Home बातम्या पालिका निवडणूक : साखळीत ८४ % तर फोंड्यात ७३.३२ % मतदान

पालिका निवडणूक : साखळीत ८४ % तर फोंड्यात ७३.३२ % मतदान

0

सांखळी नगरपालिकेच्या ११ वॉर्डांसाठी काल झालेल्या मतदानात ८४ टक्के मतदान झाले. ५३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य काल मतपेटीत सीलबंद झाले आहे. मतदान पूर्ण शांततेने झाल्याचे निर्वाचन अधिकारी तथा डिचोलीचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी सांगितले.

काल सकाळी ८ वाजता ११ मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सकाळी ८ ते ११ दरम्यान मतदान केंद्रावर मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बरीच गर्दी केल्याने मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र दुपारनंतर मतदानासाठीचा उत्साह कमी झाला. काही मतदान केंद्रावर १२ वाजेपर्यंत अंदाजे ६५ टक्के मतदान झाले होते. उपलब्ध माहितीनुसार दुपारी दोन वाजेपर्यंत ११ वॉर्डासाठी मिळून एकूण ६७% मतदानाची नोंद झाली होती.

अनेक ठिकाणी लग्न-मूंजीच्या समारंभांना लोकांना उपस्थित रहाण्याचे असल्याने लोकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यावर भर दिला. तथापि काही प्रमाणांत मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया कांही उमेदवारांनी बोलून दाखविली.मतदानाचे काम पूर्ण झाल्यानंतर सीलबंद मतपेट्या डिचोली येथील नगरपालिका सभागृहांत पोलीस बंदोबस्तात आणून ठेवण्यात आल्या. त्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोणताही अनुचित प्रकार न घडता साखळी पालिकेसाठीचे मतदान पूर्ण शांततेने पार पडले, असे निर्वाचन अधिकारी तथा डिचोलीचे उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी सांगितले.

काल सकाळी ८ वाजता डिचोली नगरपालिका सभागृहात मतमोजणीचे काम सुरू होईल. वॉर्डानुसार मतमोजणीचे काम पूर्ण होईल तसे निकाल घोषित करण्यात येतील. दुपारपर्यंत मतमोजणीचे काम पूर्ण होऊन सर्व ११ वॉर्डाचे निकाल घोषित होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

मतमोजणी सभागृहांत मतमोजणी कामासाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मतमोजणी सभागृहाबाहेर चोख पोलीस बंदोबस्ताची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

एकूण अकरा वॉर्ड पैकी वॉर्ड क्रमांक २, ५, ८ व ११ महिलासाठी राखीव आहेत. तर वॉर्ड क्र. ६ व १० इतर मागास जातीसाठी आणि वॉर्ड क्र. १ अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

फोंडा

संपूर्ण गोव्याचं लक्ष लागून राहिलेल्या फोंडा नगरपालिका मंडळासाठी १४ प्रभागासाठी काल मतदान शांततेत पार पाडले. एकूण ७३.३२% असे विक्रमी मतदान झाले.

प्रभाग क्रमांक १मध्ये ७४.३%, प्रभाग क्रमांक २मध्ये ६२.७९% प्रभाग ३मध्ये ७३.४२%, प्रभाग ४मध्ये दुहेरी लढत असून तेथे सर्वात जास्त म्हणजे ७९.४१% मतदान झालेले आहे. प्रभाग ५मध्ये ७१.५२ टक्के, प्रभाग ६मध्ये ७५.१६ टक्के, प्रभाग ७मध्ये ७७.३९ टक्के, प्रभाग ८मध्ये ७१.८५ टक्के, प्रभाग ९मध्ये ७२.३१ टक्के, प्रभाग १०मध्ये ७४.२५ टक्के, प्रभाग ११मध्ये ७५.४० टक्के, प्रभाग १२मध्ये ७३.८३ टक्के, प्रभाग १३मध्ये ७३.८३ टक्के व प्रभाग १४मध्ये ६५.७० टक्के मतदान झाले. १४ प्रभागात एकूण १५,५२६ इतके मतदार आहेत.

प्रत्येक प्रभागात चुरस दिसून आली. सुव्यवस्था राखण्यासाठी फोंडा पालिका निवडणुकीत प्रथमच जादा पोलीस कुमक पाहायला मिळाली. १४ जागांसाठी एकुण ६० उमेदवारांनी आपल्या नशिबाची बाजी लावून प्रचार केलेला आहे. प्रभाग ४कडे लोकांचे लक्ष अधिक आहे. येथे माजी नगराध्यक्ष व्यंकटेश उर्फ दादा नाईक व माजी मुख्यमंत्र्याचे सुपूत्र रॉय नाईक अशी दुरंगी सरळ लढत आहे. रॉय नाईक यांनी प्रथमच निवडणुकीत भाग घेतला आहे. मगोप व भाजप युतीच्या १४ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, साबांखा मंत्री सुदीन ढवळीकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, सहकारमंत्री दीपक ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, कायदा खात्याचे ऍड. नरेंद्र सावईकर व दोन्ही पक्षांच्या नेत्यानी सक्रीय भाग घेतला त्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्‍न झालेला आहे. फोंडा विकास समितीच्या मागे फक्त माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा पाठिेंबा असला तरी कॉंग्रेस पक्षाने निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही. समितीने १३ उमेदवार उभे केले आहे तर एका उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. १४ही उमेदवार निवडून येतील म्हणून युतीने दावा केला आहे तर विकास समितीने तसाच दावा केला आहे.