पिता नव्हे, वैरीच

0
17

ओर्डा – कांदोळी येथील तिहेरी मृत्युप्रकरणाने तो गाव आणि परिसरच काय, अवघे राज्य हादरले आहे. आपल्या दोन कोवळ्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करण्याचे अधम कृत्य जॉय फर्नांडिस या पित्याने केले आहे. वाचकांना कदाचित आठवत असेल, २०१५ सालच्या डिसेंबरमध्ये एका माथेफिरूने कांदोळीत आपल्या अनुक्रमे नऊ आणि तीन वर्षांच्या मुलांची अशाच प्रकारे हत्या करून स्वतः मानसोपचार इस्पितळ गाठले होते. आपल्या मुलांच्या जिवाला भीती असल्याने आपणच त्यांना संपवल्याचे स्पष्टीकरण त्या नराधमाने तेव्हा दिले होते. परवाची घटनाही अशीच अतर्क्य आणि धक्कादायक आहे. प्रथमदर्शनी मिळत असलेल्या माहितीवरून तरी, जॉय याने आपल्या अल्पवयीन मुलांच्या हत्या या केवळ पत्नीला जन्माची अद्दल घडवण्यासाठी केल्याचे दिसते आहे. हे एवढे टोकाचे पाऊल त्याने का उचलले, पत्नीवर त्याचा एवढा राग का होता, तिच्या चारित्र्यासंबंधी त्याला काही संशय होता का वगैरे प्रश्‍नांची उत्तरे आता पोलिसांना शोधावी लागतील. प्रस्तुत घरात जॉयची खोली वगळल्यास, सगळ्या खोल्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते हा प्रकारही अचंबित करणारा आहे. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात अधिक खोलात जाण्याची गरज आहे. दुर्दैवाने १५ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा अशी दोन्ही कोवळी मुले देवाघरी गेली आहेत. या कोवळ्या कळ्या खुडायचा या नराधमाला काय अधिकार होता?
एकूण परिस्थिती विचारात घेतली, तर जॉयने आपल्या मुलांच्या हत्येचा बेत अत्यंत विचारपूर्वक आखल्याचे दिसून येते. ज्या दिवशी त्याने मुलांची हत्या केली, त्या संध्याकाळी त्यांच्या शेजार्‍याच्या घरातील विवाहसमारंभ पेन्ह द फ्रान्स येथे होता. त्यासाठी दुपारी कांदोळी चर्चमध्ये कार्यक्रम होता व नंतर बहुतेक सर्व गावकरी लग्नाच्या बसने पेन्ह द फ्रान्सला गेलेले होते. गावची काही मंडळी रेईश मागूशला हेमा सरदेसाईंच्या कार्यक्रमाला गेली होती. म्हणजेच गावातील बहुतेक मंडळी घरी नसतील हे पाहूनच हा मुलांच्या हत्येचा कट जॉयने आखला असला पाहिजे. त्याचे पूर्वनियोजन केले असले पाहिजे. हा सगळा प्रकार करण्याआधी त्याने आपल्या मालमत्तेसंदर्भातील कागदपत्रे एका टॅक्सीचालक नातलगाला दिली होती असेही आता निष्पन्न झाले आहे. म्हणजेच निरवानिरवीचा हा जॉयचा प्रयत्न होता असे दिसते. हे सगळे अधम कृृत्य त्याने थंड डोक्याने, विचारपूर्वक केले व शेवटी आत्मघात करून घेतला असे या घटनेतून दिसून येते. जॉय हा तसा सुप्रसिद्ध होता. पूर्वी तोमाझिन कार्दोझ यांनी त्याला तियात्र अकादमीत चिकटवले होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या अध्यक्षांशी बिनसल्याने तो तेथून राजीनामा देऊन बाहेर पडला होता. मग त्याने केटरिंगचा व्यवसाय हाती घेतला, परंतु तेथेही जम बसला नाही. पत्नी शिक्षिका असल्याने कदाचित यामुळे त्याला न्यूनगंडाने ग्रासलेले असू शकते. परंतु त्याची शिक्षा मुलांना त्याने का द्यावी? जॉयची मुलगी दोनापावलाच्या शाळेत शिकायची, तर मुलगा पर्वरीत केजीला होता. या मुलांची शैक्षणिक कारकीर्द उज्ज्वल होईल हे पाहायचे सोडून त्यांना अशा निर्दयीपणे हे जग सोडून जायला भाग पाडणार्‍या या महाभागाचे कृत्य अत्यंत घृणास्पद आणि त्रिवार निषेधार्ह आहे. या सगळ्या प्रकारामागे कोणतेही कौटुंबिक कारण असो, ज्या प्रकारे त्याने हे सगळे टोकाचे कृत्य केले, त्याचे समर्थन होऊच शकत नाही. या घटनेतून केवळ त्याने आपल्या पत्नीलाच धक्का दिलेला नाही, तर कांदोळी परिसराला आणि संपूर्ण गोव्यालाच धक्का दिला आहे. खरे तर ज्या घरात ही भीषण घटना घडली, त्याचे छायाचित्र पाहिले, तर त्यात नाताळ व नववर्षानिमित्त केलेली विद्युत रोषणाई स्पष्ट दिसते. स्वतः हा जॉय शेजार्‍यांच्या विवाहसोहळ्याला जाणार होता. त्याच्या स्वतःच्या मुलाचे पहिले कम्युनियन येत्या रविवारी व्हायचे होते. असे असताना शेजार्‍यांच्या लग्नसोहळ्याची संधी साधून हे अधम कृत्य उरकून त्याने असे काय मिळवले? जॉय हे परिसरात सुपरिचित व्यक्तिमत्त्व होते. जिल्हा पंचायतीची निवडणूक काही वर्षांपूर्वी त्याने लढवली होती. तियात्रांमधील ते एक लोकप्रिय नाव होते. मंगळुरूच्या एका संघटनेचे अध्यक्षपदही त्याला देण्यात आलेले होते. अशी लोकप्रिय व सुपरिचित व्यक्ती अशा प्रकारचे अतिशय टोकाचे अधम कृत्य करू शकते हा धक्का त्याच्या मित्रपरिवारासाठी अगदी कल्पनेपलीकडचा आहे. नववर्षाची सुरुवात सकारात्मक घटना – घडामोडींनी होत असताना या तिहेरी हत्या प्रकरणाने त्या चैतन्यावर दुःखाचे, हताशेचे सावट आणले आहे. असे माथेफिरू अधम कृत्य करून स्वतः निघून जातात, परंतु सद्वर्तनी समाजजीवनावर अकारण ओरखडे ओढून जातात.