पाणी बिल दरवाढ अंमलबजावणी तूर्त स्थगित ठेवणार ः पाऊसकर

0
145

सार्वजनिक बांधकाम खात्याने नव्याने जारी केलेल्या पाणी बिल दरवाढीची अंमलबजावणी तूर्त स्थगित ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. सार्वजनिक बांधकाम खात्याने पाणी बिलात दरवाढ जाहीर केल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केल्यानंतर पाणी बिल दरवाढ तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी सार्वजनिक बांधकाम खात्यातील विविध कामांबाबत चर्चा केल्यानंतर पाऊसकर बोलत होते. मुख्यमंत्री सावंत यांच्याशी पाणी बिल दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली असून दरवाढीची अंमलबजावणी केली जाणार नाही. २०१५ मध्ये पाणी बिल दरवाढ केली होती. मागील अर्थसंकल्पात दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे पत्रादेवी ते करासवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणे शक्य नाही. सदर काम पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

झुवारी पुलासाठी चीनमधून
सामान आणणार
झुवारी पुलाचे काम फेब्रुवारी २०२१ मध्ये पूर्ण केले जाणार आहे. या पुलासाठी पर्यायी सल्लागार देण्याबाबत विचार केला जात आहे. या पुलाचे काही सामान चीनमधून आणले जाणार आहे. त्यावर विचार विनिमय केला जात आहे, असेही मंत्री पाऊसकर यांनी सांगितले.