पाकची कबुली

0
17

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्विततेबाबत आपल्याकडील विरोधी पक्षांकडूनच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात ह्या हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना जोरदार दणका बसलेला असल्याची कबुली आता जैश ए महंमदकडूनच आली आहे. जैश ए महंमदचा एक म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी मसूद इल्यास कश्मिरी हा नुकत्याच एका जाहीर सभेमध्ये फुशारक्या मारण्याच्या नादात बोलून गेला की बहावलपूरच्या जामिया मस्जीद सुभानअल्लावर भारताने चढवलेल्या हल्ल्यात जैशचा प्रमुख मौलाना मसुद अजहरच्या कुटुंबीयांच्या चिंधड्या उडाल्या. मसुद अजहरचा उदोउदो करण्याच्या नादात इल्यास कश्मिरी भारताच्या पराक्रमाची कथाच सुनावून गेला आहे. बैसरन हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी भारताने सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तानमधील बहावलपूर, मुरिदके, सर्जल, सवाईनाला, बिंबर, कोटली आदी जी नऊ ठिकाणे उडवून दिली, ती अगदी वर्मावर घाव घालणारी होती आणि अचूकपणे लक्ष्यांचा आपल्या क्षेपणास्त्रांनी वेध घेतला हेच इल्यास कश्मिरीच्या कबुलीतून सूचित होते. बहावलपूरमध्ये मौलाना मसूद अजहरचे कुटुंबीय, त्याचा भाऊ, त्याची बहीण, भावोजी, पुतण्या, पुतणी आणि चार साथीदार मिळून दहाजणांचा खात्मा झाल्याच्या बातम्यांस ह्या वक्तव्यातून पुष्टी मिळते. ह्या हल्ल्यानंतर स्वतः मसुद अजहरनेच आपले जवळचे नातेवाईक मारले गेल्याची कबुली दिली होती. भारतानेही हे ठासून सांगितले होते, परंतु त्यावर विश्वास ठेवण्याची काहींची तयारी नव्हती. आता खुद्द पाकिस्तानातून जैशच्याच एका दहशतवाद्याने ही कबुली दिलेली असल्याने ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाला खुद्द पाकिस्तानातूनच हा दुजोरा मिळाला आहे असे म्हणायला हरकत नाही. ह्या मोहिमेची अभूतपूर्वता आणि त्यामागचे अचाट साहस यांना दुर्लक्षित करण्यासाठी अमेरिकेच्या दबावाखाली ही मोहीम अचानक आवरती घेण्यात आल्याचे तुणतुणे काहीजण लावत असतात. त्यांना तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दर यांनी नुकतीच जी अल जझिरा वाहिनीला मुलाखत दिली आहे, त्यातूनच उत्तर मिळाले आहे. त्या मुलाखतीत इशाक दर सांगतात की अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबिओ यांच्याकडून आपल्याला 11 मे रोजी सकाळी 8 वाजून 17 मिनिटांनी फोन आला होता की पाकिस्तान आणि भारत ह्या दोन्ही देशांदरम्यान एका त्रयस्थ ठिकाणी लवकरच बोलणी होतील. मात्र, त्यासंदर्भात पुढे काहीच घडले नाही. शेवटी जुलैमध्ये जेव्हा ह्या रूबिओ यांच्याशी इशाक दर यांची भेट झाली, तेव्हा इशाक दर यांनी रूबिओ यांना प्रश्न विचारला की तुम्ही मध्यस्थी करणार होता त्याचे काय झाले, तर त्यावर रूबिओ यांनी त्यांना उत्तर दिले की भारत केवळ द्विपक्षीय चर्चेलाच तयार आहे. म्हणजेच भारताने अमेरिकेची मध्यस्थी धुडकावून लावली आहे हेच रूबिओ यांनी इशाक दर यांना सांगितले. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शांतीचे नोबेल पारितोषिक मिळवण्यासाठी जे हास्यास्पद दावे करीत सुटले आहे, त्याची पोलखोल आता पाकिस्तानकडूनच झाली असल्याचे दिसते. भारताने वारंवार अमेरिकेचा तो दावा फेटाळून लावला. आधी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने, नंतर स्वतः परराष्ट्रमंत्र्यांनी आणि शेवटी पंतप्रधानांनी संसदेमध्ये ठणकावून सांगितले की जगातील कोणत्याही नेत्याच्या मध्यस्थीचा स्वीकार भारताने केलेला नाही. तरीही केवळ ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश पडद्याआड ढकलण्यासाठी विरोधकांकडून तोच मुद्दा वारंवार उठवला जात आला आहे. त्यामुळे आता खुद्द पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांकडूनच त्याचा इन्कार झाला असल्याने किमान आता तरी त्या विषयावर पडदा पडेल अशी आशा आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ हा भारतीय सैन्यदलांचा पराक्रम आहे. त्याविषयी भलभलत्या शंकाकुशंका उपस्थित करणे म्हणजे आपल्या सैन्यदलांच्या पराक्रमाविषयी शंका घेणे ठरते ह्याचे भान टीकाकारांनी ठेवायला हवे. पाकिस्तानला निश्चितपणे अभूतपूर्व अशा धडा त्या मोहिमेतून शिकवला गेला. आपली उद्दिष्ट्ये साध्य होताच अकारण संघर्ष चिघळत ठेवून उभयपक्षी नुकसान सोसण्यापेक्षा वेळीच हा संघर्ष आवरता घेऊन प्रतिपक्षाला हात चोळत ठेवण्यातच खरा शहाणपणा होता. ऑपरेशन सिंदूरने दहशतवाद्यांच्या तळांनाच नव्हे, तर पाकिस्तानच्या पदराआडून सतत हल्ले चढवत आलेल्या दहशतवादी संघटनांच्या मुख्यालयाला लक्ष्य केले ह्याहून कोणता पराक्रम व्हायला हवा होता? पाकव्याप्त काश्मीर परत मिळवायला हवे होते असे घरबसल्या म्हणणे फार सोपे आहे. जो पराक्रम भारतीय सैन्यदलांनी केला त्याचा मान राखणार की जे केले गेले नाही त्यासाठी हिणवणार?