लिपीची आद्याक्षरे ते देवनागरीची आजची लिपी हा प्रवास उलगडून दाखविला.
१४. नाणकशास्त्र- एक परिचय : डॉ. अभिजित दांडेकर
कवडी, गुंज यांसारख्या माध्यमातून इतिहासपूर्व काळात सामानाची देवाण-घेवाण होत असावी. इसवी सनाच्या पूर्वी ६०० वर्षांपासून आजतागायत नाणी अस्तित्वात असल्याचे पुरावे आहेत. सर्वात जुनी ज्ञात नाणी ही चांदीची आहेत व ती वेगवेगळ्या महाजनपदांनी काढली होती. धातूपासून बनवलेली नाणी ते कागदी चलन हा प्रवास डॉ. दांडेकरांनी उत्कृष्टरीत्या छायाचित्रांच्या माध्यमातून सादर केला.
१५. पुरातत्त्वीय अवशेष व विविध कायदे : अभिजित आंबेकर
‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ व ‘पुरातत्त्व विभाग : राज्य सरकार’ अशा दोन सरकारी संस्था देशभरातील विविध ऐतिहासिक व पुरावशेषांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. देशभरातील हजारो स्थळांच्या सुरक्षेसाठी व संवर्धनासाठी काही कायदे अस्तित्वात आहेत. त्यांमध्ये ‘एंशियंट मोन्युमेंट अँड आर्कियोलॉजिकल साइट्स अँड रिमेन्स ऍक्ट १९५८’, ‘आर्ट ट्रेझर ऍक्ट १९७२’सारख्या अधिनियमांचा समावेश होतो. श्री. आंबेकर यांनी सदर कायदे, त्यांचे अर्थ व व्याप्ती सोप्या भाषेत मांडली. एखाद्या व्यक्तीस ऐतिहासिक दस्तऐवज मिळाल्यास त्याने काय करावे यावरदेखील मार्गदर्शन केले.
१६. वारसा संवर्धन- आपली जबाबदारी : डॉ. अखिलेश कुमार
नेहमी असे पाहण्यात येते की मंदिरे, किल्ले, इतर वस्तू यांच्या संवर्धनासाठी अनेकजण धडपडत असतात, परंतु लक्षावधी वर्षांपासून मानवी खुणा जपणार्या कित्येक प्राग्ऐतिहासिक स्थळे संवर्धनापासून वंचित राहतात. अशा अश्मयुगीन मानवी वास्तव्याच्या खुणा असलेल्या स्थळांनादेखील सुरक्षा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाऊ शकतात हे त्यांनी पटवून दिले. ‘अत्तीरामपक्कम’ येथे त्यांनी स्वतः राबविलेली पद्धत डॉ. अखिलेश यांनी प्रशिक्षणार्थींसमोर सादर केली. ग्रामीण जनतेला सोबत घेऊन, विद्यार्थ्यांना, युवकांना प्रक्रियेत सामावून घेऊन इतिहास जपता येतो हे त्यांनी सोदाहरण दाखविले.
खुली चर्चा
या सत्रामध्ये कार्यशाळेस लाभलेले सर्व मार्गदर्शक व्यासपीठावर उपस्थित होते. प्रशिक्षणार्थींनी प्रश्न विचारावेत व त्यांचे निरसन कार्यशाळेतच व्हावे हा त्या मागील हेतू होता.
सावनी शेट्ये यांनी करिअरसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. दांडेकर यांनी प्रशासकीय सेवेचा उपयोग हा अनेक पुरातत्त्वसंशोधकांना गरजेचा असल्याने, विद्यार्थ्यांनी पुरातत्त्वशास्त्र शिकताना प्रशासकीय सेवेसाठीदेखील तयारी करावी असे सांगितले.
संजीव सरदेसाई यांच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. गर्गे यांनी गोवा विद्यापीठामध्ये पुरातत्त्वशास्त्र विभाग सुरू करण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले.
गोव्यातील काही तरुण मंडळी पुरातत्त्वशास्त्र हा विषय शिकत असल्याचे आढळून येते हा एक चांगला संकेत असल्याचे डॉ. गणवीर यांनी सांगितले.
समारोप
समारोपाच्या सत्राचे प्रमुख म्हणून डॉ. सीला त्रिपथी हे एनआयओचे पुरातत्त्वशास्त्रज्ञ हजर होते. त्यांच्या हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशस्तिपत्रे देण्यात आली. डॉ. सीला त्रिपथी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गोवा विद्यापीठात पुरातत्त्व विभाग सुरू होण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार केला व असे प्रयत्न झाल्यास मदतीसाठी एनआयओ तत्पर असल्याचे सांगितले.
गोवा राज्याचे पुरातत्त्व खाते संपूर्णतः निष्क्रिय बनल्याची परिस्थिती दुःखदायक असल्याचे वारंवार चर्चेस आले.
सदर उपक्रम हा ‘संवर्धन’ने केलेला स्तुत्य प्रयत्न आहे व हा अशा प्रकारचा आतापर्यंतचा पहिलाच उपक्रम असल्याचे डॉ. त्रिपथी म्हणाले.
त्यानंतर वरद सबनीस यांनी सर्वांचे आभार मानले. पुरातत्त्वशास्त्राच्या प्रसारासाठी, ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनासाठी एकत्र काम करूया असे आवाहन करून कार्यक्रमाची व कार्यशाळेची सांगता झाली.