29 C
Panjim
Sunday, October 25, 2020

पायलट परतले, पण..

राजस्थानातील कॉंग्रेसचे तरुण तुर्क नेते सचिन पायलट यांचे भरकटलेले आणि ज्योतिरादित्य शिंद्यांच्या पावलावर पाऊल टाकत भविष्यात भाजपच्या विमानतळावर उतरू पाहणारे विमान अखेर निमूटपणे कॉंग्रेसच्या गोटात परतले आहे. ‘प्रशासकीय बाबींवर पक्षांतर्गत आवाज उठवणे म्हणजे बंडखोरी नव्हे’ असे भले ते आता परत जाताना म्हणत असले, तरी ज्या प्रकारे त्यांनी राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील आपल्या पक्षाचे सरकार पाडण्यासाठी जिवाचा आटापिटा केला, आमदारांची फोडाफोडी आणि जमवाजमव केली, शक्तिप्रदर्शन करविले, भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ मदतीने परराज्यात जाऊन हालचाली केल्या ते पाहिले तर याला बंडच म्हणावे लागते. मात्र, राजकारणात पायलट यांच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त पाहिलेल्या गहलोत यांनी आपल्या पाठीशी शेशंभर कॉंग्रेस आमदारांचे पाठबळ कायम ठेवल्याने सचिन पायलट यांना जेमतेम अठरा आमदारांनिशी हात चोळत बसावे लागले. त्यामुळे नामुष्कीजनक परिस्थितीत गेला महिनाभर वावरलेल्या पायलटांना विधिमंडळात गहलोत यांचा बहुमताचा ठराव मतदानाला येण्याआधीच आपले विमान मागे फिरवावे लागले आहे.
मध्य प्रदेशमध्ये अशाच बंडात पुरेपूर हात पोळले गेलेल्या कॉंग्रेस पक्षाने या बंडखोरीबाबत ताठर भूमिका घेत त्यांना सरळसरळ बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यांना भेट नाकारण्यात आली होती, त्यांचे उपमुख्यमंत्रिपद आणि प्रदेश अध्यक्षपदही काढून घेण्यात आले होते. मात्र, आता आपल्या या युवा नेत्याच्या मदतीस प्रियांका गांधी धावल्या आणि त्यांनी समेट घडवून आणला आहे. यातून पक्ष सरचिटणीस पदावर असलेल्या प्रियांकांची प्रतिमा उजळली आहे किंवा पद्धतशीरपणे उजळविण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांच्या मागे पक्षाची कमान सांभाळण्यात राहुल गांधी यांना आजवर सतत घोर अपयश येत राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रियांका यांचे अशा प्रकारे समेटासाठी पुढे येणे, राहुल आणि सचिन पायलट यांची भेट घडवून आणण्यात आणि समेट करण्यात पुढाकार घेणे यातून काही महत्त्वपूर्ण संकेत मिळतात. सोनियांचा वारसा पेलण्यासाठी प्रियांका सक्षम आहेत असा संदेश यातून पक्षजनांमध्ये गेलेला आहे आणि भविष्यात त्यांची ही संकटमोचकाची भूमिका त्यांना अधिक महत्त्वाची जबाबदारी देण्यास कारण ठरू शकते.
सचिन पायलट यांनी काल माघारी येताना आपण बंड केलेच नव्हते असा आव जरी आणला असला, तरी गेला महिनाभर त्यांनी केलेला सत्तांतराचा खटाटोप लक्षात घेता या सार्‍या घटनाक्रमातून त्यांची प्रतिमा निश्‍चितच कलंकित झाली आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर असताना यांना सत्तास्थापनेची स्वप्ने पडत होती. एवढी सत्ताभिलाशा घेऊन वावरणार्‍या या नेत्याची पक्षात गळचेपी झाल्याची भावना कितीही वाजवी जरी असली, तरी त्यांनी निवडलेली बंडाची वेळ चुकीचीच होती. प्रियांका आणि राहुल यांनी आपल्या या तरुण तुर्क सहकार्‍याला पक्षामध्ये पुन्हा जरी आणले असले तरी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काल त्यांचे ज्या प्रकारे थंडे स्वागत केले, ते पाहिले तर वरकरणी जरी हा संघर्ष आता संपुष्टात आल्यासारखे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तो संपलेला नाही हेच स्पष्ट होते आहे. पक्षात कायम राहिलेल्या पायलटांना दिल्लीत हारतुरे मिळाले, परंतु कर्मभूमीत परतल्यावर मात्र गहलोत यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवत काल जैसलमेर गाठले यातच सारे काही आले आहे. गहलोत यांनी पायलट यांची ‘निकम्मा’ आणि ‘नकारा’ अशी शेलकी संभावना काही दिवसांपूर्वी केली होती. आपले सरकार पाडायला निघालेल्या या पोराची आपण कशी जिरवली असाच भाव गहलोत यांच्या मनामध्ये याक्षणी असेल यात शंका नाही. त्यामुळे पायलट जरी पक्षात परतलेे असले तरी फसलेल्या बंडाळीची नामुष्की घेऊन आलेले आहेत. त्यांची पक्षामध्ये पुनःप्रस्थापना करण्याचे आता राहुल – प्रियांकांकडून प्रयत्न जरूर होतील, परंतु राजस्थानात त्यांना कितपत वाव दिला जाईल याबाबत साशंकता आहे. केंद्रीय पक्षकारणात त्यांना अधिक मानाचे स्थान बहुधा दिले जाईल, परंतु राजस्थानाची सत्ताकमान त्यांच्याकडे जाणे कठीण आहे. कॉंग्रेसमधील जुन्या आणि नव्यांच्या या धुमाळीत आपला कार्यभाग साधू पाहणार्‍या भाजपाला मात्र तोंडघशी पडावे लागले. सचिन यांना स्वतःचे अस्तित्व स्वतंत्र ठेवून भाजपच्या साथीने सत्ता मिळवायची होती, परंतु ते साध्य होत नाही हे कळून चुकल्यानेच त्यांना विमान माघारी वळवावे लागले आहे. ‘सुबहका भूला श्याम वापस घर आए तो उसे भुला नही कहते’ हे म्हणायला छान असले तरी प्रत्यक्षामध्ये या बंडखोरीने गहलोत यांच्यावर उमटलेले ओरखडे सहजासहजी बुजणारे नसतील.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मनिर्भर भारत

प्रदीप गोविंद मसुरकर(मुख्याध्यापक) प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या क्षमता आणि आवडीनिवडी असतात. त्याप्रमाणे आम्ही डोळसपणे वातावरणनिर्मिती केल्यास ते चांगले वक्ते,...

रंग पत्रांचे…

सौ. प्राजक्ता प्र. गावकर(नगरगाव-वाळपई) पत्र ते पत्रच. त्याची जागा कुणीही घेऊ शकणार नाही. सीमेवर तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला...

शुभाशुभ शकुन (?)

नारायण बर्वे शुभाशुभ शकुन होतच असतात. आपल्याला पूर्वकल्पना येते येवढेच. असेकाही पूर्वसंकेत मिळाले तरी घाबरून न जाता संकटाशी...

थोडं मुक्त.. थोडं बद्ध..

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर(फोंडा) स्त्रीने खरं तर स्त्रीच असावं. तिने पुरुषाप्रमाणे वागूच नये. जुन्या चालीरीती झुगारून देऊ...

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

ALSO IN THIS SECTION

अपरिहार्य

गंभीर आर्थिक संकटाला सतत सामोरे जात असलेल्या राज्य सरकारने अखेर लाडली लक्ष्मी या आपल्या लोकप्रिय योजनेसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा आठ लाख रुपयांवरून...

वजाबाकी

आयआयटी प्रकल्पावरून झालेल्या आरोप - प्रत्यारोपांनंतर अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी राज्यातील डॉ. प्रमोद सावंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अर्थात, सत्तावीस आमदारांचे...

पंतप्रधानांचा इशारा

पक्की खेत देखिके, गरब किया किसान | अजहूं झोला बहुत है, घर आवै तब जान ॥ हा कबिराचा दोहा उद्धृत करीत पंतप्रधान...

विषवल्ली

केरी - पेडणे येथे एक कोटीचा अमली पदार्थ नुकताच जप्त करण्यात आला. घरामध्येच अमली वनस्पतींची लागवड करून मालामाल होण्याचे हे तंत्र आजवर...

कोरोनाची घसरण

गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून गेले काही दिवस कोरोनाच्या फैलावाने गोव्यासह देशामध्ये थोडी उसंत घेतल्याचे पाहायला मिळते आहे. मागील...