22.5 C
Panjim
Saturday, November 27, 2021

पाऊलखुणा – बालपणीचा काळ सुखाचा

  • ज. अ. रेडकर

आठवड्यातून तीन वेळा संध्याकाळी चार ते सहा असे प्रशिक्षण चालायचे. खाड खाड बूट वाजवत केलेली ती परेड आजही स्मरणात आहे. राष्ट्रप्रेम आणि शिस्त यांचे धडे आणि संस्कार प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणकाळात मिळत गेले आणि केवळ त्यामुळेच व्यक्तिमत्त्वाला आकार येत गेला.

बालपणीचा काळ सुखाचा असे नेहमीच म्हटले जाते. परंतु हे काही शंभर टक्के खरे नाही. ज्यांच्या घरात पूर्वापार संपन्नता असते त्या घरातील मुलांचे बालपण सुखाचे नक्की असू शकेल, परंतु ज्यांच्या घरात अठरा विश्वे दारिद्य्र असते किंवा हातातोंडाची गाठ पडता पडता नाकी नऊ येतात त्या घरातील मुलांचे बालपण अक्षरशः करपून जाते. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले त्या मानाने बरी म्हणायला पाहिजेत. निदान त्यांना शालेय शिक्षण तरी पूर्ण करता येते. माझाही जन्म अशाच मध्यमवर्गीय कुटुंबात झाला, त्यामुळे माझे शिक्षण पूर्ण होऊ शकले. शालेय जीवनात भेटलेले गुरुवर्य आणि मित्र-मैत्रिणी यामुळे तो काळ सुखाचा होऊन जातो. उतारवयात त्या आठवणींचा ठेवा मन पुन्हा टवटवीत करतो.
हरवलेल्या बालपणातील अनेक आठवणी मनात रुंजी घालत असतात. त्यांतीलच एक आठवण असते ती म्हणजे शालेय जीवनातील स्वातंत्र्यदिन सोहळ्याची. किती उत्साह असायचा त्या दिवशी! भारतीय स्वातंत्र्याची पहाट उगवून अवघीच वर्षे उलटली होती. त्यावेळच्या शालेय पाठ्यपुस्तकावर स्वातंत्र्यलढ्याचा प्रभाव होता. मराठी व इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील असलेले पाठ, त्यातील ब्रिटिशसत्तेपासून स्वातंत्र्य मिळवल्याच्या कथा, स्वातंत्र्यवीरांनी सोसलेल्या कष्टांचे वर्णन यांचे गारुड बालमनावर असायचे. नंदुरबारचा चिमुकला शिरीष कुमार याच्यावरचा पाठ वर्गात शिकविला जायचा तेव्हा आपण त्यावेळी का जन्माला आलो नाही याचे वैषम्य वाटत राहायचे. बाळ गंगाधर टिळक यांचे ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या वाक्याने मन भारून जायचे. ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’ या त्यांच्या बाणेदार वाक्याने आपण सच्चे व प्रामाणिक असू तर कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही, कोणतीही तडजोड करायची नाही याचे संस्कार त्यावेळी घडत गेले. नेताजी सुभाषचंद्र बोस आम्हा मुलांचे हिरो असायचे. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा’ या त्यांच्या वाक्याने बाहू स्फुरण पावायचे. त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेचा ‘जयहिंद’ हा नारा मनावर कोरला जायचा. महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना दिलेला ‘चले जाव’चा आदेश असो अथवा त्यांची ‘स्वदेशीची चळवळ’ असो, लक्षात राहायचा तो गिरणी कामगार असलेला आपल्या निधड्या छातीवर ब्रिटिशांच्या बंदुकीतील गोळ्या झेललेला बाबू गेनू! लाल, बाल आणि पाल ही त्रयी जशी मनावर अधिराज्य गाजवायची तशीच स्वातंत्र्यासाठी हसत-हसत ‘इन्कलाब झिंदाबाद’ अशी घोषणा देत फासावर लटकणार्‍या शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या आठवणींनी डोळ्यांत अश्रू उभे राहायचे आणि त्याचबरोबर देशाभिमानदेखील जागा व्हायचा. चंद्रशेखर आझाद यांच्या शौर्याची कहाणी वाचताना/ऐकताना ऊर अभिमानाने फुलून यायचा. काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना सावरकर यांनी लिहिलेल्या ‘ने मजसी ने, परत मातृभूमीला’ ही आर्त कविता तालासुरात आम्ही मुले गायचो तेव्हा डोळे पाणावयाचे. इतिहासातील जालियनवाला बागेतील क्रूर हत्याकांड वाचताना ब्रिटिश सरकार विरोधातील त्वेष उफाळून यायचा. छत्रपती शिवाजी राजे, बाजी प्रभू देशपांडे, शूरवीर तान्हाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर, धर्मवीर शंभू राजे, अटकेपार झेंडे लावणारे थोरले बाजीराव पेशवे, मुघलांवर चाळीस मणाची तलवार चालवणारा बाप्पा रावळ यांचे साश्चर्य कौतुक वाटायचे.

पृथ्वीराज चव्हाण, त्यांचा इमानदार चेतक घोडा, लढाईत एक डोळा गमावला असतानाही लढणारा रणजितसिंग यांच्या शौर्यकथा वाचताना अंगावर रोमांच उभे राहायचे. ‘मेरी झांसी नहीं दुँगी’ म्हणणारी राणी लक्ष्मीबाई, धुरंदर तात्या टोपे आणि अशा असंख्य नरवीरांच्या पराक्रमांचे वर्णन पाठ्यपुस्तकातून वाचताना/अभ्यासताना आपणही स्वदेशासाठी असेच काही भव्य-दिव्य करायला हवे असे त्या बालवयात वाटत राहायचे.
१५ ऑगस्ट जसजसा जवळ यायचा तसतसा उत्साह वाढत जायचा. त्यादिवशी भल्या पहाटे उठून आंघोळ उरकली जायची. रात्रीच्या वेळी घडी करून उशीखाली किंवा दोन लाकडी पाटांच्या मध्ये चेपणीला ठेवलेला किंवा कधीकधी तांब्यात निखारे घालून इस्त्री केलेला गणवेश परिधान केला जायचा. वक्तृत्व स्पर्धेत कधीकाळी बक्षीस म्हणून मिळालेला तिरंग्याचे रंगीत चित्र कोरलेला बिल्ला- जो याच दिवसासाठी खास जपून ठेवलेला असायचा- शर्टाच्या खिशाला लावला की छाती अभिमानाने फुलून यायची. ठीक सकाळी सात वाजता शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रभातफेरी निघायची. दोन-दोन मुलांच्या रांगा केल्या जायच्या. ‘भारऽऽत माता की जय’, ‘वंदेऽऽ मातरम्’ या घोषणांनी परिसर दुमदुमून जायचा. स्वातंत्र्यावरील शौर्यगीते आणि देशभक्तीची वीर रसातील गाणी म्हटली जायची. प्रभातफेरीच्या अग्रभागी तिरंगा घेतलेल्या वरच्या वर्गातील थोराड मुलाचा आम्हां लहान मुलांना नेहमीच हेवा वाटायचा. तिरंगा घेतलेल्या मुलाच्या पाठीमागे बिगुल वाजवणारा मुलगा असायचा आणि त्याच्या पाठीमागे एक मुलगा ताशा तर दुसरा ढोल आणि तिसरा बासरी वाजवणारा असायचा. रांगेच्या शेवटी मुला-मुलींचे लेझीम पथक असायचे. अशी ही प्रभातफेरी रस्त्यातून निघायची तेव्हा दुतर्फा असणार्‍या घरातील मंडळी हे कौतुक बघायला दरवाज्यात उभी राहायची. कारण त्यांचीही कुणी ना कुणी मुले या मिरवणुकीत सामील झालेली असायची. साधारणपणे दीड-दोन मैल ही प्रभातफेरी चालायची आणि पुन्हा आठ वाजता शाळेच्या प्रांगणात गोळा व्हायची. मुख्याध्यापकांच्या हस्ते तिरंगा फडकावला जायचा, तिरंग्याला कडक सलामी दिली जायची. ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’ हे झेंडागीत उच्च रवाने म्हटले जायचे. त्या पाठोपाठ ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत आणि सरते शेवटी ‘वंदे मातरम्’ हे गीत गाऊन सांगता व्हायची. त्यावेळी पुन्हा त्रिवार ‘भारऽऽत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ या घोषणा दिल्या जायच्या आणि सगळी मुले सभागृहात जमा व्हायची. शेणाने सारवलेल्या जमिनीवर शिस्तबध्द रीतीने मुलांना बसवण्याचे काम कडक शिस्तीचे गुरुजी करायचे. त्यांच्या हातात काळाकुळकुळीत सागवानी दंड (रूळ) असायचा. कुणी गडबड केली किंवा चुळबूळ केली तर त्याचा बिनदिक्कत वापर व्हायचा.

सभागृहात सगळी तयारी झाली की मुख्याध्यापकांचे व अन्य शिक्षकांचे आगमन व्हायचे. मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा आणि त्यापाठोपाठ स्वातंत्र्यावरील गीतांच्या स्पर्धा व्हायच्या. विजयी स्पर्धकांना बक्षिसे जाहीर केली जायची. मुख्याध्यापकांचे भाषण झाले की सर्व मुलांना लिमलेटच्या गोळ्या वाटल्या जायच्या आणि सकाळच्या सत्रातील कार्यक्रम संपायचा.

संध्याकाळी पुन्हा सर्वजण एकत्र यायचे ते सूर्यास्तापूर्वी ध्वजस्तंभावरील तिरंगा उतरवण्यासाठी. ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत व ‘वंदे मातरम्’ हे गीत गाऊन झेंडा उतरवला जायचा. हा झाला पूर्ण प्राथमिक शाळेत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन सोहळा. हायस्कूलमध्ये असतानादेखील असाच कार्यक्रम व्हायचा, पण त्याची व्याप्ती थोडी अधिक असायची. प्रभातफेरी, झेंडा वंदन, मुलांची व शिक्षकांची भाषणे या मुख्य कार्यक्रमानंतर दहावी-अकरावीच्या मुलांचा संघ विरुद्ध शिक्षकांचा संघ असा क्रिकेट सामना हायस्कूलच्या भव्य पटांगणावर व्हायचा.

कॉलेजमधील कार्यक्रम अधिक देखणा असायचा. कारण एनसीसी पथकाचे संचलन हा त्यातील आकर्षक भाग होता. खाकी गणवेश, डोक्यावर लाल तुरा असणारी मिलिटरी टोपी आणि पायात नाल ठोकलेले चामड्याचे अवजड बूट हा पेहराव एनसीसी कमांडरकडून पुरवलेला असायचा. १५ ऑगस्टपूर्वी परेडची जय्यत तयारी करून घेतली जायची. भारत-पाक आणि भारत-चीन युद्धानंतर प्रत्येक कॉलेजमध्ये त्यावेळी एनसीसी पथक तयार करण्याचा सरकारी आदेश असावा. सैन्यदलातील एक जवान या कामासाठी नियुक्त केलेला असायचा. कॉलेजमधील एक प्राध्यापक या पथकाचा प्रमुख असायचा. आठवड्यातून तीन वेळा कॉलेजचे अध्यापनवर्ग संपल्यानंतर संध्याकाळी चार ते सहा असे हे प्रशिक्षण चालायचे. खाड खाड बूट वाजवत केलेली ती परेड आणि कधीकधी शिक्षा म्हणून रायफलसह केलेले क्राऊलिंग आजही स्मरणात आहे. राष्ट्रप्रेम आणि शिस्त यांचे धडे आणि संस्कार प्राथमिक शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणकाळात मिळत गेले आणि केवळ त्यामुळेच व्यक्तिमत्त्वाला आकार येत गेला असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

शिक्षकीपेशात असताना आणि नंतर शिक्षणाधिकारी बनल्यानंतर अनेक सोहळे साजरे केले आणि पाहिले. अनेक ठिकाणी प्रमुख वक्ता किंवा प्रमुख पाहुणा म्हणून गेलो, परंतु बालपणीचे ते स्वातंत्र्यदिन सोहळे काही औरच होते. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

- Advertisement -

ALSO IN THIS SECTION