मुख्यमंत्र्यांची घोषणा; 10 कोटी रुपये खर्चून उभारणार
पर्वरी येथील नियोजित आंबेडकर भवनाची पायाभरणी येत्या सहा महिन्यांत करण्यात येणार आहे. आंबेडकर भवनासाठी 2,140 चौरस मीटर जमीन समाजकल्याण खात्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, वार्षिक अंदाजपत्रकात सुमारे 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी आंबेडकर भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कदंब बसस्थानकाजवळील आंबेडकर उद्यानात आयोजित राज्यपातळीवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्यात बोलताना येथे काल केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची गेली कित्येक वर्षे मागणी केली जात आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक आणि भवन हे दलित समाजासाठी सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. या भवनामध्ये विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भारत देश स्वातंत्र्याच्या शतकोत्सवाच्या दिशेने वाटचाल करीत असताना समाजात अस्पृश्यता ही संकल्पनाच राहता कामा नये. आम्ही सर्वजण भारतीय असून, सर्व एक आहोत ही भावना रुजवणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील एससी आणि एसटी समाजातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी समाजातील लोकांनी पुढे आले पाहिजे. योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येत असल्यास त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
एससी समाजबांधवांना अटल आसरा योजनेखाली घरे बांधताना अडचणी येत आहेत. ज्यांची 1971 पूर्वीची घरे आहेत. त्यांना मुंडकार कायद्याखाली दावा करता येईल, अशा घरांना नियमित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते यावेळी काही पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, जिल्हाधिकारी स्नेहा गीते, सतीश कोरगावकर, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर व इतरांची उपस्थिती होती.