वारसा व ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी साधनसुविधा उभारणे या योजनेखाली पाटो-पणजी येथे १२ कोटी रु. खर्चून इन्फॉर्मेशन प्लाझा उभारण्यात येणार असून ते काम मेसर्स आर. बी. एम. खांडेपारकर, फोंडा याना देण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी काल प्रश्नोत्तराच्या तासाला विधानसभेत दिली. विश्वजित राणे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. पर्यटनविषयक किती प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला होता.
त्यावर पुढे बोलताना पणजी येथे पर्यटन जेटी, पाटो येथे बहुमजली कार पार्किंग, सर्व राज्यांना त्यांची कार्यालये थाटण्यासाठीचा पर्यटन प्रकल्प, हॉटेल मॅनजमेंट ऍण्ड कॅटरिंग टॅक्नॉलॉजी, मडगाव येथे प्रेक्षागृह आणि परिषदगृह, कोलवा येथे कोस्टल सर्किट, पणजी येथे गोवा हाट, बागा किनार्याचा पर्यटनदृष्ट्या विकास, मिरामार सर्किट, कोलवाळ सर्किट, टेली पर्यटन असे प्रकल्प केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती परुळेकर यांनी दिली.
पैकी इन्फॉर्मेशन प्लाझा, पर्यटन जेटी व बहुमजली कार पार्किंग यांचे काम करण्यासाठी यापूर्वीच निविदा देऊन कंपन्यांची निवड करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. अन्य प्रकल्पांचे अंदाज खर्च तयार करणे, निविदा काढणे अशी कामे चालू असल्याचे ते म्हणाले.

