तीन जवान, एक नागरिक जखमी
पूंछ भागात नियंत्रण रेषेवर काल पुन्हा पाकिस्तानकडून भारताच्या चौक्यांवर तुफान गोळीबार करण्यात आला. यात भारताचे तीन जवान व एक नागरिक जखमी झाले. गेल्या पाच दिवसांतील हे शस्त्रसंधीचे अकरावे उल्लंघन आहे. काल स्वातंत्र्यदिनी पहाटे ६.३० वा. हा गोळीबार सुरू झाला.
यावेळी रॉकेट्चा व मध्यम पल्ल्याच्या मॉर्टरचाही मारा करण्यात आला. एक मॉर्टर संज्योत भागात पडला, यात परवेझ नामक एक नागरिक जखमी झाला. सगळ्या जणांना सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले.
दरम्यान, एक रॉकेट बसोनिया गावात एका गोठ्यावर पडल्याने अनेक गुरे दगावली.
काल पहाटे पाकिस्तानच्याबाजूने गोळीबार सुरू झाल्यानंतर भारताकडूनही प्रत्युत्तरदाखल गोळीबार करण्यात आला. गोळीबार काल दुपारपर्यंत चालू होता.
जानेवारीपासून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ५७ घटना घडल्या असून पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांत दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.