पावलो डायबाला कोरोनामुक्त

0
173

युवेंट्‌सचा स्टार फुटबॉलपटू पावलो डायबाला याने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. युवेंट्‌स पत्रक जारी करताना डायबाला याच्या नव्याने करण्यात आलेल्या दोन्ही चाचण्या नेगेटिव्ह आल्या असल्याचे सांगितले. इटलीतील चॅम्पियन क्लब असलेल्या युवेंट्‌सने पुढे सांगितले की डायबाला याला होम क्वॉरंटाईन केले जाणार नाही.

मागील जवळपास दोन महिन्यांपासून कोरोनाशी लढल्यानंतर डायबाला यातून मुक्त झाला आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर मार्च महिन्यात डायबालाची पहिली चाचणी घेण्यात आली होती. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या संघातील सदस्य डॅनियल रुगानी व ब्लेझ माटुडी यांची चाचणीदेखील सकारात्मक आली होती. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. डायबालाने समाज माध्यमांचा आधार घेत आपल्याबद्दल तसेच आपली मैत्रिण ओरयाना सेबाटिनी हिला कोरोना झाल्याने सांगितले होते. यानंतर मागील चारही आठवड्यांत केलेल्या चाचण्यांमध्ये डायबालाचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे चिंता वाढली होती. परंतु, आता सलग दोनवेळा नकारात्मक अहवाल आल्याने डायबाला यातून मुक्त झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

२६ वर्षीय डायबालाने स्वत: च्या सावरण्याची माहिती ट्विटरवर दिली. त्याने ट्विटरवर लिहिले की, गेल्या आठवड्यात बरेच लोक माझ्याशी बोलले. पण मी आता ठीक आहे याची पुष्टी मी शेवटी करू शकतो. आपल्या समर्थनाबद्दल पुन्हा धन्यवाद. जे अजूनही यातना भोगत आहेत त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. स्वतःची काळजी घ्या.