>> वाळपई मतदार संघात 82.97 टक्के मतदान
सत्तरी तालुक्यातील पर्ये व वाळपई या दोन्ही मतदारसंघांत शांततेत मतदान पार पाडले. पर्येत 87.11 टक्के तर वाळपईत 82.97 टक्के मतदान झाले. पर्ये मतदारसंघात सकाळी 11 वाजता 33.13 टक्के, दुपारी 1 वाजता 54.43 टक्के, दुपारी 3 वाजता 70.66 टक्के तर वाळपई मतदारसंघात सकाळी 9 वाजता 13.56 टक्के, सकाळी 11 वाजता 31.62 टक्के, दुपारी 1 वाजता 55.66 टक्के व दुपारी 3 वाजता 68.89 टक्के मतदान झाले
होते.
सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी होती. पण जशी दुपार झाली तशी गर्दी कमी होत गेली. वाळपई नगरपालिका क्षेत्रात चांगले मतदान झाले. तसेच ग्रामीण भागातील मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. नगरसेवक व पंच सदस्य मतदारांना बाहेर काढताना दिसत होते. दोन्ही मतदारसंघांत भाजपा कार्यकर्ते उमेदवारासाठी काम करताना दिसत होते.
सत्तरीत 35 हजार मताधिक्य
सत्तरीत विरोधक कुठेच नाहीत. सत्तरीतील दोन्ही मतदारसंघात 35 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी बोलताना सांगितले. मतदानाला मिळालेला प्रतिसाद भाजपा उमेदवार श्रीपाद नाईक यांना चांगले मताधिक्य मिळवून देईल, असे त्यांनी सांगितले.
वाळपई मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते तसेच पोलिंग एजंट सुध्दा एकाही केंद्रावर दिसले नाहीत. वाळपई मतदारसंघात काँग्रेसने नावाला प्रचार केला होता. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. वाळपई गटाध्यक्ष व मागील विधानसभा उमेदवार कुठे दिसलीच नाही. संध्याकाळी 4 च्या सुमारास काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांचा मुलगा अश्विन खलप वाळपई नगरपालिका मतदान केंद्रावर फिरताना दिसले. यावेळी त्यांनी सांगितले की विश्वजित राणे यांची 35 हजारांचे मताधिक्य फक्त वल्गना आहे. सत्तरीत काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळेल, असा दावा केला.
दरम्यान, होंडा पंचायत क्षेत्रातील बुथ क्रमांक 49 यावर मतदान करणारे मशीन काही वेळ बिघडल्याने बऱ्याच प्रमाणात धावपळ झाली. शेवटी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या तासांमध्ये मशीन दुरुस्ती करून घेतल्याने मतदान पुन्हा सुरू झाले. यामुळे मतदारांना काही प्रमाणात ताटकळत राहावे लागले. काही मतदार मशीन चालत नसल्याने माघारी परतले. मात्र, संध्याकाळपर्यंत त्यांनी पुन्हा येऊन मतदान केल्याची माहिती देण्यात आली.