उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाचा दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला आदेश; मंत्र्याला लाच दिल्याचा आरोप भोवणार
काही फाईल मंजूर करण्यासाठी एका मंत्र्याला लाच द्यावी लागली होती, असा जो आरोप माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता, त्या आरोपांप्रकरणी मडकईकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाला (एसीबी) काल दिला. या आरोपांवरून नंतर मडकईकर यांनी घुमजावही केले होते; मात्र त्यांना हा आरोप आता चांगलाच भोवणार असल्याची चिन्हे आहेत.
भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष यांच्यासमवेत काही महिन्यांपूर्वी पणजीत प्रदेश भाजपच्या आजी-माजी आमदारांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी पत्रकारांशी बोलताना, आपण आपल्या काही फाईल मंजुरीसाठी एका मंत्र्याला 15 ते 20 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली होती. तसेच सरकारमधील ‘तो’ मंत्री नेमका कोण याची चर्चाही रंगली होती.
या आरोपांनंतर पांडुरंग मडकईकर यांनी सारवासारव केली होती. आपण ‘ते’ वक्तव्य अनावधानाने केल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच आपण कुठल्याही मंत्र्याला लाच दिलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
भाजपच्या माजी मंत्र्याने विद्यमान एका मंत्र्यावर लाचेचा आरोप केल्यानंतर काशिनाथ शेट्ये व इतरांनी राज्य सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाकडे तक्रार दाखल करून चौकशीची मागणी केली होती. तसेच, जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल करून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी केली होती.
दरम्यानच्या काळात एसीबीने या प्रकरणाचा गंभीरपणे तपास न करता केवळ पांडुरंग मडकईकर यांची जबानी नोंदवून फाईल बंद केली.
काशिनाथ शेट्ये व इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर काल उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने पांडुरंग मडकईकरांविरोधात गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळे पांडुरंग मडकईकर हे आता चांगलेच अडचणीत आले आहेत. आता एसीबी त्यांच्याविरोधात कधी गुन्हा नोंदवते आणि प्रत्यक्ष काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लागले आहे.
एसीबीसमोर जबाबात काय म्हटले होते?
सदर आरोपानंतर माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक शाखेसमोर (एसीबी) आपला जबाब नोंदवला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, एका मंत्र्याला लाच द्यावी लागली हे विधान आपण माध्यमांसमोर काही गैरसमज झाल्यामुळे केले होते. आपण कोणालाही लाच दिलेली नाही. दरम्यान, पांडुरंग मडकईकर यांचा हा जबाब स्वीकारत एसीबीने या प्रकरणाची चौकशी बंद केली होती.

