पर्ये मतदारसंघातून दिव्या राणेंना उमेदवारी

0
14

>> ४० पैकी ३४ मतदारसंघातील उमेदवार जाहीर; कवळेकर दांपत्याला वेगळा न्याय

नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते अरुण सिंह यांच्या उपस्थितीत काल भाजपचे ४० पैकी ३४ मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. सर्वात लक्षवेधी ठरली, ती पर्येतून दिव्या राणेंना जाहीर झालेली उमेदवारी. भाजपमध्ये शक्यतो एकाच कुटुंबात दोन उमेदवारी दिल्या जात नाहीत; मात्र दिव्या राणे त्याला अपवाद ठरल्या. घराणेशाहीचा आरोप होण्याची शक्यता असूनही विश्‍वजीत राणेंच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे.

मंत्री विश्‍वजीत राणे व त्यांची पत्नी दिव्या राणे, तसेच आमदार बाबूश मोन्सेरात व त्यांची पत्नी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात या दोन दांपत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कवळेकर दांपत्याला वेगळा न्याय लावला आहे. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांना केपेतून उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगेतून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना साखळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर यांना मडगाव मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री तथा साखळीतील भाजप उमेदवार डॉ. प्रमोद सावंत हे शनिवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

तीन माजी आमदारांना उमेदवारी
माजी आमदार गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच आमदार मिलिंद नाईक यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विद्यमान तीन आमदारांचा पत्ता कट
भाजप सरकारमधील विद्यमान साबांखा मंत्री दीपक पाऊसकर, जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस या विद्यमान आमदारांसह माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.

अन्य पक्षांतून आलेल्यांना आवताण
दुसर्‍या राजकीय पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रवी नाईक, प्रवीण आर्लेकर, गोविंद गावडे, जयेश साळगावकर, रोहन खंवटे, प्रेमेंद्र शेट यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सहा मतदारसंघातील उमेदवार रखडले
भाजपने डिचोली, कळंगुट, सांताक्रूझ, कुंभारजुवे, कुठ्ठाळी आणि कुडतरी या सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांच्या जागी दुसर्‍या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. कुंभारजुवेत विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर आणि केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश नाईक यांच्यात चुरस आहे. कळंगुट, कुठ्ठाळी, कुडतरी, सांताक्रूझमध्ये उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू आहे.

१२ ओबीसी, तर ९ अल्पसंख्याक उमेदवार
गोव्यातील तीन सर्वसाधारण जागांवर एसटी प्रवर्गातील उमेदवार उभे केले आहेत, तर एका सर्वसाधारण जागेवर एससी उमेदवार उभा केला आहे. १२ ओबीसी उमेदवार आहेत, तर ९ अल्पसंख्याक उमेदवार आहेत.

देवेंद्र फडणवीसांचा दावा प्रतापसिंह राणेंनी खोडून काढला
पर्येत दिव्या राणे यांना उमेदवारी देताना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांना विश्वासात घेण्यात आले आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी जाहीर करताना केला होता; मात्र प्रतापसिंह राणेंनी हा दावा खोडून काढला आहे. पर्ये मतदारसंघ ही माझी मालमत्ता नाही. मी उमेदवारीसाठी कुणाचेही नाव सुचवलेले नाही. मी निवडणूक लढवणार की नाही हा वेगळा विषय आहे; परंतु फडणवीसांचे वक्तव्य चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले.

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ होत असून, येत्या २८ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २९ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे, तर ३१ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.