Home बातम्या पारपत्र पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी जाणार

पारपत्र पडताळणीसाठी पोलीस अर्जदाराच्या घरी जाणार

0

पोलीस महासंचालकांकडून आदेश

पारपत्रासाठीच्या अर्जदारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमीसाठीची पडताळणी करण्यासाठी पोलीस अर्जदारांना पोलीस स्थानकावर बोलावतात ही पद्धत योग्य नसल्याचे मुख्य पारपत्र अधिकारी मुल्तेश परदेसी यांनी गेल्या शनिवारी येथे विधान केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पोलीस महासंचालक किशनकुमार यांनी त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी यापुढे पारपत्रासाठीच्या अर्जदारांना अशाप्रकारे पोलीस स्थानकावर बोलावू नये, असा आदेश काढला.

यापुढे सीआयडी विभागातील अधिकारी पारपत्र अर्जदारांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांच्याशी भेटीचा वेळ ठरवतील व सर्व प्रकारची पडताळणी करण्यासाठी ते स्वत: अर्जदाराच्या घरी जातील. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अर्जदाराला वरील कामासाठी पोलीस स्थानकावर बोलावले जाऊ नये, असे काल जारी केलेल्या आपल्या आदेशातून पोलीस महासंचालक किशन कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या अनुषंगाने आवश्यक ते सर्व आदेश महासंचालकाच्या कार्यालयातून संबंधितांना यापूर्वीच देण्यात आले आहेत.

पारपत्रासाठीच्या एखाद्या अर्जदाराला जर पोलिसांनी पोलीस स्थानकावर बोलावले तर सदर अर्जदाराने आपल्या ज्ञळीहरपर्ज्ञीारी४ींहगरपऽसारळश्र.लेा या ईमेल आयडीवर तक्रार पाठवावी, असेही त्यांनी कळवले आहे.