– कमलाकांत नाईक, भोमवाडा, मेणकुरे
पाटणेकरांचे काय चुकले? हे २६ सप्टेंबरचे प्रताप उगवेकर यांचे ‘वाचकीय’ या सदराखालील पत्र वाचनात आले. ते वाचून उगवेकर हे दुतोंडीपणाची भाषा वापरून ‘तो मी नव्हेच’ची भूमिका वेळोवेळी वठवीत असतात हे दिसून येते. हे न समजण्याइतकी डिचोली मतदारसंघाची जनता तथा मतदार निश्चितच दुधखुळी नाही हे उगवेकरांनी प्रथम ध्यानात ठेवावे.
एखाद्या उमेदवाराचे किंवा राजकारण्यांचे आपल्या स्वार्थासाठी पोकळ गोडवे गाऊन एक प्रतिष्ठित पत्रलेखक म्हणून प्रसिद्धी मिळविण्याचा त्यांचा मुख्य उद्देश दिसतो. आजपर्यंत ते कुठल्याही पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले नाहीत. वाहत्या वार्याप्रमाणे सूप धरून आपले ईप्सित साधणे इतकाच त्यांच्या पत्रलेखनाचा उद्देश असतो. आजपर्यंत त्यांनी राजकारण्याप्रमाणे अनेक पक्ष बदलत त्यांचे गुणगान गात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस पक्ष अशा पक्षांत प्रवास करून आता भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राजेश पाटणेकरांबरोबर कॉंग्रेस पक्षात दाखल झाल्याचे ‘पाटणेकरांचे काय चुकले’ या त्यांच्या पत्रावरून सिद्ध होते.
सांगावयाचा मुद्दा म्हणजे दोन वर्षांपूर्वी मी ‘नवप्रभे’त ‘राजेश पाटणेकर यांनी डिचोलीच्या विकासासाठी अवश्य कॉंग्रेसमध्ये जावे’ असा लेख लिहिला होता. डिचोली कॉंग्रेस गट समितीचे अध्यक्ष नरेश सावळ यांना तो खटकल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी माझ्या विरोधात लिखाण करून मला अनेक आव्हाने देण्यात आली होती. त्याला मी उत्तरे दिली होती. अशा समयी प्रताप उगवेकर यांनी त्यांच्या मदतीला धावून जात नरेश सावळ यांची तळी उचलून धरून माझ्या तसेच राजेश पाटणेकरांच्या विरोधात लेख लिहून पाटणेकर डिचोलीच्या विकासाकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्यांच्या खांद्यावर हात घालून फिरत असतात, लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळतात, कुणाच्याही लग्नाला, वाढदिवसाला, बारश्याला जात-येत असतात, अशा शब्दांत त्यांची खिल्ली उडवून निर्भत्सना केली होती. तेच प्रताप महाशय आज राजेश पाटणेकर भारतीय जनता पक्षातून कॉंग्रेस पक्षात गेल्यावर ‘पाटणेकरांचे काय चुकले?’ असा डिचोली मतदारसंघाच्या मतदारांना सवाल करून स्वतःचे हसे करून घेतात.
माझा प्रताप उगेवकरांना प्रतिसवाल आहे की, ज्यावेळी राजेश पाटणेकरांनी डिचोलीच्या विकासासाठी कॉंग्रेसमध्ये अवश्य जावे म्हणून मी लिहिले होते त्यावेळी माझे काय चुकले होते म्हणून आपण माझ्या तसेच पाटणेकरांच्या विरोधात लिहून निर्भत्सना केली होती? प्रताप उगवेकरांना सांगावेसे वाटते की, एखाद्या राजकीय व्यक्तीबद्दल आपण मागे काय लिहिले याचा विसर होऊ न देता लेखन करावे. पक्ष बदलूप्रमाणे दुतोंडीपणाची भाषा वापरून ‘तो मी नव्हेच’ची भूमिका वठवून डिचोली मतदारसंघाच्या मतदारांना इतके दुधखुळे समजू नये.
त्यावेळी मी लिहिलेल्या राजेश पाटणेकरांच्या समर्थनपर पत्राला विरोध दर्शवून नरेश सावळ काही कमी नाहीत असे समर्थन करणारे प्रताप उगवेकर नरेश यांची साथ सोडून अकस्मात राजेश पाटणेकरांचा कॉंग्रेस प्रवेश होताक्षणी पाटणेकरांचे समर्थनकर्ते कसे काय झाले? गुळाच्या ढेपीभोवती मुंगळे जमत असतात आणि ती खाऊन संपल्यावर दुसरीकडे वळतात त्याप्रमाणे काहींचे असते.
यदाकदाचित पुढे राजकारण्यांचे विचार बदलून कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जर कॉंग्रेस निष्ठावंतांचा विचार करून नरेश सावळांना डिचोलीची कॉंग्रेसची उमेदवारी देण्यात आली, तर प्रताप उगवेकर, नरेश सावळ यांची तळी उचलून धरून सावळांना कॉंग्रेस उमेदवारी मिळाली त्यात गैर काय, असे लिहून मोकळे होतील. म्हणजेच वारा येईल त्याप्रमाणे सूप धरण्याची उगवेकरांना सवय असावी. मी दोन वर्षांपूर्वी पाटणेकरांनी डिचोलीच्या विकासासाठी कॉंग्रेसमध्ये जावे असे लिहिले होते आणि प्रताप उगेवकर ते कॉंग्रेसमध्ये गेल्यावर पाटणेकरांचे काय चुकले, असे लिहितात, याला काय म्हणावे?
पाटणेकरांचे तसे खरेच चुकले. गेल्या दोन वर्षांपूर्वी जर ते कॉंग्रेसमध्ये गेले असते तर सहज पचून गेले असते. आणि दोन वर्षांत बराच विकास होऊन सुशिक्षितांना काही नोकर्याही मिळाल्या असत्या. आता विधानसभेच्या निवडणुका अवघ्या चार-पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना निवडणुकीच्या धामधुमीत कसला विकास होणार? नोकर्या तर नाहीतच, फक्त मते मिळविण्यासाठी पोकळ आश्वासनांची खैरात! उगवेकरांच्या म्हणण्यानुसार पाटणेकरांच्या कॉंग्रेस प्रवेशाने डिचोलीचा विकास होणार म्हटले तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर म्हणतात की, पाटणेकरांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचा प्रश्नच येत नाही. खरोखरच तसे घडले तर विकासाऐवजी डिचोली भकास तर होणार नाही ना?