पारोडा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली

0
173

>> सांगेत पावसाचा कहर; केपे – मडगाव रस्ताही पाण्यात

गुरुवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने केपे तालुक्याला झोडपून काढल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पारोडा (केपे) येथील कुशावती नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याबरोबरच केपे ते मडगाव रस्ताही पाण्याखाली गेल्याने सकाळपासून दुपारपर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. यामुळे सकाळी मडगावला कामाला जाणार्‍या लोकांची तारांबळ उडाली.
रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीच्या पाण्यात वाढ झाली. कुशावती दुथडी भरून वाहू लागल्याने पारोडा येथील कुशावती नदीवर असलेला पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाणारे लोक अडून पडले. यामुळे अवेडे – कोठंबी या भागातील लोकांना पारोडा मार्गे न येता चांदरमार्गे जावे लागले. केपे ते मडगाव हा मुख्य रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे खोळंबली. त्यामुळे सकाळी सावर्डे, कुडचडे, नेत्रावळी, सांगे, केपे या भागातून मडगावला जाणार्‍या लोकांना अनंत त्रास सहन करावे लागले. पर्यायी व्यवस्था म्हणून लोकांना चांदर – गुडी मार्गे जावे लागले. मात्र, बसमधून जाणारे लोक केपे – मडगाव रस्ता बंद पडल्याने अडून पडले. शेवटी दुपारपर्यंत मुख्य रस्त्यावरील पाणी कमी झाल्यानंतर केपे – मडगाव वाहतूक सुरळीत झाली. दरवर्षी मुसळधार पाऊस पडल्यानंतर पारोडा येथील मुख्य रस्ता व पूल पाण्याखाली जात असतो. मात्र, आजपर्यंत प्रशासनाने उपाययोजना करण्याकरता कोणतीच पावले उचललेली नाहीत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पारोडा पुलाची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले होते. मात्र, चार वर्षे उलटूनही कोणतीच पावले उचलली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.