पाडी-बार्शे येथे अपघातात दोघांचा मृत्यू

0
2

व्हॉल्वो बसची दुचाकीला धडक

बसचालकाला अटक, बस ताब्यात

कुंकळ्ळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पाडी बार्शे याठिकाणी बुधवारी रात्री व्हॉल्वो बसची धडक बसल्यामुळे दोन तरुणांचा मृत्यू झाला. पाडी बार्शे येथील एका वळणावर हा अपघात घडला. या अपघातात दिलीप वेळीप (38) व संदेश गावकर (27) यांचा मृत्यू झाला. कुंकळ्ळी पोलिसांनी या प्रकरणी राजेश शिवोल्ली (55) या बसचालकाला यल्लापूर कर्नाटक येथून ताब्यात घेऊन अटक केली असून सदर अपघातास कारणीभूत ठरलेली बसही जप्त केली आहे. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली.

दुचाकीवरून कामाला जात असताना पाडी (बार्से) येथे वळणावर मडगाव येथून बंगळुरू येथे जात असलेल्या या व्हॉल्वो बसने धडक दिल्याने दुचाकीवरील दिलीप वेळीप व संदेश गावकर या गोकुल्डे-बासे येथील दोघांचा मृत्यू झाला. हे दोघेही रात्री कामावर जात होते. त्यावेळी पाडी बार्से येथील वळणावर बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बसची धडक या दुचाकीला बसली. यात दिलीप व संदेश हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सदर खासगी बसचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, जखमींना बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र, तोवर त्यांचा त्यांचा मृत्यू झाला होता. कुंकळ्ळी पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदेश हा दुचाकी चालवीत होता व दिलीप मागे बसला होता व बस मडगावहून बंगळुरूला जात होती. अपघातात दिलीप याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर संदेश याला इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य सावंत पुढील तपास करीत आहे. दिलीप वेळीप हा एका इंग्रजी दैनिकाचे पत्रकार सोयरू वेळीप यांचा भाऊ आहे.

बसचालकाचे पलायन
अपघाताचे वृत्त समजताच कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे निरीक्षक डायगो ग्रासियश घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी गावातील लोकही घटनास्थळी दाखल झाले होते. ग्रामस्थांनी बसचालकाला शोधून अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी त्वरित फोनवरुन काणकोण पोलिसांना बसचा पत्ता लावण्यास सांगितले. परंतु तोवर बस गोव्याची पोळे सीमा पार करून कर्नाटकात पोहोचली होती. पोलिसांनी बेंगळुरू मार्गावरील सर्व पोलीस स्थानकांना सदर घटनेची माहिती दिली. शेवटी रात्री उशिरा यल्लापूर येथे बस पकडली व चालकाला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी त्वरित पोलीस पथकसह यल्लापूर गाठले व पहाटे चालकाला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. चालकाचे नाव राजेश शिवोली असे असून तो शिरवय केपे येथील आहे. त्यानंतर बसचालकावर गुन्हा नोंद करून त्याला रितसर अटक केलेली आहे.