पाकिस्तानात टीएलपी मोर्चावर गोळीबार, 280 जणांचा मृत्यू

0
16

पाकिस्तानमधील मुरीदके शहरात सोमवारी पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी मिळून मोठा नरसंहार केला. केवळ तीन तासांत 280 जणांचा मृत्यू झाला. या नरसंहारात 1900 हून अधिक निशस्र लोक गोळ्या लागल्याने जखमी झाले आहेत. तहरीक- ए -लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टर पंथी संघटनेवर हा गोळीबार करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील के शेखपुरा जिल्ह्यातील मुरीदके शहरात टीएलपी संघटनेने इस्लामाबादच्या दिशेने मोर्चा काढून अमेरिका आणि इस्राईलचा निषेध केला. त्यावेळी हा गोळीबार करण्यात आला.

भारतीय वेळेनुसार पहाटे 4 वाजता पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी लाहोरवरुन निघालेल्या आणि इस्लामाबादला चाललेल्या टीएलपीच्या हजारो कार्यकर्त्यांवर आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर हजारो निदर्शकांवर सकाळी 9 वाजेपर्यंत गोळीबार केला. रस्त्यावर टीएलपी निदर्शकांचे मृतदेह पडले होते. या वेळी पाकिस्तानी रेंजर्स आणि पोलिसांनी टीएलपी यांचे व्यासपीठही आग लावून जाळून टाकले. या गोळीबारात टीएलपीचे प्रमुख मौलाना साद हुसैन रिझवी यांना गोळी लागली असून ते स्टेजवर कोसळल्याचे म्हटले जात आहे.
टीएलपीने आतापर्यंत त्यांचे 250 हून अधिक कार्यकर्ते आणि नेते मारले गेले आहेत, तर 1,500 हून अधिक जखमी झाले असल्याचे म्हटले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.