दरम्यान, माजी मंत्री जुझे फिलिप डिसोझा यांनी काल पत्रकार परिषद घेऊन सात दिवसांच्या आत आरोपीला जेरबंद न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. वास्को उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच एम. पी. टी. व्यवस्थापनाकडून कसल्याच ठोस कृतीची माहिती न मिळाल्यामुळे सात वर्षांच्या मुलींवर झालेल्या बलात्काराचा निषेध म्हणून शाळेच्या पालकांनी आज १७ जानेवारी रोजी हेडलॅण्ड सडा येथून आठ वाजता शांतता मोर्चाचे आयोजन केले असल्याचे काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकांनी सांगितले. यावेळी फिलोमेना परेरा, जगन्नाथ सातार्डेकर, वेरिसीयो फर्नांडिस, अनिल काणकोणकर, मार्टिन फर्नांडिस, जोनिता लेनीस, आल्फीया तसेच अन्य पालक उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत पालकांनी मुलीच्या बलात्काराला व्यवस्थापन तसेच मुख्याध्यापिका, वर्गशिक्षक यांना जबाबदार ठरवले आहे. पालकांचे म्हणणे आहे की, ४८ तास उलटून झाले तरीही आरोपी कसा सापडत नाही. यासाठी उपजिल्हाधिकारी आणि शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क करण्याचा त्यांनी प्रयत्न केले, परंतु कोणीच त्यांना समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. उलट व्यवस्थापनाच्यावतीने असे सांगण्यात आले की, आपली सुरक्षा व्यवस्था जर पसंत नसेल तर तुम्ही पालकांनीच ती जबाबदारी घ्यावी. सदर घटनेमुळे पालक चिडले असून त्यांनी या बलात्काराला वाचा फोडण्यासाठी सगळ्या नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
पालकांनी व्यवस्थापनाला सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यास सांगितले, असता त्याला एका महिन्याचा अवधी लागेल असे सांगण्यात आले. पालकांनी शाळेचे कंपाऊंड उंच करावे, सुरक्षा व्यवस्था बदलावी, मुख्याध्यापिकेचे कार्यालय खाली आणावे तसेच उपस्थित शिक्षक, आया, सुरक्षा रक्षक, मुख्याध्यापिका यांची कसून चौकशी करावी, पिडीत मुलीला आर्थिक मदतीपेक्षा न्याय द्यावा, अशा मागण्या पालकांनी यावेळी केल्या.
माजी मंत्री डिसोझा यांचा इशारा
सात वर्षाच्या शालेय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आपण कुठेही तपासकार्यात हस्तक्षेप करणार नसून येत्या सात दिवसांच्या आत मुख्य आरोपीला अटक न झाल्यास वास्कोतील नागरिकांच्यावतीने प्रखर आंदोलन उभारणार असून याची संपूर्ण जबाबदारी गोवा सरकार आणि पोलीस खात्यावर राहील, असा इशारा माजी महसूल मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी काल दिला.
वरील घटनेच्या पार्श्वभूमीवर वास्कोतील नागरिकांच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डिसोझा यांनी वरील इशारा दिला. यावेळी मच्छीमार ट्रॉलर सोसायटी तसेच होडी व रापणकार संघटनेचे सॅबी डिसोझा, नगरसेवक पाश्कॉल डिसोझा, सुनिता लांरेझ, नॅनी डिसोझा, सोनिया डिचोलकर, तसेच विविध महिला मंडळ प्रमुख उपस्थित होत्या.
पुढे बोलताना डिसोझा म्हणाले की, सदर मुलीच्या आई–वडिलांवर कोसळलेल्या संकटामध्ये वास्कोतील नागरिक सहभागी आहेत. एवढ्या कोवळ्या मुलीबरोबर झालेल्या अत्याचाराने सर्वांची मान शरमेने खाली गेली आहे. अशा वेळी कुठल्याही प्रकारचे राजकारण घुसडविण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसेच कुठल्याही नेत्याचा इतिहास किंवा पार्श्वभूमीचा पाढा वाचण्याऐवजी सर्वांनी एकत्र येऊन आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. सरकारने याप्रकरणी येत्या सात दिवसांमध्ये आरोपीला गजाआड न केल्यास वास्कोतील नागरीकांसह रस्त्यावर येऊन प्रखर आंदोलन उभारण्यात येईल. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी पोलीस आणि सरकारवर राहील असा स्पष्ट इशारा त्यानी यावेळी दिला.
वास्कोमध्ये आतापर्यंत दोन महिलांचे झालेले खून, चोर्या, दरोडे यापैकी एकाही प्रकरणाचा वास्को पोलीस तपास लावू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांची अकार्यक्षमता सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून आवश्यकता असल्यास आणखी पोलीस देण्याची मागणी त्यांनी केली. प्रत्येक शाळांमधून सी.सी.टी.व्ही कॅमेरा सक्ती करणारा आदेश त्वरित जारी करण्याची मागणी करताना शाळेजवळ घोळक्यांनी फिरणार्या बेकार युवकांना तंबी देऊन तेथून हाकलून लावण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. नगरसेविका नॅनी डिसोझा यांनी शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी करून शाळा सुटण्याच्या वेळी प्रवेशद्वारासमोर जमून विद्यार्थ्यांची छेड काढणार्या बाहेरच्या मुलांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. १४ जानेवारी गोव्याच्या इतिहासामध्ये लहान मुलींसाठी काळा दिवस ठरल्याचे त्या म्हणाल्या. वैयक्तिक पातळीवर टीका करण्याऐवजी त्या मुलीला न्याय देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन डिसोझा यांनी यावेळी केले.
संशयिताचे नवे रेखाचित्र
सडा–वास्को येथील शाळेत साडे सात वर्षांच्या मुलीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी काल नव्याने संशयिताचे रेखाचित्र जारी केले आहे. दरम्यान संशयिताची माहिती देणार्यास ५० हजार रु. बक्षिसही राज्याच्या पोलिस महानिरीक्षकांनी जाहीर केले आहे.

