-श्रीरंग जांभळे
तापलेला उन्हाळा व वाढलेला उकाडा यातून माणूस व इतर पशुपक्ष्यांना दिलासा देणारा पाऊस आला की मन कसे प्रसन्न होऊन जाते. मातीचा गंध सर्वत्र पसरतो. जमिनीवर हिरवा गालिचा पसरण्याची नैसर्गिक तयारी सुरू होते. पाण्याअभावी सुकलेल्या झाडांच्या जिवंत फांद्यांना नवीन पालवी फुटण्याची प्रक्रिया आतून सुरू होते. एकूण सर्वत्र आल्हाददायक वातावरण पसरते आणि यातच शेतकरी आपल्या तयारीला लागतो…
यंदा पावसाचे आगमन अगदी वेळेत झाले आहे. सलामीचा पाऊस चांगलाच कोसळतो आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरीवर्गासाठी आशादायक वातावरण आहे. पाणी हा शेतीसाठी फारच महत्त्वाचा घटक. पावसाच्या रूपाने मिळणारे पाणी शेतीसाठी मोफत वरदान आहे. ज्या ठिकाणी अन्य हंगामांत पाणी उपलब्ध नसल्यामुळे शेती करता येत नाही अशा ठिकाणीही पिके घेतलेली आपण पाहू शकतो.
‘मरड’ भागात किंवा माळरानावर जमिनीची आवश्यक ती मशागत करून भाजीपाला, भात, नाचणी अशा पद्धतीची पिके पावसाळी हंगामात घेण्याची पद्धत गोव्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती. डोंगरउतारावर लहान ओटे बांधून खाचरे तयार केली जात. या खाचरांमध्ये भात, नाचणी यांसारख्या तृणधान्यांची लागवड केली जाई. दक्षिण गोव्यातील काणकोण, केपे, सांगे व उत्तरेकडे फोंडा, सत्तरी, डिचोली, पेडणे या भागांत अशी खाचरे अजूनही पाहायला मिळतात. आता फोंडा तालुक्यातील बांदोडा, प्रियोळ, बेतोडा, बोरी व अन्य काही भागांत काकडी, दोडकी, कारली यांसारख्या भाज्यांचे मळे उभे राहिलेले पाहायला मिळतात. परंतु नाचणी लागवड, भरडावरील भातशेती यांचे प्रमाण फारच नगण्य झाले आहे.
कृषी संचालनालयाच्या २०११-१२ सालच्या अंदाजानुसार ३१,२४७ हेक्टर जमिनीत पावसाळी भातशेती केली जाते. गेल्या दोन वर्षांतील भाताला सरकारकडून मिळणार्या आधारभूत किमतीत झालेल्या वाढीमुळे शेतकर्यांचा भात उत्पादनाकडे कल वाढलेला दिसून येतो. यामुळे या वर्षीच्या चालू खरीप हंगामात वरील आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता दिसून येते. गेल्या वर्षभरात भाताच्या उत्पादनवाढीसाठी कृषी संचालनालय व अन्य काही स्वयंसेवी संस्थांनी एसआरआय पद्धतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. २०११-१२ च्या आकडेवारीनुसार गोव्यात ३७.८ क्विंटल/हेक्टर एवढी भाताची उत्पादकता खरीप हंगामात आहे. राज्यातील उत्पादकता वाढवण्याचे आव्हान या पद्धतीद्वारे पेलता येईल.
२०१२-१३ वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत चारसूत्री भातशेती पद्धतीद्वारे काही प्रात्यक्षिकांसाठीचा प्रस्ताव एका स्वयंसेवी संस्थेने कृषी संचालनालयाकडे सादर केला होता. पण प्रशासन प्रमुखांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तो प्रस्ताव तसाच पडून राहिला. कोकणपट्ट्यात सिद्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून येथील उत्पादकता वाढवण्यास हातभार लागत असल्यास व त्यापासून शेतीला काही अपाय नसल्यास राज्यात त्याचा निश्चितपणे पाठपुरावा केला पाहिजे. भात उत्पादन क्षेत्रातील वाढ व उत्पादकता वाढ यासाठीच्या चालू असलेल्या विविध स्तरांवरील प्रयत्नात नवीन तंत्रज्ञान, स्वयंसेवी क्षेत्रातील संघटित व असंघटित प्रयत्न यांबरोबरच यांत्रिकीकरणाचाही वाटा आहे. सध्या कुशल व अकुशल कामगारांची भासणारी कमतरता हा शेतीसमोरील मोठा भेडसावणारा प्रश्न आहे. अशा वेळी यांत्रिकीकरणाची साथ हा शेतकर्यासाठी आशेचा किरण आहे.
सखल भागातील भातशेतीची ही आशादायक स्थिती असली तरी मरड भागातील पावसाळी शेतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालेले आढळते. नाचणी, पाकळ यांसारख्या डोंगराळ पिकांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. शासकीय आकडेवारीनुसार नाचणीची लागवड जेमतेम १५० हेक्टर क्षेत्रावर केली जाते. जंगली जनावरांच्या शेती क्षेत्रातील घुसखोरीमुळे या लागवडीकडे लोकांनी दुर्लक्ष केले आहे. गवेरेडे, रानडुक्कर, मोर यांचा वावर प्रमाणाबाहेर वाढल्याने शेतकरी हतबल होताना दिसतो. विजेच्या तारांचे कुंपण हा त्यावर उपाय सांगितला जात असला तरी सर्व ठिकाणी त्याची उपयुक्तता सिद्ध होणे काही कारणास्तव कठीण आहे. परंतु अशा परिस्थितीत वनखात्याने हस्तक्षेप करून काही दिलासा द्यावा, अशी रास्त अपेक्षा शेतकरी व्यक्त करताना दिसतो.
या जनावरांमुळे वर उल्लेख केलेली पिकेच नव्हे तर केळी, नारळ यांसारखी बागायती पिके घेणेही काही भागांत कठीण झाले आहे. पावसाळ्यापूर्वीच बागायती पिकांच्या लागवडीची तयारी सुरू होते. नारळ, केळी यांसारख्या पिकांच्या लागवडीबरोबरच काजू (कोरडवाहू पीक) लागवडीसाठीही खड्डे मारण्याची कामे पावसाळ्यापूर्वी उरकण्याचा शेतकरीवर्गाचा प्रयत्न असतो. ज्या ठिकाणी सिंचनाची योग्य उपलब्धता व व्यवस्था आहे त्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वीच रोपे, कलमे यांची लागवड केली जाते. पण बर्याच ठिकाणी पावसाळ्यात कलमे/रोपे मिळवण्यासाठी लगबग केलेली आढळते. पावसात जेवढ्या लवकर नवीन लागवड केली जाते तेवढा जास्त पावसाचा कालावधी नवीन लागवडीला उपलब्ध होऊन नवीन लावलेली रोपे/कलमे स्थिरस्थावर होऊन त्यांची वाढ चांगली होते. काजू, आंब्यासारख्या कोरडवाहू पिकांच्या बाबतीत ते प्रकर्षाने जाणवते.
काजूच्या बाबतीत यंदाचा उत्पादनाचा हंगाम राज्यात सर्वसाधारणपणे चांगला राहिला. पण तरीही राज्यातील कारखान्यांची एकूण काजू प्रक्रियेची क्षमता पाहिल्यास राज्यातील काजू उत्पादनाला अजूनही बराच वाव आहे. त्यामुळे काजू उत्पादकांनी अजूनही काजू लागवडीसाठी पुढे यावे. राज्यात सलग आंब्याची लागवड फारच कमी आहे. परंतु गोव्याच्या आंब्याच्या विविध जाती बर्याच प्रसिद्ध आहेत. या जातींच्या आंब्यांना बाजारात चांगली मागणी आहे. नवीन लागवडीसाठी इच्छुक असणार्यांनी याचाही विचार करावा.
कोरडवाहू पिकांमध्ये अननस हेही राज्यातले एक महत्त्वाचे पीक आहे. फोंडा तालुक्यातील कुंकळ्ये, सावई-वेरे, केरी, प्रियोळ या भागांतील अननसे प्रसिद्ध आहेत. परंतु येथील उत्पादकता बरीच कमी झाली आहे. कुंडई औद्योगिक वसाहतीचा परिणाम म्हणून या परिसरातील अननसांची उत्पादकता बरीच कमी झाली आहे. पणजी- फोंडा मार्गाच्या बाजूला आढळणारे अननसाचे ढीग आता पूर्वीसारखे आढळत नाहीत. अन्य भागांत गवेरेडे, रानडुक्कर, माकड यांच्या नासधूस करण्यामुळे अननसाची व त्याबरोबर अन्य पिकांची लागवड धोक्यात आली आहे. माती व जलसंधारणासाठी अननस लागवड फार उपयुक्त ठरते. पावसाचे पाणी जमिनीत जिरण्यासाठी व जमिनीवरची सुपीक माती वाहून जाऊ नये यासाठी अननसाची लागवड फारच परिणामकारक ठरते. अर्थात डोंगरउतारावरील ही लागवड नैसर्गिक संतुलन सांभाळण्याबरोबरच चांगले उत्पादनही देऊ शकते. पण जंगली जनावरांच्या मुक्त वावरामुळे हे शेतकर्यांसाठी आता कठीण बनले आहे.
परंतु राज्याच्या अन्य भागांत शिर्सीहून नवीन वाणाचे बियाणे (शेंडे) आणून लावले जात आहेत. त्याचेही पीक आता बाजारात येत आहे. आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्यांना या वाणाच्या लागवडीचाही विचार करता येईल.
पावसाळी भाजी
पावसाळी भाजीपाला लागवडीतही लक्षणीय वाढ होताना दिसते आहे. आता हळूहळू रस्त्याच्या दुतर्फा स्थानिक काकडी, दोडकी, कारली विक्रीला उपलब्ध होतील. रस्त्याने जाणार्या-येणार्याला ही भाजी निश्चितच आकर्षित करून घेते. भाजी विकत घेण्यासाठी रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या गाड्या आता पाहायला मिळतील. विक्रीयोग्य उत्पादन घेणार्यांसाठी राज्य शासनाच्या फलोत्पादन महामंडळाने खरेदी केंद्रांची व्यवस्था करण्याचा घेतलेला निर्णय उपयोगी ठरेल. पावसाळ्यातील ही लागवड आता फायदेशीर सिद्ध होऊ लागल्याने बरेचजण याकडे आकर्षित होत आहेत. हे तसे कष्टाचे काम आहे. पण याचे नियोजन व तयारी पावसाळ्यापूर्वीपासूनच चालते. पावसाळ्यापूर्वीच पाण्याची विशेष व्यवस्था करून रोपवाटिका तयार केल्या जातात. खाणकाम बंद झाल्यामुळे बेकारी वाढलीय असे चित्र दिसते आहे. अशा भागांत हा भाजीपाला उत्पादनाचा हंगामी प्रयोग उपयोगी सिद्ध होऊ शकतो.
खाणग्रस्त भागात उन्हाळ्यात पाण्याची अनुपलब्धता हा मोठा डोकेदुखीचा विषय आहे. परंतु पावसाळ्यात येथील लोक हंगामी पिकांच्या लागवडीकडे वळल्यास चांगल्या प्रमाणात येथे रोजगाराची उपलब्धता होईल. ज्यांना शेतीकामाची माहिती आहे असे अनेक लोक खाणी बेमुदत बंद झाल्यानंतर शेतीकडे वळत आहेत ही फारच चांगली गोष्ट आहे. अशा लोकांना शेतकडे जास्त आकर्षित करण्यासाठी कृषी खाते, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था यांनी विशेष योजना आखून मार्गदर्शन केल्यास या भागात पुन्हा शेतीला गती येईल.
पावसाळा आला की सर्वजण अंगणात, कुंडीत, परसात काही ना काही लागवड करण्याची तयारी करतात. फुलझाडे, शोभेची झाडे यांच्या फांद्या आणून लावल्या जातात. पण याबाबतचे चित्र पाहिल्यास अशी रोपे, कलमे हातगाडीवर टाकून विक्रीसाठी फिरताना अथवा रस्त्याच्या बाजूला अशी रोपे विकताना आपण काहीजण पाहतो. यात गोवेकर मात्र कुठेही दिसत नाही. खरे तर प्रत्येक पावसाळ्यात अशा फुलझाडे व शोभेच्या झाडांची उलाढाल लाखोंच्या घरात होते. गोव्यातील तरुणांनी या व्यवसायाकडे एक आव्हान म्हणून पाहायला हवे. सध्या रस्त्यावर चालणारे हे व्यवसाय बहुतांश बेकायदेशीर आहेत. त्यांच्याकडे रोपवाटिका स्थापण्याचा अथवा रोपांची विक्री करण्याचा कायद्यानुसार परवाना असत नाही. परंतु कृषी खात्यामार्फत अशांवर कारवाईही केली जात नाही. गोव्यातील युवकांनी कायदेशीर स्वरूपात असे व्यवसाय सुरू करावेत. याला नक्कीच चांगली मागणी आहे. भाज्यांच्या रोपवाटिकेला चांगली मागणी आहे.
आणखी काही दिवसांनी जायांचे गजरे घेऊन काही भागांत रस्त्याच्या दुतर्फा लोक राहिलेले पाहायला मिळतात. त्यालाही चांगली मागणी आहे. म्हार्दोळ, बोरीसारखे काही भाग या जायांसाठी प्रसिद्ध आहेत. म्हार्दोळ परिसरातील ‘फुलकारांचे’ जमिनीच्या हक्कांवरून काही प्रश्न आहेत. ‘फुलकारांच्या’ या पारंपरिक व्यवसायाला उभारी देण्यासाठी विचार व काही विशेष कार्यक्रमाची गरज आहे.
माती व जलसंधारण
गोव्यातील पाऊस धो-धो कोसळतो. पावसाचे पाणी वाहून जाताना सोबत मातीही घेऊन जाते. वरच्या थरातील सुपीक माती हा शेतीचा प्राण आहे. ही माती वृक्षतोड, बांधबंदिस्तीची झालेली मोडतोड व इतर काही कारणांमुळे वाहून गेल्यामुळे लाल पाण्याने भरलेले ओहोळ, नद्या पावसाळ्यात पाहायला मिळतात. यामुळे पिकांचे बरेच नुकसान होते. खाणकाम बंद झाल्यामुळे यावर्षी कमी माती वाहून जाईल. माती वाहून गेल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याचे प्रमाण कमी होते. यासाठी डोंगरावर चर मारणे, डोंगरउतारावर ओटे बांधणे, जास्तीत जास्त आच्छादन राहील अशी लागवड करणे, ओहोळांची बांधबंदिस्ती करणे अशा उपायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. यासाठी काही ठिकाणी पाणलोट क्षेत्र विकास योजना राबवली गेली आहे. पण सध्या त्याचा वेग प्रसासकीय स्तरावर मंदावला आहे. त्याला गती देणे गरजेचे आहे. जुन्या कामांची आवश्यक तिथे डागडुजी करणेही आवश्यक आहे. याद्वारे पावसाच्या रूपाने आपल्याला मोफत मिळणारे पाणी आपण पुढील काळासाठी राखून ठेवू शकू.
मनुष्यबळाची उपलब्धता
शेतीच्या कामांना मनुष्यबळाची आवश्यकता जास्त असते. त्यात कुशल मनुष्यबळ बरेच लागते. परंतु या मनुष्यबळाची कमतरता आता मोठ्या प्रमाणावर भासते. त्यामुळे आवड असूनही शेती अथवा अन्य लागवड करू न शकणारे बरेचजण सापडतील. शासनाने यासाठी यंत्राद्वारे शेतीला प्रोत्साहन देत यंत्रे व अवजारांवर अनुदान वाढवले आहे. पण सर्वच कामे यंत्राद्वारे योग्य पद्धतीने होतात असे नाही. त्यासाठी ग्रामीण रोजगार हमी योजनेसारख्या योजनांची रचना सरकारने शेती व शेतकर्यांना अनुकूल करावी. यातून शेतीच्या कामांना गती मिळेल.
मनुष्यबळासोबत आर्थिक उपलब्धतेचा मुद्दाही तेवढाच महत्त्वाचा आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनुसार गोव्यात ग्रामीण उद्योग व शेतीला नियमांनुसार आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. शेती व ग्रामीण उद्योगांच्या वाढीसाठी विविध योजना असूनही राष्ट्रीयीकृत बँका प्रचार-प्रसारात मागे पडतात. किसान क्रेडिट कार्डसारख्या साध्या सरळ योजनाही गरजू लोकांपर्यंत पोचत नाहीत. यासाठी रिझर्व्ह बँकेने ‘ग्राम संपर्क अभियान’ चालवले आहे. याबाबत राज्य सरकारनेही लक्ष घालून बँकांच्या योजना गरजू लोकांपर्यंत पोचतील यासाठी बँकांकडे पाठपुरावा करावा.
जमिनीच्या मालकी हक्कांबाबत गोव्यात बरेच प्रश्न आहेत. ही निमित्ते पुढे करूनही बँका अशा शेतकर्यांना योजनांचे लाभ देत नाहीत. गोव्याची अग्रणी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने अशा शेतकर्यांसाठी रु. १ लाख एवढे कर्ज देण्याची योजना केली असल्याचे समजते. मग अन्य बँका असे का करू शकत नाहीत?
पावसाळा सुरू झाला की ‘हिरवळ दाटे चोहीकडे.’ या हिरवळीमध्ये शेतीचा महत्त्वाचा वाटा आहे. ही शेती समृद्ध करण्यासाठी व सर्व जनतेला मुबलक अन्न व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी (पर्यायाने देशाच्या शाश्वत विकासासाठी) आणि संपन्नतेचा पर्वत उचलण्यासाठी आपण सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्नांची काठी पुढे केली पाहिजे. चला तर….
अनोळखी कलम व रोपे विक्रेत्यांपासून सावधान!
पावसाळा सुरू झाला की, नारळ, चिकू, आंबा अशा फळझाडांची रोपे/कलमे घेऊन अनेकजण दारोदार फिरतात. ही झाडे चार-पाच वर्षांत फळे देतात असा दावा करताना ते फोटो दाखवतात. एकेका रोपाची/कलमाची किंमत २०० ते ३०० रुपये सांगितली जाते. याला आपला शिक्षित समाज भुलून बळी पडतो. विकायला दारावर आलेला माणूस पुन्हा आपल्याला भेटेल का? याचा साधा विचार न करता त्याचा दावा खरा मानून कित्येकजण ती रोपे विकत घेऊन पैसे अक्कलखाती जमा करतात. परंतु अशा दाव्यांना कोणताही आधार नाही. उलट मातृवृक्षांचा स्रोत माहीत नसलेल्या अशा रोपांची/कलमांची लागवड केल्यास त्यांच्यासोबत काही रोग/किटक लागवड केलेल्या परिसरात वाढून स्थानिक लागवडीचे नुकसान करू शकतात. आणि तसे पाहिल्यास योग्य पद्धतीने लागवड केल्यास स्थानिक रोपवाटिकेतून उपलब्ध काजू, आंबे, चिकू यांची कलमे, नारळाची रोपे चार-पाच वर्षांनी फूल देण्यास सुरुवात करू शकतात.