अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचे प्रतिपादन; गोवा पुस्तक महोत्सवात रंगली मुलाखत
पालकांनी वाचन संस्कृतीचा अंगीकार करावा म्हणजे मुले आपणच वाचन संस्कृतीकडे वळतील. आजच्या काळात मुले वाचन कमी करतात अशी तक्रार केली जाते. तथापि, आजच्या काळात मुले त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून सर्रास वाचन करतात. पालकांनी मोबाईलचा वापर करणाऱ्या मुलांना काय वाचावे याबाबत योग्य मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी गोवा पुस्तक महोत्सवात एका मुलाखतीमध्ये बोलताना कांपाल पणजी येथे काल केले.
गोवा पुस्तक महोत्सवात मृणाल कुलकर्णी यांच्याशी संजय चाकणे यांनी संवाद साधला. मुलांना वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. घरात पुस्तके आणून मुलांना वाचनाची गोडी लावली पाहिजे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
आपणाला हवे असलेले आवडीचे विषय हाताळण्यासाठी लेखिका, दिग्दर्शक आणि निर्माता बनण्याचा निर्णय घेतला. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ ह्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद लाभला. अनेक पुरस्कार सुध्दा प्राप्त झाले. त्यामुळे आत्मविश्वास निर्माण झाला, असेही त्यांनी सांगितले. शिवराय अष्टक अशा आठ चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. त्यातील रणपती शिवराय स्वारी आग्रा या सहावा चित्रपट शुक्रवार दि. 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे, असेही त्यांनी सांगितले.