पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पुन्हा एकदा असंतोष आणि निदर्शनांनी उग्र रूप धारण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या भागात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तसेच 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, आंदोलकांनी 25 सुरक्षा कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले आहे. या सैनिकांचा मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचे वृत्त आहे.
जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समितीकडून त्यांच्या पूर्ण न झालेल्या मागण्या संदर्भात ही निदर्शने सुरू आहेत. सोमवारपासून सुरू झालेल्या या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी सुरक्षा दलांनी बुधवारी निशस्त्र लोकांवर गोळीबार केला. त्यात आठ जण ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले होते. मूलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष केल्याचा आणि महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलक सरकारवर करत आहेत.

