मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत पर्वरीतील सहापदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाचा आढावा काल घेतला. या उड्डाणपुलाच्या सर्व्हिस लेनची एका आठवड्यात दुरुस्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या बैठकीत पर्वरी उड्डाणपुलाच्या बांधकामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. वाहतूक वळवण्याच्या योजना आणि तातडीच्या रस्ते दुरुस्तीवर चर्चा करण्यात आली. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खराब सर्व्हिस रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यावर जोर देण्यात आला. या उड्डाणपुलाचे काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी आणि कामाच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण आणि कामाला गती देण्यासाठी नियमित अंतराने आढावा बैठक घेण्याचे ठरविण्यात आले, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. नागरिक व वाहनचालकांना या उड्डाण पुलाच्या कामामुळे त्रास सहन करावा लागत आहे. तरीही, सर्वांनी संयम पाळून काम जलदगतीने पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या बैठकीला पर्वरेीचे आमदार तथा मंत्री रोहन खंवटे आणि सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.