पालिका मतदानादिवशी भरपगारी सुट्टी

0
7

3 दिवस मद्यालये बंद ठेवण्याचा आणि जमावबंदीचाही आदेश जारी

राज्य सरकारने फोंडा आणि साखळी नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 मे रोजी त्या त्या नगरपालिका क्षेत्रातील मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडून मद्यालये बंद ठेवण्याचा आणि जमावबंदीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे.

दोन्ही नगरपालिका क्षेत्रातील मतदार असलेले औद्योगिक कंपन्यांतील कामगार, राज्य सरकारच्या विविध खात्यांत काम करणारे रोजंदारी कामगार, वाणिज्य आणि औद्योगिक कामगार, खासगी आस्थापनांतील कर्मचारी आदींना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तसेच फोंडा आणि साखळी नगरपालिका मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 4 मे, 5 मे आणि 7 मे रोजी फोंडा व साखळी नगरपालिका क्षेत्रातील मद्यालये बंद ठेवण्याचा आदेश काल जारी करण्यात आला. बार अँड रेस्टॉरंटचा परवाना असलेले व्यावसायिक केवळ रेस्टॉरंट सुरू ठेवू शकतात. रेस्टॉरंटच्या मालकांनी केवळ जेवण मिळेल असा फलक लावावा, अशी सूचना करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या जवळील 100 मीटरच्या क्षेत्रातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. मतदान केंद्राजवळ आणि मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्राजवळ लोकांची गर्दी आणि कायदा आणि सुव्यस्थेची समस्या होऊ नये म्हणून मतदानाच्या दिवशी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी सकाळी 6 ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत अनुक्रमे मतदान आणि मतमोजणी केंद्राभोवतालच्या 100 मीटर परिसरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, आस्थांपने, बार, चहाची दुकाने, पान शॉप, खानावळ आणि अन्न जिन्नस विक्री करणारे धाबे, गाडे आणि इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

जिल्हाधिकाराऱ्यांनी साखळी आणि फोंडा नगरपालिका क्षेत्रात जमावबंदीचा आदेश लागू केला असून, हा आदेश निवडणूक अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना लागू नसेल.