पीएफआयचा हस्तक फोंड्यातून ताब्यात

0
5

राष्ट्रीय तपास यंत्रणेची गोव्यातही कारवाई

देशाविरुद्ध कारवाया करण्याच्या कामांत गुंतल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या सदस्यांवर मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गोव्यासह देशभरातील विविध शहरात छापे टाकले. या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने गोव्यातील फोंडा शहरातून मुफ्ती हनिफ महंमद एहरार (42) या इसमास ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात कुर्टी-फोंडा येथे पार पाडण्यात आली. दरम्यान, गोव्याबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आदी राज्यांमध्येही एनआयएने धडक कारवाई करीत पीएफआयशी संबंधित कित्येक जणांना काल ताब्यात घेतले.

गोव्यात ताब्यात घेण्यात आलेला मुफ्ती हनिफ महंमद एहरार हा अखिल गोवा इमाम कौन्सिल (एजीआयसी) या संघटनेशी संबंधित असल्याचे एनआयएने म्हटले आहे. या संघटनेचा तो यापूर्वी अध्यक्षही होता, अशी माहिती हाती आलेली असून, तो या संघटनेची ध्येय-धोरणे मुस्लिम समाजात पसरविण्यासाठी काम करीत होता. तसेच तो प्रक्षोभक भाषणेही देत होता. सध्या तो एजीआयसीचा सरचिटणीस होता, अशी माहिती देखील उघड झाली आहे.

संशयित मुफ्ती हनिफ महंमद एहरार हा गेली काही वर्षे पीएफआयशी संपर्क राखून असल्याची माहिती मिळाल्याने एनआयएने काल त्याच्या मुसक्या आवळल्या. मुफ्ती हा कुर्टी येथील नुरानी नागा मशिदीत इमाम म्हणून कार्यरत होता. मात्र, चार वर्षांपूर्वी त्याला नुरानी मशीद व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले होते, अशी माहिती समोर आली आहे. पीएफआयशी संबंधावरून अधिक चौकशीसाठी त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहे.

अशी कारवाई करणे ही काळाची गरज : मुख्यमंत्री
खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर एनआयएने कुर्टी-फोंडा येथे पीएफआयच्या सदस्यांवर छापेमारी केली. जर आणखी कोणाचे पीएफआयशी संबंध असतील, तर त्यांच्यावरही एनआयए कारवाई करेल. पीएफआय सदस्यांवर अशा प्रकाराची कारवाई करणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एनआयएच्या फोंड्यातील छापासत्रानंतर दिली.

देशभरात 17 ठिकाणी एनआयएचे छापे

मंगळवारी एनआयएने देशभरातील 17 ठिकाणी पीएफआयशी संबंधित लोकांच्या ठिकाणांवर छापा टाकला. गोवा, बिहार, पंजाब, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही एनआयएने छापेमारी केली. या पथकाने बिहारमधील दरभंगा, मुजफ्फरपूर, मधुबनी, कटिहार, सिवान आणि मोतीहारी येथे छापे टाकले. याशिवाय देशभरात अन्य काही ठिकाणी देखील एनआयएने छापेमारी केली.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बेकायदेशीर कारवायांप्रकरणी 5 वर्षांसाठी बंदी घातली होती. या संघटनेवर इसिस सारख्या दहशतवादी संघटनेशी संबंध, दहशतवादाला पैसा पुरवणे आणि हिंसक घटनांमध्ये सहभागाचा आरोप आहे.
काल बिहारच्या मोतीहारीमधील चाकिया येथे पीएफआयचा सदस्य सज्जादच्या घरी एनआयएने छापा टाकला. तसेच दरभंगामध्ये एनआयएने दोन स्थानांवर छापा टाकला. तेथून दंतचिकित्सक डॉ. सारिक रझा याला ताब्यात घेण्यात आले.

मोतीहारीमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या इरशादच्या माहितीवर एनआयएने कुवान गावात छापा टाकला. एनआयएने सोमवारी मोतीहारीमध्ये कारवाई केली होती. एनआयए स्थानिक पोलिसांसह कुवान गावात पोहोचले आणि सज्जाद अन्सारीच्या घरी छापा टाकण्यात आला; मात्र तो गेल्या 14 महिन्यांपासून दुबईमध्ये काम करत आहे. त्याचे आधार कार्ड त्याच्या घरातून जप्त करण्यात आले. दरम्यान, पीएफआयचे सक्रिय सदस्य रेयाज मारुफ उर्फ बबलू आणि याकब उर्फ सुलतान अद्याप एनआयएच्या ताब्यात आलेले नाहीत.