येथील क्रीडा मैदानावर मार्केट प्रकल्प बांधण्यास पर्वरी रेसिडन्स असोसिएशनने प्रखर विरोध करून प्रकल्पाचे चालू असलेले बांधकाम बंद पाडले.
मंगळवारी पर्वरीतील रहिवाशांनी मैदानावर जमा होऊन निदर्शने केली. शेवटी स्थानिक आमदार रोहन खंवटे यांना पाचारण करण्यात आले. खंवटे यांनी गोवा गृह निर्माण मंडळाने सादर केलेल्या प्रकल्पाचा आराखडा दाखवून राहिवाशांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु रहिवासी ऐकण्याच्या स्थितीत नव्हते त्यांनी आमदारास काम बंद करण्याचा आग्रह केला. शेवटी काम बंद करण्यात आले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष आमदार ग्लेन टिकलो राज्याबाहेर असल्यामुळे ते आल्यावर प्रकल्पाविषयी रहिवाशांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे खंवटे यांनी सांगितले. खेळाच्या मैदानावर मार्केट प्रकल्प बांधण्याऐवजी सध्या असलेल्या जुन्या मार्केटच्या जागीच नवीन मार्केट प्रकल्प उभारावा अशी रहिवाशांची मागणी आहे. शहर आणि नगर नियोजनमंडळाकडून सदर प्रकल्पाला मान्यता मिळाली असून पेन्ह द फ्रांस पंचायतीने ना हरकत दाखला दिला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी आमदार खंवटे, आमदार ग्लेन टिकलो यांच्या उपस्थितीत कोनशिला बसविली होती. दरम्यान, निदर्शनांवेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून यावेळी पोलिस फौज तैनात केली होती.

