पावसामुळे 24 तासांत पडझडीच्या 76 घटना

0
17

11.46 लाखांची हानी, आतापर्यंत 15.30 इंच पाऊस

राज्यातील विविध भागात जोरदार वारे आणि पावसामुळे झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद होत आहे. चोवीस तासांत 76 घटना घडल्या असून सुमारे 11 लाख 46 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.

कुडचडे भागात सर्वाधिक 15 आणि वाळपई भागात 13 पडझडीच्या घटनांची झाली आहे. राज्यात मागील तीन दिवसांत एकूण 7.85 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात 1 जूनपासून आत्तापर्यंत एकूण 15.30 इंच पावसाची नोंद झाली आहे. मागील तीन दिवस पडलेल्या जोरदार पावसामुळे पावसाच्या तुटीचे प्रमाण 72 टक्क्यांवरून 47 टक्क्यांवर आले आहे.

राज्यात चोवीस तासांत 2.20 इंच पावसाची नोंद झाली असून झाडांच्या पडझडीच्या 76 घटनांची नोंद झाली आहे. हवामान विभागाने 26 जून ते 1 जुलै या कालावधी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून येलो अलर्ट जारी केला आहे.

चोवीस तासांतील पाऊस
म्हापसा 0.82 इंच, पेडणे 2.26 इंच, पणजी 3.64 इंच, जुने गोवे 3.32 इंच, साखळी 0.96 इंच, वाळपई 1.22 इंच, फोंडा 2.39 इंच, धारबांदोडा 3.67 इंच, काणकोण 2.70 इंच, दाबोळी 2.17 इंच, मडगाव 2.74 इंच, मुरगाव 1.84 इंच, केपे 1.78 इंच, तर सांगे येथे 1.46 इंच पावसाची नोंद झाली आहे.

काणकोणात 32.51 इंच पाऊस

राज्यात चोवीस तासांत धारबांदोडा येथे सर्वाधिक 3.67 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी, दक्षिण गोव्यातील काणकोण येथे आत्तापर्यंत सर्वाधिक 32.51 इंच पावसाची नोंद झाली आहे.
मडगाव येथे 18.51 इंच पावसाची नोंद झाली आहे. उत्तर गोव्यातील वाळपई येथे आत्तापर्यंत सर्वांत कमी 7.64 इंच पावसाची नोंद झाली आहे.