एक महिला ठार : शेकडोंचे स्थलांतर
भारत-पाकिस्तान यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या भागांमध्ये पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रकार अखंडीतपणे चालूच असून शुक्रवारपासून भारतीय हद्दीतील विविध ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले असून एक महिलाही मृत्यूमुखी पडली. या व्यतिरिक्त ११ नागरिक जखमी झाले. तसेच या वाढत्या प्रकारांमुळे शेकडो भारतीयांनी या भागांमधून स्थलांतर केल्याचे वृत्त आहे. अनेक घरांचे नुकसान होण्यासह जनावरेही ठार झाली आहेत.दरम्यान, भारताने पाकिस्तानकडे मैत्रीचा हात पुढे केला असतानाही पाकिस्तानकडून भारतीय हद्दीतील चौक्या व वस्त्यांवर हल्ले होत असल्याबद्दल गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी खेद व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांत जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेलगत असलेल्या सुरक्षा दलांच्या चौक्या व नागरी वस्त्यांवर गोळीबार व उखळी तोफांचा जोरदार मारा पाक रेंजर्सकडून करण्यात आला.
शुक्रवारी रात्री पाक सैनिकांनी कन्हेया चौकीनजीक नियंत्रण रेषेलगत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यांनी रॉकेटमधून ग्रेनेडसही फेकले. यामुळे लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तसेच सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला.
कथुआ व सांबा क्षेत्रातील हल्ल्यांमध्ये झालेल्या अशाच हल्यात एक महिला ठार झाली. तर आठजण जखमी झाले.
सीमेनजीकच्या ग्रामीण वस्त्यांवरील या हल्ल्यांमुळे तेथील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली. सांबा व कथुआ जिल्ह्यातील १४०० नागरिकांना या हल्ल्यांमुळे अन्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्याचे अधिकार्यांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी याला दुजोरा दिला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही पाक सैन्याच्या या आक्रमणाला तोडीस तोड उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पहाटे ३ वा. हल्ले थांबले. मात्र त्यानंतर पुन्हा सकाळी ७ वा. हल्ले पुन्हा सुरू झाले.
हल्ले थांबण्याची आम्ही वाट पाहत असून या भागांमधून नागरिकांना हलविण्यासाठी वाहनेही तयार ठेवण्यात आल्याचे शर्मा यांनी सांगितले. लोक सध्या खंदकांमध्ये बसले असून बाहेर पडलेले नाहीत. २०१४ सालात पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाचे ५५० प्रकार घडले आहेत.

