दहशतवादाला खतपाणी घालून शेजारील राष्ट्रांना अशांत करण्याचा कुटील डाव रचणाऱ्या पाकिस्तान सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) सोमवारपासून आंदोलनाचा भडका उडाला असून, काल देखील अनेक ठिकाणी हिंसक निदर्शने करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पाकिस्तान सरकारच्या विरोधात निदर्शने वाढली. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी काल सकाळी निदर्शकांना रोखण्यासाठी एका पुलावर कंटेनर ठेवले होते, जेणेकरून निदर्शक पुढे जाऊ नयेत. मात्र ते कंटेनर आंदोलकांनी नदीत फेकून दिले. दरम्यान, सोमवारी झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये दोन लोक मृत्युमुखी पडले होते, तर जवळपास 22 जण जखमी झाले होते.
अवामी ॲक्शन कमिटी या नागरी संघटनेने सोमवारपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘बंद’ची हाक दिली होती. गेल्या अनेक दशकांपासून नाकारले जाणारे हक्क आम्हाला बहाल करण्यात यावेत, अशी मागणी या संघटनेने केली आहे. आमचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नसून, मूलभूत हक्क मिळवण्यासाठी असल्याचे अवामी कमिटीचे अध्यक्ष शौकत नवाझ मीर यांनी सांगितले. आमच्या मागण्या मान्य करा; अन्यथा मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराच त्यांनी पाकिस्तानी सरकारला दिला होता.
कालच्या निदर्शनांदरम्यान बाजारपेठ, दुकाने आणि स्थानिक व्यवसाय पूर्णपणे बंद होते, तर सार्वजनिक वाहतूक सेवा देखील बंद राहिली. तसेच निदर्शकांनी पाकिस्तानच्या पोलिसांवर दगडफेक केली. काही निदर्शक लाकडी काठ्यांसह उतरले होते आणि त्यांनी पाकिस्तान सरकारविरोधात जोरदार घोषणाही दिल्या.

