Home Featured पुन्हा कोरोना

पुन्हा कोरोना

0

कोरोनाच्या भयावह प्रकोपानंतर त्या सगळ्यातून बाहेर पडल्याचा मोकळा श्वास घेतलेल्या जगाचे दार पुन्हा एकवार कोरोनाने ठोठावले आहे. सिंगापूर आणि इतर देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळू लागल्याच्या वार्ता येत असतानाच आता आपल्या भारतातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीपासून केरळपर्यंत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ दिसून आली आहे. दिल्लीत गेल्या आठवड्यातच नवे शंभर रुग्ण मिळाले. महाराष्ट्रात 153 नवे रुग्ण मिळाले, तर केरळमध्ये 335 नवे रुग्ण मिळाले आहेत. ही वाढती संख्या पुन्हा एकदा ह्या महामारीच्या विळख्यात देश सापडणार का ही चिंता उत्पन्न करणारी निश्चित आहे. कोरोना ज्यावेळी नवीन होता, त्यावेळी त्याचा वाढता प्रसार आणि त्याचे जीवघेणे स्वरूप यामुळे प्रचंड दहशत सर्वत्र पसरली होती. मात्र, नंतर देशामध्ये सार्वत्रिक लसीकरण झाले आणि कोरोनाबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत बेफिकिरी निर्माण झाली. सार्वजनिक ठिकाणी कोणती काळजी घ्यायची, मास्क वापरणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, वेळीच डॉक्टरी उपचार घेणे वगैरे गोष्टींचा समाजाला विसर पडला आहे. त्यामुळेच ह्यावेळी जेव्हा पुन्हा नव्याने कोरोनाचा प्रसार होऊ लागला आहे, त्याचा झपाटा वाढलेला दिसतो, कारण जी खबरदारी पूर्वी घेतली जात असे, तिचा आता मागमूस दिसत नाही. आपले कोरोना लसीकरण झाले असल्याने आपल्याला आता कोरोनाचा धोका नाही अशा भ्रमात जर कोणी असेल तर त्याने त्यातून बाहेर येणेच हितकर राहील, कारण लसीकरणाचा प्रभाव केव्हाच संपलेला आहे. पुन्हा कोरोना येण्याची लक्षणे दिसली तेव्हा बूस्टर डोस देण्याची व्यवस्था सरकारने केली होती. त्या बूस्टर डोसचा प्रभावही एव्हाना ओसरलेला आहे. सध्या कोरोनाचा प्रसार जरी झपाट्याने होत असला आणि त्यामध्ये नवे दोन व्हेरियंट दिसून येत असले, तरी रुग्णांमधील लक्षणे सौम्य स्वरूपाची असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या तरी तशी चिंता करण्याजोगी स्थिती दिसत नाही. सर्दी, तापाच्या लक्षणांप्रमाणेच सौम्य लक्षणे असल्याने कोरोनाबाबत बेफिकिरीही अधिक संभवते. सध्या ह्यामुळेच रुग्णसंख्या वाढत चालली आहे. ठणठणीत प्रकृती असलेल्यांना कोरोना संसर्ग झाल्यास त्याचे गांभीर्य वाढत नसले, तरी ज्यांना रक्तदाब, मधुमेह, ह्रदयविकार ह्या आणि अशा इतर अनेक व्याधींचा आधीच विळखा आहे, अशांसाठी कोरोना धोकादायक ठरू शकतो हे यापूर्वीही आपण पाहिले आहे. त्यामुळे अशा रुग्णांनी अधिक खबरदारी घेणे हिताचे ठरेल. सध्या जो कोरोना फैलावतो आहे त्यामध्ये भारतात जेएन.1 हा व्हेरियंट सर्वांत प्रमुख आहे. मात्र, त्याचबरोबर एनबी.1.8.1 आणि एलएफ.7 हे दोन नवे व्हेरियंट आढळून आलेले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सध्या ह्या व्हेरियंटबाबत धोक्याचा इशारा दिलेला नाही. ते त्यांच्या ‘देखरेखीखाली’ आहेत. ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ किंवा ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ असा दर्जा ह्या व्हेरियंटना जागतिक आरोग्य संघटनेने अजून दिलेला नाही, ह्याचाच अर्थ असा की ह्या व्हेरियंटची बाधा कितपर्यंत होते, त्यातून रुग्ण दगावण्याची शक्यता असते का वगैरेंचा काहीही अभ्यास अद्याप झालेला नाही. कोरोनासारखा विषाणू जेव्हा संक्रमित होतो, तेव्हा त्याच्यामध्ये नानाविध रुपांतरणे होत असतात. जसजशी औषधे वापरली जातात, त्याप्रमाणे विषाणूही आपले रूप पालटत असतो. त्यामुळेच त्याचे नवनवे रूप म्हणजेच व्हेरियंट तयार होत असते. कोरोना नवा होता तेव्हा त्याबाबत भीतीचे वातावरण होते. डॉक्टरांना देखील अशा प्रकारच्या महामारीचा अनुभव नव्हता. मात्र, कोरोनाच्या आलेल्या लाटांनी अशा प्रकारच्या महामारीला सामोरे कसे जायचे याचा पुरेसा अनुभव वैद्यकीय क्षेत्राला आलेला आहे. लसींच्या बाबतीत पुरेसे संशोधनही झालेले आहे. त्यामुळे ह्यावेळची ही लाट विरून गेली तर ठीक, परंतु तिने गंभीर स्वरूप धारण केले तर तिचा सामना करण्याची सिद्धता आपल्या वैद्यकीय क्षेत्राला ठेवावी लागेल. आरोग्य खात्याचे कोरोनाच्या देशातील ह्या वाढत्या प्रसाराकडे लक्ष असेल अशी आशा आहे. रुग्णसंख्येतील संभाव्य वाढ लक्षात घेऊन इस्पितळांमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारासाठीची सोय नव्याने उपलब्ध करून द्यावी लागेल ह्या दृष्टीने पूर्वनियोजन गरजेचे असेल. हे संकट टळेल अशी आशा करूया, परंतु पुन्हा पूर्वीप्रमाणे गांभीर्य वाढले तर ह्या संकटाला तोंड देण्यात आरोग्य यंत्रणा कमी पडू नये ह्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाने डोके वर काढल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. परंतु त्यासंदर्भात बेफिकिरी दाखवली जाऊ नये एवढीच अपेक्षा आहे, कारण बेफिकिरी अशा महामारीमध्ये फार महाग पडू शकते. कोणी सांगावे, ही लाट येते आहे तशीच झटकन जाईलही!