नागरिकांकडून सूचना व हरकती मागवल्या
गोवा राज्य निवडणूक आयोगाने मुरगाव, मडगाव, म्हापसा, कुडचडे-काकोडा, डिचोली, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, वाळपई, पेडणे व सांगे या 11 नगरपालिकांच्या होणार असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रभाग पुनर्रचनेसंबंधीचा मसुदा जाहीर केलेला असून जनतेकडून त्यासंबंधीचे आक्षेप व सूचना मागवल्या आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने त्यासंबंधीची अधिसूचना काढली आहे. संबंधित नगरपालिकांतील लोकांना त्यांचे आक्षेप व सूचना येत्या 30 दिवसांच्या आत गोवा राज्य निवडणूक आयोगाच्या आल्तिनो येथील कार्यालयात लेखी स्वरूपात देण्याची सूचना केली आहे. या प्रभाग पुनर्रचनेद्वारे नगरपालिकेच्या प्रभागांच्या सीमा मसुद्यातून निश्चित करण्यात आलेल्या आहेत. येत्या नगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीने ही प्रभाग पुनर्रचना आवश्यक व गरजेची आहे.
वरील नगरपालिकांचा कार्यकाळ यापूर्वीच संपलेला असून सध्या या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. डिचोली, कुडचडे- काकोडा, कोणकाण व पेडणे या पालिका कार्यकाळ 1 एप्रिल 2026 रोजी संपला. वाळपई नगरपालिकेचा कार्यकाळ 9 एप्रिल रोजी संपला. तर मुरगाव, म्हापसा व मडगाव नगरपालिकांचा कार्यकाळ 26 एप्रिल रोजी संपला आहे. डिचोली, कुडचडे-काकोडा, काणकोण व पेडणे या पालिकांवर 1 एप्रिल रोजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली. कुंकळ्ळी पालिकेवर 6 एप्रिल रोजी, वाळपई पालिकेवर 9 एप्रिल रोजी, मडगाव, मुरगाव व म्हापसा नगरपालिकांवर 27 मे रोजी प्रशासकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. मडगाव पालिकेवर प्रशासक म्हणून दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीनाथ कोठावले यांची, मुरगाव नगरपालिकेवर नागरी पुरवठा संचालक जयंत तारी तर म्हापसा पालिकेवर अतिरिक्त पंचायत संचालक फियोना कार्दोज यांची नियुक्ती झालेली आहे. राज्य निवडणूक आयोगाने गोवा नगरपालिका निवडणुकांसाठीची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

