मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दोनापावल येथील निवासस्थानातून कामकाज हाताळण्यास प्रारंभ केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून येथील श्री महालक्ष्मी मंदिरात काल सुदर्शन होम आणि धन्वंतरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हितचिंतकांनी या धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग होऊन पर्रीकर यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.
मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये आठवडाभर उपचार घेतल्यानंतर मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गुरूवारी दुपारी अचानक गोव्यात परतून अर्थसंकल्प सादर केला होता. मुख्यमंत्री पर्रीकर यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. संसर्ग टाळण्यासाठी प्रवास व वाहतूक न करण्याची सूचना केली आहे. तसेच जास्त लोकांच्या संपर्कापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कार्यालयात येण्याचे टाळले आहे. दोनापावल येथील निवासस्थानातून सरकारी फाईल्स हातावेगळ्या करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. येत्या सोमवारी कार्यालयात येतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
सरकारी कामकाजात खंड पडू दिला जात नाही. अर्थ, गृह या महत्त्वाच्या खात्याच्या फाईल्स मुख्यमंत्र्याकडून हाताळल्या जातात. तातडीच्या फाईल्स मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या घरी पाठविण्यात येत आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात सरकारी कामाला गती देण्याची सूचना मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अधिकार्यांना केली आहे.

