पुढच्यास ठेच…

0
207

आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणमजवळच्या व्यंकटपुरम गावी काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास झालेल्या वायूदुर्घटनेने भोपाळमधील युनियन कार्बाईड वायुदुर्घटनेच्या कटु आठवणी ताज्या केल्या आहेत. व्यंकटपुरमच्या एल जी पॉलिमर लि. या कारखान्यातून ही वायूगळती झाली, तेव्हा आजूबाजूच्या निवासी वसाहतींमधील लोक गाढ निद्रेत होते. काय झाले हे कळायच्या आतच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. गुदरमलेले लोक घराबाहेर पडले. बायका, मुले, वृद्ध सैरावैरा पळू लागले. कित्येक जण रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या स्थितीत नंतर आढळून आले. सैरावैरा पळताना, रुग्णवाहिकांच्या प्रतीक्षेत असताना भेदरून, बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेल्या मुलांची, स्त्रियांची, वृद्धांची दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील ती दृश्ये काळीज पिळवटून टाकणारी आहेत. आधीच कोरोनाने भयग्रस्त झालेल्या जनतेसाठी ही वायूदुर्घटना म्हणजे दुष्काळात तेरावा ठरला तर नवल नाही. प्रशासनाने शेजारच्या वसाहतींमधून लोकांना बाहेर काढून इस्पितळात दाखल केले. या वायू दुर्घटनेची बाधा कारखान्याच्या परिसरातील किमान पाच गावांत झाल्याचे दिसते आहे. मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढतो आहे.
अशा विषारी वायूचा परिणाम हा केवळ तात्कालिक नसतो, तर तो दीर्घकालीकही असतो हे विसरून चालणार नाही. भोपाळमध्ये ८४ साली वायूदुर्घटना झाली, त्यातून जे लोक बचावले, ते देखील त्याचे दुष्परिणाम पुढील कितीतरी वर्षे भोगत आले. गरोदर स्त्रियांची मुलेदेखील अपंग निपजली. युनियन कार्बाईडच्या त्या दुर्घटनेला जबाबदार असलेल्यांना अनेक वर्षांनंतर अत्यंत मामुली शिक्षा झाली. ते जामिनावर सुटले. कंपनीचा सीईओ वॉरन अँडरसन मात्र नामानिराळाच राहिला. एल जी पॉलिमरच्या बाबतीतही काही वेगळे घडेल असे दिसत नाही. ही कोरियन कंपनी आहे आणि अर्थातच, अशा बड्या कंपन्यांचे राजकीय हितसंबंध पक्के असतात.
व्यंकटपुरमच्या दुर्घटनेने दोन वर्षांपूर्वी वास्कोत झालेली अमोनिया गॅस गळती आठवा. मुरगाव बंदरातून झुआरी खत कारखान्याला अमोनिया घेऊन जाणारा एक टँकर तेव्हा असाच मध्यरात्री अडीचच्या सुमारास उलटला होता. वायूगळतीचा त्रास होऊ लागल्याने रातोरात चिखलीच्या ग्रामस्थांना स्थलांतरित करावे लागले होते. सुदैवाने त्यामध्ये मोठी प्राणहानी झाली नाही, परंतु गोव्याला एक धडा मिळाला. व्यंकटपुरमच्या दुर्घटनेने ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ या उक्तीनुसार आता गोवा सरकारनेही शहाणे होणे जरूरीचे आहे.
व्यंकटपुरमच्या कारखान्यातून गळती झालेला वायू स्टिरीन आहे. या कारखान्यात पॉलिस्टिरीन बनते, ज्याचा वापर प्लास्टिकची उपकरणे आणि खेळणी बनवण्यासाठी होत असतो. भोपाळच्या युनियन कार्बाईडमधून गळती झालेला वायू हा त्याहून घातक म्हणजे मिथाईल आयसोसायनेट किंवा एमआयसी हा होता. त्या दुर्घटनेत तेव्हा साडे तीन हजारांवर लोक मृत्युमुखी पडले होते. जवळजवळ सहा लाख लोकांना त्या वायूचे दुष्परिणाम भोगावे लागले. वास्कोतील टँकर दुर्घटनेत नुसता अमोनिया वातावरणात पसरला, तरी त्यातून आजूबाजूच्या लोकांना श्वास घ्यायला त्रास झाला होता. गोव्यामध्ये अशा प्रकारच्या विषारी वायूचा वापर करणारे अनेक कारखाने आहेत. काही तर फार मोठे आहेत. तेथे एखादी दुर्घटना घडली, तर त्याचा दुष्परिणाम आजूबाजूच्या बर्‍याच मोठ्या भागावर होऊ शकतो.
खोर्ली – जुने गोवे येथील अशाच एका कारखान्यात दरवर्षी केवळ एक उपचार म्हणून गाव खाली करण्याचा भोंगा वाजवला जातो. त्याच्या आधी कायद्यानुसार वर्तमानपत्रांत त्याची जाहिरात दिली जाते. वर्षानुवर्षे हा उपचार केला जात असल्याने त्याचे गांभीर्य नागरिकांनाही नाही आणि प्रशासनालाही नाही अशी परिस्थिती आहे. पण खरोखरच अशा एखाद्या रासायनिक कारखान्यामध्ये वायूगळती झाली तर? अशा मोठ्या दुर्घटनेला सामोरे जाण्यासाठी आपल्यापाशी काय तयारी आहे त्याचा आढावा सरकारने घेणे आवश्यक आहे.
अशा दुर्घटना काही पूर्वसूचना देऊन होत नसतात. कधी प्रसंग ओढवला तर त्याला सामोरे कसे जायचे, त्यासाठी कोणती उपकरणे लागतील, अत्यंत वेगवान पद्धतीने गाव खाली करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, उपचारांची कोणती व्यवस्था करावी लागेल वगैरे सर्व बाबींचा विचार करून ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाजवळ आपत्ती निवारण योजना असते, परंतु अशा योजना निव्वळ कागदोपत्रीच असतात. प्रत्यक्ष जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या योजनेचा बोजवारा कसा उडतो हे गोव्याने अनेकदा अनुभवले आहे. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या वेळी नागरिकांचे स्थलांतर आणि पुनर्वसन करताना प्रशासनाची दाणादाण उडाली होती.
गोव्यातील बहुतेक औद्योगिक वसाहतींच्या आणि इतर कारखान्यांच्या नजीकच्या परिसरात लोकवस्ती आहे. बहुतेक भाग हा समतल, पठारी प्रदेश आहे. त्यामुळे अशा एखाद्या कारखान्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायूगळती झाली, तर समुद्रावरून भणाणत येणार्‍या वार्‍यासरशी हा वायू आजूबाजूच्या गावांत पसरायला काही मिनिटे पुरेशी असतील. अशा प्रकारच्या दुर्घटनेला सामोरे जाण्याएवढी तत्परता आपल्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये अजिबात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या औद्योगिक दुर्घटनांची संभाव्यता न नाकारता सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील घातक वायूचा वापर करणार्‍या कारखान्यांचे सर्वेक्षण, त्यातून यदाकदाचित वायूगळती झालीच तर त्याचा परिणाम कुठवर आणि किती होईल याचा अभ्यास, अशा आपत्तींना सामोरे जाण्याची आपत्कालीन व्यवस्था काय असेल त्याचे नियोजन, स्थलांतर आणि पुनर्वसनासाठी संभाव्य ठिकाणे ह्या सगळ्या गोष्टींचा अहवाल बनवणे आणि काही त्रुटी असतील तर त्या दूर करणे आवश्यक आहे. गोव्यामध्ये लोकसंख्या घनता इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे एखादी मोठी वायूदुर्घटना घडली तर ती गोव्यासाठी फार घातक आणि भयावह ठरू शकते. एखाद्या दुर्घटनेनंतर एनडीआरएफची वाट पाहात मोलाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा राज्य सरकारची सुसज्जता असेल तर अशा दुर्घटनांचा परिणाम कमी करता येऊ शकतो. आपल्याकडे असे काही होणारच नाही अशी निर्धास्तता महाग पडू शकते!