Home बातम्या पुनरूज्जीवन

पुनरूज्जीवन

0

गोव्यात कॉंग्रेस पक्षाला पुनरूज्जीवन देण्यासाठी नव्या नेतृत्वाकडे त्याची धुरा सोपविण्याचे सूतोवाच कॉंग्रेसचे महासचिव आणि गोवा प्रभारी दिग्विजयसिंह यांनी नुकतेच आपल्या गोवा भेटीत केले. पक्षाला पुनरूज्जीवन देणार याचाच अर्थ हा पक्ष सध्या गोव्यात तरी जवळजवळ मृतावस्थेला पोहोचला आहे, याचीच जणू ही अप्रत्यक्ष दिलेली कबुली आहे. पक्षाचे बडे बडे नेते असे काही मिठाच्या गुळण्या घेऊन बसले आहेत, की पक्षाचे अस्तित्व आहे की नाही असा जनतेला प्रश्न पडावा. ताम्हणकरांच्या नथीतून बेफाम तीर मारण्याचे सत्र जरी सुरू असले, तरी ज्यांना जबाबदार नेते म्हणता येईल अशी पक्षातील एकही व्यक्ती या सरकारविरुद्ध ‘ब्र’ काढायची हिंमत दाखवू शकत नाही हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. सुरवातीला या सरकारला शंभर दिवस होऊद्यात, मग बोलू असे म्हणून वेळ मारून नेली गेली, आता शंभर दिवस उलटून गेले तरीही कोणाचे तोंड उघडताना दिसत नाही. उलट सरकारविरुद्ध सरकारमधलेच काही असंतुष्ट घटक आपली नाराजी हळूहळू प्रकट करू लागल्याचे पाहायला मिळते आहे.

कॉंग्रेस नेत्यांच्या या हतबलतेमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा डागाळून गेली आहे एवढे जरी दिग्विजयसिंह यांना उमगले तरी पुरे. पक्षाला नवे नेतृत्व देण्याची बात त्यांनी केली आहे. पण नेतृत्व देणार कोणाला? अंतर्गत गटातटांचे राजकारण, नेत्यांच्या एकमेकांवरील लाथाळ्या, गेल्या निवडणुकीतील अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्यासाठी लागलेली अहमहमिका हे सगळे गोव्याच्या जनतेने पाहिले आहे. त्याचा मथितार्थ जाणला आहे. गेल्या निवडणुकीतील दारूण पराभवानंतर विदीर्ण झालेला कॉंग्रेस पक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरल्याचे दिसत नाही. सरकारविरुद्ध लढायचे तर आधी ठोस मुद्दे हाती पाहिजेत! कोणते मुद्दे हाती घ्यायचे त्याविषयी खुद्द कॉंग्रेस नेतृत्वामध्येच गोंधळ दिसतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मोपाच्या संदर्भातील देता येईल. मोपाबाबत कॉंग्रेसची नेमकी भूमिका काय आहे? मोपा हवा की नको? जर हवा असेल तर ‘मोपा नको, मोपा नको’ चा गजर करणारे दक्षिणेतील नेते कोणत्या नैतिक आधारावर कॉंग्रेसच्या या भूमिकेशी जवळीक साधणार? असाच गोंधळ खाणींच्या प्रश्नावरही आहे. कायदेशीर खाणी सुरू झाल्याच पाहिजेत, बेकायदेशीर खाणींना थारा मिळता कामा नये असे दिग्विजयसिंह म्हणाले. बेकायदेशीर खाणींना या भूमीमध्ये रुजवले कोणी? त्यांना अभयदान दिले कोणी? भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे. त्याला थारा देता कामा नये असेही दिग्विजयसिंह परवा गरजले. गेल्या सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची मासलेवाईक उदाहरणे बहुधा दिग्विजयसिंहांच्या डोळ्यांखालून गेली नसतील. त्यामुळे दिग्विजयसिंह यांची ही सारी वक्तव्ये वरवरची आणि ढोंगीपणाची वाटू लागतात. पक्ष बळकट करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा, परंतु त्यासाठी स्पष्ट आणि स्वच्छ भूमिका आवश्यक ठरते. विद्यमान सरकारमधील उणीदुणी सप्रमाण आणि प्रभावीरीतीने जनतेपुढे आणण्याचे कर्तव्य बजावणे आवश्यक ठरते. पण मिठाच्या गुळण्या घेऊन बसलेले जबाबदार नेते आणि लुंग्यासुंग्यांनी झाडलेल्या बेफाम दुगाण्या या परस्परविरोधी चित्रामुळे त्या टीकेला विश्वासार्हताच प्राप्त होऊ शकत नाही. पक्षाच्या भूमिकेवर अधिकृततेची मोहोर उठली पाहिजे. तरच तिला विश्वासार्हता प्राप्त होईल आणि जनता ती गांभीर्याने घेईल. पुनरूज्जीवनाची बात करणार्‍या या पक्षाच्या पारंपरिक मतपेढ्या आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपाला गेल्या निवडणुकीत यश मिळाले. त्या मधुर संबंधांत खो घालण्याची धडपड आता कॉंग्रेसला करावी लागेल. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन त्यासाठी मैदानात उतरावे लागेल. पण असे प्रश्न घेण्याची समज आधी नेत्यांपाशी असायला हवी आणि ते तडीस नेण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे धैर्यही! आपलाच डावा पाय खोड्यात अडकलेला आहे हे ठाऊक असलेली माणसे पुढे होणार कशी? विद्यमान सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही याचे संकेत आता आता मिळू लागले आहेत. आपली ईप्सिते साध्य झाली नाहीत की नाराजी निर्माण व्हायचीच. सरकार पाडण्यात आम्हाला स्वारस्य नाही असा आव दिग्विजयसिंह यांनी आणला असला तरी या बंडखोरांना चुचकारण्याच्या आणि अपक्षांना आकृष्ट करण्याच्या पडद्यामागच्या हालचाली कॉंग्रेसच्या गोटातून नक्कीच सुरू असतील. परंतु जनतेचा विश्वास कमावल्याखेरीज असल्या उचापती केल्या तर उद्या तिचा रोषच पत्करावा लागेल हे उघड आहे.