अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यातील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर आपल्या ब्लॉगमधून नुकताच अण्णांनी केजरीवालांवर निर्णायक बॉम्बगोळा फेकला. त्यांचे नाव न घेता त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेमुळेच ‘टीम अण्णा’ फुटली हे तर अण्णांनी स्वतः स्पष्टपणे सांगितलेच, परंतु त्याचबरोबर केजरीवाल कंपूकडून आपल्या नावाचा आणि आंदोलनाचा यापुढे गैरवापर केला जाऊ शकतो, त्यामुळे त्यासंदर्भात सावध राहा असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात गोळा झालेला सगळा पैसा केजरीवाल यांच्याकडे आहे, असेही अण्णांनी या ब्लॉगमधून सूचित केले आहे आणि आम जनतेकडून पाच – दहा रुपयांची मदत घेऊन दिल्लीमध्ये आपल्या आंदोलनाचे कार्यालय उघडण्याचा निर्धारही व्यक्त केलेला आहे. ‘टीम अण्णा’ का फुटली आणि कोणी फोडली यासंदर्भात होणार्या आरोप – प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अण्णांचा हा ब्लॉग आलेला आहे. त्यामध्ये केवळ केजरीवालांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा उल्लेख आहे. आर्थिक बाबींचा उल्लेख अण्णांनी टाळला असला तरी त्यांचे एकेकाळचे ब्लॉगलेखक राजू परूळेकर यांनी आर्थिक देण्याघेण्यांच्या प्रश्नावरूनच ‘टीम अण्णा’ फुटली असा जाहीर आरोप केलेला आहे.
या देशाच्या कोट्यवधी नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची चेतना फुंकणार्या एका आंदोलनाची अशी विदारक इतिश्री व्हावी ही दुःखदायक बाब आहे. गेल्या २५ तारखेच्या ‘पुनश्च हरि ओम्’ या अग्रलेखात बहुतेक मुद्द्यांचा परामर्श घेतलेला असताना पुन्हा या विषयावर लिहावे लागते आहे, कारण जी टीका होत होती, तिला प्रथमच स्वतः अण्णांनी दुजोरा दिलेला आहे. आपण निर्णय घेतला तर पक्षस्थापन करणार नाही असे म्हणणार्यांनी आपला निर्णय न जुमानता चळवळीला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला ही वेदना अण्णांच्या ह्रदयामध्ये आज दिसते आहे. पक्ष काढताय ठीक आहे, पण त्यासाठीचा पैसा कोणाकडून घेतला जाणार? चारित्र्यवान लोक कसे निवडाल? देशभरातील कार्यकर्ते एकसंध कसे ठेवाल? असे अनेक सवाल ब्लॉगमध्ये अण्णांनी केजरीवालांना केलेले आहेत. सत्ता मिळाली की माणसांचा बुद्धीपालट होतो. हा खुर्चीचा गुणधर्म आहे, असे अण्णांनी त्यात म्हटले आहे ते खरेच तर आहे. आपल्याला वापरून घेतले गेले याचे हे दुःख आहे आणि असे दुःख जीवघेणे असते हे निश्चित. केजरीवालांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा काहीही असोत, जनता त्यांना त्यांची जागा निश्चितच दाखवून देईल. प्रश्न अण्णांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा आहे. आपण यापुढे उपोषण करणार नाही, तर आंदोलने करू असे अण्णांनी सांगितले आहे आणि त्यांचा एक देशव्यापी दौरा येत्या ऑक्टोबर – नोव्हेंबरमध्ये होणार आहे. लोक केजरीवालांच्या पाठीशी राहतात की अण्णांच्या हे या दौर्यात दिसून येईल. पण केवळ लोक पाठीशी असून चालत नाही. हे आंदोलन कसे असेल, त्याचा पाया कसा रचला जाईल, संघटनात्मक बांधणी कशी केली जाईल त्याचा विचार अण्णांनी करायला हवा. देशातील सहा लाख गावांपर्यंत जाण्याचा त्यांचा निर्धार प्रशंसनीय आहे, परंतु एकदा धडा घेतलेला असताना पुन्हा त्याच विस्कळीत मार्गाने जाण्यात धोका आहे हे अण्णांना आता तरी कळायला हवे. शेतकर्यांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी, रोजगार अशा अनेक प्रश्नांचा उल्लेख अण्णांनी आपल्या आंदोलनासंदर्भात केलेला आहे. पण आंदोलनाला अशा दहा दिशा देण्यापेक्षा केवळ भ्रष्टाचार या एकाच विषयावर या चळवळीने लक्ष केंद्रित केले तर जनतेचा त्याला प्रचंड प्रतिसाद पुन्हा मिळाल्याखेरीज राहणार नाही. सर्व क्षेत्रांतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढणार्या प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्यांची प्रचंड फळी जर अण्णा देशात निर्माण करू शकले तर देशासाठी त्यासारखे योगदान दुसरे नसेल. केवळ कायदे केल्याने भ्रष्टाचार मिटणार नाही. भ्रष्टाचार मिटायचा असेल तर त्यासाठी भ्रष्टाचार्यांवर आम जनतेचा दबाव निर्माण झाला पाहिजे. माहिती हक्क कायद्यासारख्या कायद्याचा वापर करून भ्रष्टाचार्यांना उघडे पाडणारी सशक्त संघटना अण्णांनी घडवावी. व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न त्यातूनच साकार होऊ शकेल. अण्णांवर आजही देशाचा विश्वास आहे. देश त्यांच्या पाठीशी नक्की उभा राहील. फक्त जनता पुन्हा तोंडघशी पडणार नाही हे त्यांनी पाहावे.