पुनश्च हरि ओम्‌‍

0
6

पुढील वर्षी होणार असलेल्या तामीळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकवार अभाअद्रमुकशी हातमिळवणी केली आहे. तशी औपचारिक घोषणा अमित शहा यांच्या उपस्थितीत काल करण्यात आली. तामीळनाडूमध्ये माजी मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्याच नेतृत्वाखाली अभाअद्रमुक – भाजप युती आगामी विधानसभा निवडणूक लढवील आणि राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ह्या युतीचा चेहरा असतील, अशी घोषणा काल करण्यात आली आहे. भाजप आणि अभाअद्रमुक यांचे संबंध कसे वाजपेयींच्या काळापासूनचे आहेत, त्याचे गोडवे भाजप नेत्यांनी काल गायिले. मात्र, वाजपेयींचे सरकार पाडण्यास हाच अभाअद्रमुक कारणीभूत झाला होता आणि तेव्हा सरकार वाचवण्यासाठी भाजपने द्रमुकची मदत घेतली होती. मात्र, पुढे द्रमुकने भाजपची साथ सोडली आणि काँग्रेसचा हात पकडला तो आजतागायत कायम आहे. जयललितांच्या मृत्यूनंतर अभाअद्रमुकच्या चिंधड्या उडाल्या. ओ पनीरसेल्वन आणि ई. पलानीस्वामी यांच्यातील दोन गट पुरेसे नव्हते म्हणून की काय शशिकला यांचा नातलग टीटीव्ही दिनकरन याने आपला सवता सुभा स्थापन केला. ओ. पनीरसेल्वन आणि ई. पलानीस्वामी यांना एकत्र आणण्यासाठी स्वतः नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. अभाअद्रमुकशी भाजपने युती केली खरी, परंतु 2019 ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर 2021 मधील तामीळनाडू विधानसभा निवडणूक ह्या दोन्हींमध्ये ह्या युतीला सपाटून मार खावा लागला होता. तरीही ही युती कायम होती, मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले माजी आयपीएस अधिकारी के अन्नामलाई यांनी द्रमुकला सतत शिंगावर घ्यायला सुरूवात केल्याने हे संबंध बिघडले. अन्नामलाई यांनी तामीळनाडूमध्ये भाजपचे स्वबळ प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यासाठी सर्वच्या सर्व 234 विधानसभा मतदारसंघांमधून यात्रा काढली, द्रमुक आणि अभाअद्रमुक ह्या दोन्ही पक्षांच्या ‘द्रविडी’ भूमिकेवर त्यांनी त्यावेळी सतत कोरडे ओढले. अभाअद्रमुकसाठी वंदनीय असलेले सी. एन. अन्नादुराई आणि एम. जी. रामचंद्रन हे देखील अन्नामलाई यांच्या टीकेतून सुटले नव्हते. त्यामुळे शेवटी अभाअद्रमुकच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्यांनी भाजपची साथ सोडली होती. मात्र, आता पुढील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अभाअद्रमुकला पुन्हा जवळ केले आहे आणि त्यासाठी आपल्या वरील वादग्रस्त प्रदेशाध्यक्षाचा बळी दिला आहे. अन्नामलाई यांच्या जागी नयनार नागेंद्रन यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अन्नामलाई यांचा बळी देऊन भाजपने साकारलेली ही युती आगामी निवडणुकीत काही चमत्कार घडवू शकेल का हे पाहावे लागेल, कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ह्या युतीचा काहीही प्रभाव दिसला नाही. विधानसभा निवडणुकीत तर 234 पैकी ह्या युतीला अवघ्या 75 जागांवर समाधान मानावे लागले आणि त्यात 66 जागा अभाअद्रमुकच्या होत्या, तर चार जागा भाजपला मिळाल्या. याउलट द्रमुक काँग्रेस आघाडीने तेव्हा दणदणीत बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. द्रमुकला 133, तर काँग्रेसला 18 जागा मिळाल्या. द्रमुकचे एम. के. स्टालीन आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील आणि दोन्ही पक्षांतील संबंध भक्कम आहेत. काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी स्थापन झाली तेव्हा राहुल गांधींचा उल्लेख आपले बंधू असा स्टालीन यांनी केला होता. दक्षिणेच्या समता, सामाजिक न्याय, आदी विषयांना प्राधान्य असलेल्या द्रविडी राजकारणामध्ये द्रमुकने आपले भक्कम स्थान सध्या निर्माण केलेले आहे. त्याला हादरा द्यायचा असेल तर अभाअद्रमुक आणि भाजप यांनी एकत्र येणे आवश्यक आहे ह्याची जाणीव दोन्ही पक्षाच्या नेत्यांना होती. अन्नामलाई यांची बोचरी टीका हाच तेवढा अडसर होता. त्यामुळे त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाची मुदत संपताच त्यांना त्या पदावरून अलगद पायउतार करून भाजपने अभाअद्रमुकला पुन्हा सोबत घेतले आहे. हे करीत असताना मागच्या निवडणुकांतील अपयशाकडे कानाडोळा करून थेट 1998 मध्ये भाजप अभाअद्रमुक यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीखाली एकत्र येऊन तामीळनाडूतील 39 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या, त्याचे स्मरण काल अमित शहांनी करून दिले. पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यामध्ये आधी ह्या युतीचा कस लागणार आहे. भाजपचे हिंदुत्व दाक्षिणात्या मतदारांच्या पचनी अजूनही पडलेले नाही. परंतु अभाअद्रमुकच्या मदतीने भाजप तामीळनाडूत हातपाय पसरायचा पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न करून पाहणार आहे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली असा हा प्रयत्न असेल.