Home बातम्या पहाडी आवाजाचा स्वरबहाद्दर नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकर

पहाडी आवाजाचा स्वरबहाद्दर नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकर

0

– भिकू पै आंगले

एप्रिल १९४१ साली मी आईबरोबर मुंबईला गेलो. त्यामागे दोन हेतू होते. एक इंग्रजी शिक्षण घेणे आणि दुसरा माझ्या नाट्यक्षेत्रातल्या छंदाला वाव देणे.

मुंबईला त्यावेळी गंधर्व नाटक कंपनी अधूनमधून प्रयोग करीत असे. तो कदाचित नोव्हेंबर-डिसेंबर महिना असावा. गंधर्वांचा बालीवाला थिएटरमध्ये ‘संगीत स्वयंवर’ या नाटकाचा दुपारी प्रयोग होता. चार आणे तिकिटाच्या जागेत बसून गंधर्वांच्या स्त्री-भूमिकेतील रुक्मिणीचे दर्शन घ्यायला आतुर डोळ्यांत चालकाची दृष्टी ठेवली होती. आणि एकदाचा तो प्रवेश आला. प्रवेश घेतानाच मुळी चेहर्‍यावर अत्यानंद देणारा लोभस अभिनय आणि प्रसन्नतेची खुलावट या गोष्टी त्यांच्या त्या वयातदेखील अत्यंत नेत्रदीपक वाटल्या, आणि म्हणूनच बालगंधर्व निधन पावल्यावर महाकवी माडगुळकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘असा बालगंधर्व आता न होणे पुढे’ हे उद्गार खरे वाटले. काय तो त्यांचा श्रीमंती डौल, चालण्याची आदर्श स्त्रीची लकब… हातांची ठेवण आणि पदराशी करीत असलेला परिणामकारक चाळा पाहून त्यांची ही स्त्री-भूमिका म्हणजे स्वर्गातून उतरलेल्या अप्सरेसारखी वाटली. आणि मनाला भावलीसुद्धा. त्यांचं त्या नाट्यप्रयोगात झालेलं कर्णमधुर मनोहारी गाणंही ब्रह्मानंद देऊन गेलं.

ते गळ्यातले कोमल सूर थांबतात न थांबतात तोच पहाडी आवाजात सुरू केलेलं ‘जाऽऽ भय न मम म्हणा, मंडप सबल…’ हे भिष्मकाचं गाणं कानी पडून ‘हा कोण संप्रति नवा पुरुषावतार’ असा विचार माझ्या मनात घोळू लागला. तोपर्यंत इतक्या भरदारी आणि जोरकस आवाजात म्हटलेलं एकही गाणं माझ्या कानांवर आलं नव्हतं. या भिष्मकाने आपल्या त्या बुलंद स्वरांतून म्हटलेल्या गाण्याला चार वेळा वन्समोअर मिळाला. मला हे सर्व नवीनच होते. मी बाजूच्या प्रेक्षकाला विचारलं, ‘‘कोण बरे हा नट?’’ तो गृहस्थ कुत्सित हसला आणि माझ्याकडे अरसिकतेच्या भावनेने पाहत म्हणाला, ‘‘माहीत नाही? अरे हाच तो पहाडी आवाजात फिरत घेत म्हणणारा श्रीपाद नेवरेकर!’’ माझं मन लगेच गोमंतकातील पणजी शहराकडे गेलं. या गृहस्थाला त्याच्या तारुण्यात पणजी येथील महालक्ष्मी देवळात झालेल्या रथसप्तमी उत्सवाच्या वेळी सादर केलेल्या ‘संगीत एकच प्याला’ नाटकात पाहिल्याची आठवण झाली. त्यात त्याने रामलालची भूमिका करून प्रत्येक पदाला टाळ्यांचा कडकडाट घेतला होता. तेच हे श्रीपादराव नेवरेकर आहेत हे लक्षात येताच त्यांच्याबद्दलची, नाट्यरसिकतेबद्दलची माहिती माझ्या ज्येष्ठ मित्राने नेरुलला (बारदेस) असताना दिल्याचे स्मरण झाले.

त्यानंतर मुंबईला ज्या-ज्या वेळी संयुक्त नाट्यसंघ सं. ‘मानापमान’, सं. ‘स्वयंवर’ आणि सं. ‘एकच प्याला’ हे नाट्यप्रयोग सादर करायचा त्यांत श्रीपादरावांच्या धैर्यधर, भिष्मक आणि रामलाल या भूमिका अत्यंत तडफदारपणे सादर करताना पाहण्याचे भाग्य मला लाभायचे.

त्यावेळी मा. कृष्णराव, गंगाधर लोंडे, गणपतराव बोडस इत्यादी अनेक बुजुर्ग नट कामं करीत असूनही श्रीपाद नेवरेकर यांना काम करण्यासाठी मागणी येत असे. त्यांची कामं पाहून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘नाट्यरत्न’ ही पदवी श्रीपादरावांना बहाल केली होती.

‘रेवती फेम’ रघुवीर सावकार यांच्या ‘रंगबोधेच्छु’ नाट्यसंस्थेत येण्यासाठी खास पाचारण करून त्यांच्या वाट्याला आश्‍विनशेट ही ‘संशयकल्लोळ’ नाटकात आणि धैर्यधर ही ‘मानापमान’ नाटकात भूमिका देऊन त्यांच्या नाट्यकलेचा त्यांनी सन्मान केला. विशेषतः सं. ‘संशयकल्लोळ’ हे नाटक रेवती आणि आश्‍विनशेट या भूमिकांनी फारच गाजवून सोडले होते. रेवतीच्या जलशात ‘न मारू पिचकारी’ ही ठुमरी बहार उडवून देत असे.

ते उत्तम भजनीही होते. त्यांच्या त्या जोरकस पल्लेदार ताना, पहाडी आवाज या गोष्टी भजनाला सयुक्तिक ठरल्याने ज्या-ज्या वेळी बालगंधर्वांना भजनाची आमंत्रणे येत असत त्या-त्या वेळी त्यांच्याबरोबर श्रीपादराव नेवरेकर, मा. कृष्णराव आणि गोविंदराव वेर्लेकर हे त्रिकूट असायचे.

नट म्हणून त्यांनी आपण कुणीतरी महान आहोत अशी शेखी कधीही मिरवली नाही. साधं वर्तन, मिळूनमिसळून वागण्याचा मित्रत्वाचा स्वभाव. तसे ते मितभाषी, पण एकदा स्वर जुळल्यानंतर जशी त्यांची पहाडी तान ऐकायला मिळे, तशीच त्यांना एकदा एकमेकांच्या स्वभावाची जाण पटली की मग ते तासन्‌तास सुसंवाद घडवून आणायचे.

१९३५ साली ज्यावेळी गंधर्व कंपनी गोमंतकात आली होती, त्यावेळीच बालगंधर्वांनी त्यांच्या स्वरबहारी आवाजाचा आस्वाद घेतला होता. त्यानंतर एक-दीड वर्षातच ते गंधर्व कंपनीत रुजू झाले, आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत ते त्याच कंपनीत राहिले. किंबहुना त्या कंपनीच्या पडत्या काळात मालक म्हणूनदेखील जबाबदारी स्वीकारण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र १९३३ नंतर नाट्यसृष्टीच डबघाईला आल्यामुळे जवळजवळ साराच नटवर्ग हवालदिल झाला. ज्यांनी नटाशिवाय काहीच काम केले नाही, त्यांचे जीवन अत्यंत हलाखीचे होऊन बसले. पण ज्यांनी केवळ हौस आणि पैसा मिळवण्यासाठी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला होता, त्यांनी आपले जीवन इतर व्यवसायांकडे वळवले. जे केवळ नट म्हणून मंचावर वावरले आणि कसलाही कामधंदा नव्हता अशांचा फायदा घेण्याची क्लृप्ती ठेकेदारांनी प्रत्यक्षात आणली. जुन्या नट-नट्यांना एकत्र आणून त्यांना माफक बिदागी (नाइट) देऊन जुनी संगीत नाटके संयुक्त नाट्यप्रयोग या नावाखाली सादर करण्याचा सपाटा लावला. ‘गल्ला’ बर्‍यापैकी आला तरीसुद्धा हे ठेकेदार नटांना ठरलेली ‘नाइट’ देत नसत. पण करणार काय? प्रपंचाची गुजराण तर झाली पाहिजे ना! अशा नट-नट्यांपैकी नाट्यरत्न श्रीपादराव नेवरेकरही होते.

पूर्वी नटांना कंपनीत राहायची सोय असल्यामुळे त्यांना स्वतःचं असं निवासस्थान नव्हतं. अशांची तर फारच तारांबळ उडाली. पण श्रीपादरावांना म्हापशाच्या सावकारबंधूंनी स्थापन केलेल्या ‘कलामंदिर’ या संस्थेत आपल्या चोखंदळ भूमिका करण्याचा योग आल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्या भूमिका पाहून संयुक्त नाट्यसंघाच्या मालकांनी नेवरेकरांना मानाने वागवून त्यांची नाइटही वाढवली. त्याला कारण, नेवरेकर ज्या प्रयोगात काम करायचे त्या प्रयोगाला मराठी प्रांतात- विशेषतः कोकण भागात नाट्यरसिक गर्दी करत असत.

१९६४ पासून त्यांना कायम स्वरूपाच्या नाट्यसंस्थेत भूमिका करण्याचा महायोग प्राप्त झाला. धी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेच्या कलाविभागाने प्रा. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या सं. ‘मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांना शंतनूची भूमिका दिली. पहिले पन्नास प्रयोग सोडल्यास त्यानंतर ‘मत्स्यगंधा’ हा नाट्यप्रयोग तुफान गर्दीत होऊ लागल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बरीच सुधारली. त्याच संस्थेत ‘मत्स्यगंधा’ या नाटकानंतर गोपाळकृष्ण भोबे यांनी लिहिलेल्या ‘धन्य ती गायनी कळा’ या नाट्यप्रयोगातही भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली. या नाटकात ते, रामदास कामत, कृष्णराव चोणकर आणि प्रभाकर जठार या चार गानबहाद्दरांनी कर्णमधुर स्वरांच्या बरसातीचं संगीत-उद्यान निर्माण केलं होतं. ‘मत्स्यगंधे’चे जवळजवळ साडेपाचशेच्या वर आणि ‘धन्य ते गायनी कळा’ याचे जवळजवळ एकोणसत्तर प्रयोग, इतका त्यांचा धी गोवा हिंदू असोसिएशनला मित्रत्वाचा सहवास लाभला.

इथे त्यांच्या उदार दानतीचे उदाहरण दिल्याशिवाय राहवत नाही. ‘मत्स्यगंधे’चे पहिले काही प्रयोग आर्थिकदृष्ट्या अत्यंत तुटीचे जात असल्यामुळे पाकीट घेताना ते मला म्हणायचे, ‘‘भिकूबाब, हे पाकीट घेणं प्रशस्त वाटत नाही. कितीतरी तूट तुम्ही सोसता तेही मला पाहवत नाही. तेव्हा प्रयोग जोशात चालल्यावरच हे पाकीट मला द्या. निदान आता या पाकिटातले पैसे तरी कमी करा.’’ केवढा हा नटाचा दिलदार स्वभाव! असा स्वभाव नाट्यक्षेत्रात अभावानेच सापडायचा. मला वाटते, या त्यांच्या दृष्टिकोनामुळेच पुढे प्रयोग जोशात चालले आणि आम्हाला तूट आल्याचं दुःख कधीही वाटलं नाही.

नटांबरोबर त्यांची वागणूक सलोख्याचीच असायची. प्रमिला जाधव (जयमाला शिलेदार) यांच्या कोणत्या तरी समारंभाप्रीत्यर्थ त्यांना एक छोटासा लेख लिहायला हवा होता. प्रयोग संपल्यावर एक दिवस मला बाजूला घेऊन ते बोलले, ‘‘भिकूबाब, या चार दिवसांत माझ्याकडे रात्री भोजनासाठी या. माझं एक जरुरीचं काम आहे.’’ त्यांच्या विनंतीला मान देऊन एक रात्र मी त्यांच्या निवासस्थानी घालवली. प्रमिलाबाईंविषयीची बरीचशी नाट्य व संगीत याबद्दलची माहिती त्यांनी मला सांगितली आणि म्हणाले, ‘‘भिकूबाब, मी काही लेखक नाही, पण तुम्ही लिहिता. या दिलेल्या माहितीच्या आधारे मला एक माझ्या नावे लेख लिहून द्या.’’ त्यांचा शब्द स्वीकारून दोन दिवसांनी मी लेख त्यांच्या हाती दिला. त्यांना तो खूप आवडला. तो एका स्मरणिकेसाठी होता.

काही महिन्यांनी प्रमिला जाधव मला भेटल्या आणि त्यांनी विचारलं, ‘‘श्रीपादरावांच्या नावे तुम्हीच ना तो लेख लिहिला? हे त्यांनीच मला सांगितले. मला तो फार आवडला.’’ असा हा दिलदार स्वभाव. त्यांनी कुणाला दुखवले आहे असे एकदाही माझ्या कानावर आले नाही. असा हा बुलंद आवाजाचा स्वरबहाद्दर नट, दिलदार मित्र आणि सर्वांशी समतोलरीत्या वागणारा कलावंत अखेर पणजीच्या कला अकादमीमध्ये संगीत शिक्षक म्हणून नेमण्यात आला. गोमंतकात जन्माला आलेला हा संगीत-नाट्य कलावंत अखेर गोमंतकातच दिवंगत झाला.

हीच आहे माझी शब्दसुमनांजली त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने.