ट्रायल रन’चा उडाला फज्जा
पर्वरी उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून महामार्गावरील वाहन रहदारीला दररोज कोंडीला सामोरे जावे लागत आहे. काल सोमवारी दि. 13 रोजी पूर्वनियोजित वाहतूक व्यवस्थापनाची चाचणी करण्यासाठी कोकेरो सर्कल ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा मार्ग सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद करण्यात आला होता. यामुळे म्हापसा ते पणजी, तसेच इतर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना सुकूर ते कोकेरो सर्कलपाशी तसेच पर्वरीतील अंतर्गत मार्गावरील अनेक रस्त्यांवर वाहनांच्या कोंडीला सामोरे जावे लागले.
याबद्दल पर्वरी वाहतूक कक्षाचे निरीक्षक धीरज देविदास यांना विचारले असता पर्वरी महामार्ग आणि अंतर्गत मार्गावर कोंडी झाली होती हे खरे आहे. आज केवळ चाचणी करण्यात आली असून महामार्गावरील वाहतुकीच्या समस्येवर योग्य तोडगा काढण्यात येईल. नेमके कोठे वाहतूक नियंत्रण शिथिल झाली आहे ते आम्हाला समजले आहे. यावर लवकरच योग्य तो तोडगा काढण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
उत्तर गोव्यातून पर्वरी, पणजीला येण्यासाठी केवळ पर्वरी महामार्ग उपलब्ध झाला असून हजारोंच्या संख्येने अवजड आणि हलकी, चार चाकी आणि दुचाकी वाहने या मार्गाचा वापर करतात. उड्डाण पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत वाहन चालकांना वाहन कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या काळात वाहनांना अरूंद सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आले होते. रस्ताबंदीसाठीची ही चाचणी घेताना सार्वजनिक बांधकाम खाते तसेच गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाने या रस्त्यावरील वाहनांची व्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिसांना आवश्यक त्या संख्येने तैनात केले नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्याचे या रस्त्यावरून वाहने घेऊन जाणाऱ्या वाहन चालकांनी सांगितले. रस्त्याच्या बजूने पार्क करुन ठेवण्यात येत असलेल्या वाहनांमुळे समस्येत भर पडल्याचे त्यांचे म्हणणे होते.

