पर्वरीतील अपघातात दुचाकीचालक ठार

0
7

पर्वरी येथे दमियान द गोवा शोरुमसमोरील राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी रात्री 11.15 च्या सुमारास कार आणि दुचाकी यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक ठार झाला, तर त्यामागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास दमियान द गोवा शोरुमसमोरील महामार्गावर महिंद्रा थार जीपचा (क्र. जीए-03-एएफ-0890) चालक हर्षित ग्यानेंद्र ताम्रकर (21, रा. तोर्डा) याने होंडा डिओ दुचाकीला (क्र. जीए-03-एसी-3874) मागून धडक दिली. या धडकेनंतर दुचाकीचालक सुरजीत कोहली (28, सध्या रा. सांगोल्डा, मूळ रा. पश्चिम बंगाल) याचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेला अशोक बसू हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी गोमेकॉमध्ये नेण्यात आले.
अपघातातील दोन्ही वाहने म्हापसा ते पणजी या एकाच दिशेने जात असताना जीपने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. जीपचालक हर्षित हा वेगाने वाहन चालविल्याने हा अपघात घडला, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी हर्षित याच्याविरुद्ध भादंसं 279, 338 आणि 304 कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. हवालदार प्रीतम दाभोळकर यांनी अपघाताचा पंचनामा केला.