पहलगाम हल्ल्याला सहा महिने होतात न होतात, तोच दहशतवादाने पुन्हा एकदा भारताचे दार ठोठावले आहे. सुदैवाने ह्यावेळी प्रत्यक्ष दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीच एका देशव्यापी कटकारस्थानाचा पर्दाफाश झाला. याचदरम्यान, काल दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील एका रस्त्यावर कारमध्ये स्फोट झाला असून, अद्याप कारण स्पष्ट झालेले नसले तरी यामागे दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. तत्पूर्वीच्या एका घटनाक्रमात, जम्मू काश्मीरमधील एका गावी स्थानिक दुकानदारांनी सुरक्षा यंत्रणांना मदत करू नये अशी धमकी देणारे एक पोस्टर लागले आणि ते लावणाऱ्याचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घेता घेता जम्मू काश्मीर पोलीस अनंतनागच्या सरकारी इस्पितळातील एका डॉक्टरपर्यंत पोहोचले. इस्पितळातील त्याच्या लॉकरमध्ये एके 47 रायफल सापडली आणि त्या तपासातून एकेक धागेदोरे जुळत गेले आणि एका फार मोठ्या, कदाचित देशव्यापी दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश होऊ शकला. दिल्लीजवळच्या फरिदाबादपर्यंत हे धागेदोरे पोहोचल्याचे आजवर आढळले आहे. फरिदाबादेतील एका डॉक्टरने भाड्याने घेतलेल्या घरात जवळजवळ तीन हजार किलो स्फोटके आणि एका वाहनात शस्त्रास्त्रे आढळून आली. एक ठळक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ह्या प्रकरणात आजवर अटक झालेले सगळे केवळ एका विशिष्ट धर्माचेच आहेत असे नव्हे, तर सगळे डॉक्टर आहेत. म्हणजेच ज्याला ‘व्हाईट कॉलर’ दहशतवाद म्हणता येईल असे हे प्रकरण आहे आणि म्हणूनच धक्कादायक आहे. हे जे तथाकथित ‘डॉक्टर’ आहेत, त्यापैकी काही चीनमधून डॉक्टरी पदवी घेतलेले आहेत, तर काही फरिदाबादेतील अल्पसंख्यकांच्या वैद्यकीय शिक्षणसंस्थेशी संबंधित आहेत. त्यामुळे हे खरोखरीचे डॉक्टर आहेत की आपल्या काळ्या कारवाया लपवण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला हा मुखवटा आहे हे तपासणे जरूरी आहे. भलत्या देशांमध्ये जाऊन स्वस्तातले उच्च शिक्षण पदरात पाडून घेणाऱ्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता तपासण्याची गरजही ह्यामुळे निर्माण झाली आहे. दहशतवादी कटाचे हे प्रकरण साधे नाही. ह्यासंदर्भात आता राष्ट्रीय तपास संस्थेने पुढील तपास करून ह्या कटाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचलेले आहेत हे शोधून काढावे लागेल. एकीकडे हा कट उघडकीस आलेला असतानाच दुसरीकडे गुजरात पोलिसांनी हैदराबादेत केलेल्या कारवाईत एरंडेलाच्या बियांपासून तेल काढल्यानंतर उरणाऱ्या मळीपासून तयार केले जाणारे एक जालीम विष बनवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अटक झाली आहे. अशा प्रकारचे चार लीटर रसायन त्याच्याकडे आढळले. शिवाय त्याचा संबंध थेट आयसिसशी असल्याचे तसेच त्याच्या साथीदारांनी काही शहरांतील फळबाजारांची पाहणी केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. ही तर अजून गंभीर बाब आहे. फळांमध्ये हे विषारी रसायन पसरून निष्पापांचे जीव घेण्याचे तर हे कटकारस्थान नव्हते ना हे शोधले जाणे जरूरी आहे. भारतातील फळफळावळीची विक्री ही विशिष्ट घटकांद्वारे केली जाते. त्यामुळे हे दहशतवादी त्यांचा गैरफायदा घेण्याची शक्यताही वाढते. दहशतवादी कृत्यांमध्ये अकल्पिततेला फार महत्त्व असते. कोणाच्या ध्यानीमनी नसलेल्या गोष्टींतून दहशतवादी कृत्य केले तर ते बहुधा यशस्वी होऊ शकते आणि त्यातून पसरणारी दहशत मोठी असते हे आजवरच्या सर्वांत मोठ्या दहशतवादी हल्ल्यांकडे पाहिले तर कळून चुकते. अमेरिकेच्या विश्व व्यापार केंद्रावर विमाने आदळवून झालेला हल्ला, मुंबईवरील समुद्रातून येऊन झालेला हल्ला, अशी ह्याची उदाहरणे आहेत. दहशतवादी हल्ल्याच्या आजवर घडलेल्या घटनांपेक्षा वेगळ्या माध्यमातून पुढील दहशतवादी हल्ला घडवण्याचा प्रयत्न ह्या भारतविरोधी शक्ती करतील हे उघड आहे. त्यामुळेच रासायनिक हल्ल्यासारख्या अपारंपरिक पद्धतीचा अवलंब होण्याची शक्यताही बळावते. त्यामुळे हे जे काय प्रकरण आहे, त्याच्याही मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ने पाकिस्तानला आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांना असा काही धडा शिकवला आहे की भारताची थेट कुरापत काढण्याची हिंमत पाकिस्तान किंवा त्या संघटना दाखवणार नाही. त्याऐवजी अशा अप्रत्यक्ष रीतीने भारताला हादरवून टाकणारा दहशतवादी हल्ला घडविण्याचे नियोजन मात्र त्यांनी जरूर चालवले असेल आणि दुर्दैवाने आपल्या देशात अशा अराष्ट्रीय प्रवृत्तीला साथ देणाऱ्यांचीही कमी नाही. सध्याच्या तपासात पकडले गेलेले सगळे भारतीय नागरिक आहेत. त्यामुळे भारतीयांच्याच मार्फत भारताला आतून हादरवण्याचे जर काही कटकारस्थान शिजले असेल तर त्याचा वेळीच पर्दाफाश झाला पाहिजे. त्यामुळे ह्या दोन्ही प्रकरणांचे धागेदोरे कुठे कुठे पोहोचतात त्याचा देशव्यापी शोध घेणे अत्यावश्यक आहे. गोव्यानेही ह्याबाबत गाफील राहून चालणार नाही. काल चिंबल आणि सांताक्रुझमध्ये झालेली छापेमारी ह्याच पार्श्वभूमीवर झालेली आहे. देशापुढील ह्या मोठ्या धोक्याबाबत आता सतर्कता नितांत गरजेची आहे.

