पहलगाम हल्ल्यातहाफिज सईदचा हात

0
2

एनआयएकडून आरोपपत्रात नाव समाविष्ट

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केले असून, पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदवर अनेक आरोप ठेवले आहेत. या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदच होता, असा थेट ठपका एनआयएने ठेवला आहे. एनआयएने काल जम्मू येथील विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याला हल्ल्याचा कट रचणे, दहशतवाद्यांना चालना देणे आणि भारतावर युद्ध पुकारल्या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे. याशिवाय हाफीज सईद आणि त्याच्या लश्कर-ए-तोयबा व द रेझिस्टन्स फ्रंट या दोन दहशतवादी संघटनांनावर देखील आरोप ठेवण्यात आले आहेत.

एनआयएने दाखल केलेल्या या आरोपपत्रात हाफिज सईदची वैयक्तिक भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. लश्कर-ए-तोयबा आणि तिचीच दुसरी आघाडी असलेल्या ‘द रेसिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनांचा प्रमुख म्हणून हाफिज सईदने पाकिस्तानमध्ये बसून या संपूर्ण हल्ल्याचा कट रचला होता.
सईद याच्यावर भारतीय न्याय संहिता, 2023 आणि बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा, 1967च्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे नवे आरोपपत्र यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या 1597 पानांच्या मूळ आरोपपत्राचाच एक भाग आहे.