पावसाचा रुद्रावतार

0
18

>> साळावली धरण तुडुंब; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ; रस्ते पुन्हा पाण्याखाली

मुसळधार पावसाने काल पुन्हा एकदा राज्याला झोडपून काढले. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोर पकडला होता. त्यानंतर काल सकाळपासून दिवसभरात सातत्याने जोरदार सरी कोसळल्या. परिणामी राज्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. मागील चोवीस तासात हंगामातील आत्तापर्यंतच्या उच्चांकी ६.६८ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.

येथील हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करून शुक्रवारसाठी रेड अलर्ट जारी केला होता. शनिवार दि. ९ जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पाटो-पणजी भागात आणि रायबंदर ते मेरशी या रस्त्यावर पाणी साचले होते. पेडणे तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा या दोन्ही नद्यांना पूर आला असून, या नद्यांचे पाणी शेती-बागायतीत शिरून पूरस्थिती निर्माण झाली आहे. मधलामाज-मांद्रेत एका बेकरीवर झाड पडून ५० हजारांचे नुकसान झाले.

डिचोली तालुक्यातील सिकेरी-मये येथे एका घरावर वृक्ष कोसळून ७५ हजारांची हानी झाली, तर मायणा-न्हावेली येथे घराची भिंत कोसळून सव्वालाख रुपयांचे नुकसान झाले. तिळारी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने साळ व शापोरा नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

काणकोण तालुक्यातील तळपण, गालजीबाग आणि अन्य नद्या तुडुंब भरून वाहत आहे. काल होवरे, पाळोळे, मणगण, पाटणे हा भाग जलमय झाला, तर काहींच्या घरात पाणी घुसले. मुठाळ, सादोळशे, करमल घाटात दोन-तीन ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या.

कुशावती नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा पूल काल पाण्याखाली गेला. तसेच मडगाव-केपे या मुख्य रस्त्यावरही पाणी साचले. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली. केपेतील रावाभाट येथे कुशावती नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने दोन कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. तसेच शिरवाई येथे मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने जांबावलीला जाणारी वाहतूक सुमारे चार तास बंद होती. कुडचडेतील खामामळ येथे तीन घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. वास्को शहरातील स्वतंत्रपथ मार्ग पाण्याखाली गेला. देस्तेरो वाड्यावरील लोकांच्या घरात शुक्रवारी मध्यरात्रीपासून पाणी घुसल्याने लोकांचे हाल झाले. झुआरीनगर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात निवासी संकुलाची भिंत कोसळून एक व्यक्ती गंभीर जखमी झाली.

आपत्ती व्यवस्थापनाकडून संपर्क क्रमांक जारी

अतिवृष्टीच्या पार्श्‍वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही संपर्क क्रमांक जारी केले आहेत. राज्य : ०८३२-२४१९५५०, उत्तर गोवा : ०८३२-२२२५३८३, दक्षिण गोवा : ०८३२-२७९४१०० असे संपर्क क्रमांक आहेत. दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी डिचोली, पेडणे आणि बार्देश तालुक्यातील शापोरा नदीकाळच्या नागरिकांना तिळारी धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामुळे सतर्क राहण्याची सूचना केली आहे.

साळावली धरण तुडुंब

राज्यातील प्रमुख साळावली धरण पूर्ण भरले आहे. तिळारी धरण ७७ टक्के, तर अंजुणे धरण ३० टक्के भरले आहे. हे धरण ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत पूर्ण भरते. राज्यातील इतर धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. पूरस्थिती टाळण्यासाठी तिळारी धरणातून पाणी सोडण्याचे काम संथ गतीने सुरू करण्यात आले आहे. तिळारी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याच्या वेळी जनतेला कळविले जाणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली.