Home बातम्या पुणे स्फोटप्रकरणातील स्फोटके न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रवाना

पुणे स्फोटप्रकरणातील स्फोटके न्यायवैद्यक प्रयोगशाळेत रवाना

0

पुण्यातील स्फोटमालिकेनंतर पहाटे साडे तीन वाजता राष्ट्रीय सुरक्षा दल आणि केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी पोहोचले. ज्या नियोजनबद्ध पद्धतीने हे स्फोट घडवून आणले गेले ते पाहाता कोणता तरी गट त्यामागे असावा असा संशय बळावत असल्याचे गृहसचिवांनी सांगितले.

दरम्यान, या स्फोट प्रकरणी डेक्कन जिमखाना पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांचा दहशतवादविरोधी विभाग स्फोटाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करीत असून प्रारंभिक तपासात पोलिसांना काही बॉल बेअरिंग्ज, एक पावडर, एक चिकचिकीत स्वरूपाचा पदार्थ काही डिटोनेटर्स व सर्किट आढळून आले आहेत. ज्या दोन सायकलींमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले होते, त्या नव्याने विकत घेतल्याचे आढळून आल्याने स्फोटांबाबत अधिक गांभीर्य निर्माण झाले आहे. या स्फोटांत जखमी झालेल्या दयानंद पाटील याने आपल्याला स्फोटके असलेली पिशवी मिळाली तेव्हा ती उघडून पाहण्याच्या प्रयत्नात असताना स्फोट झाल्याचा दावा केला आहे. घटनास्थळाजवळच भ्रष्टाचारविरोधी भारतच्या सदस्यांची भाषणे सुरू होती. आपल्या कानावर ते भाषण गेल्याने आपण ते ऐकत उभे राहिलो असता आपल्याला त्या पिशव्या आढळल्या. त्यात काय आहे हे उघडून पाहण्याचा प्रयत्न केला असता स्फोट झाला असे दयानंद पाटील याने पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी पुण्यातील सायकल विक्रीच्या दुकानदारांकडे त्या दोन सायकलींसंदर्भात चौकशी चालवली आहे. या स्फोटामागे दहशतवादी शक्ती आहेत की आणखी एखादा गट आहे, त्याचा तपास केला जाईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काल सांगितले.