पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कर्ता : एस. जयशंकर

0
5

>> भारताचे पाकवर जोरदार टीकास्त्र; एससीओच्या 2 दिवसीय परिषदेचा समारोप

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) दोन दिवसीय परिषदेचा काल समारोप झाला. दहशतवादाचा मुकाबला करणे, एससीओ संघटनेचा विस्तार आणि सुधारणा यावर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्यावरून पाकिस्तानला चांगलेच सुनावले. पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कर्ता, दहशतवादास खतपाणी घालणारा आणि दहशतवादाचीच बाजू उचलून धरणारा देश आहे. दहशतवादाचे प्रवक्तेपद मिरवणारे पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांच्या यासंदर्भातील भूमिका एससीओच्या बैठकीत खोडून काढण्यात आल्या, असे जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत काल स्पष्ट केले.
डॉ. जयशंकर यांनी एससीओच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दहशतवादास होणाऱ्या अर्थपुरवठ्यावरही भाष्य केले. पाकिस्तानची विश्वासार्हता त्याच्या परकीय गंगाजळीपेक्षा वेगाने कमी होत आहे. दहशतवादी कारवायांसाठी वित्तपुरवठा करणारी यंत्रणा कोणताही भेद न करता रोखली गेली पाहिजेे, असे जयशंकर यांनी सांगितले.

दुसऱ्या बाजूला जयशंकर यांनी चीनला देखील सूचक इशारा दिला. सीमावर्ती भागातील शांतता बिघडल्यास भारत आणि चीन यांच्यातील संबंध सामान्य होऊ शकत नाहीत, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. चीनचे परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या एक दिवसानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.

आमच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारताने सुरक्षित एससीओच्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले प्राधान्य दिले आहे. नवी दिल्ली येथे एससीओ शिखर परिषदेत आमच्या नेत्यांच्या मान्यतेसाठी कागदपत्रे वेळेवर अंतिम करण्यासाठी सदस्य राष्ट्रांचे समर्थन त्यांनी मागितले. या बैठकीत पाकिस्तान, चीन, रशिया व एससीओच्या इतर सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सहभाग घेत आपापल्या भूमिका मांडल्या.

गुन्हेगारांसोबत चर्चा नाही : जयशंकर
जे दहशतवादाला बळी पडले आहेत, ते दहशतवादावर चर्चा करण्यासाठी त्यांच्या गुन्हेगारांसोबत एकत्र बसू शकत नाहीत. झरदारी हे एससीओ सदस्य देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून भारतात आले होते. हा बहुपक्षीय मुत्सद्देगिरीचा भाग आहे आणि त्यापेक्षा त्याला जास्त महत्त्व नाही, असेही जयशंकर म्हणाले.

दहशतवादाकडे डोळेझाक करणे हानिकारक
दहशतवादाचा धोका कायम आहे आणि त्याकडे डोळेझाक करणे आपल्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरेल. दहशतवादाचे कधीही समर्थन होऊ शकत नाही, याचा पुनरुच्चार जयशंकर यांनी केला. सीमापार दहशतवादासह सर्व प्रकारच्या कारवाया थांबविला गेल्या पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.