– राजेंद्र पां. केरकर
चवथीचा सण गोव्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यानंतर इथल्या लोकमनाला वेध लागतात ते दसरा-दिवाळी सणांचे. मुंबईसारखी गोव्यात दिवाळी साजरी होत नसली तरी आज काही अंशी तशीच परंपरा आपल्याकडे सुरू झालेली आहे. दिवाळीच्या या नव्या परंपरेला आपण आज पर्यावरण मूल्यांची आणि संस्कारांची सांगड घालणे गरजेचे आहे; अन्यथा त्याचे दुष्परिणाम आपणा सर्वांना भोगावे लागणार आहेत हे विसरता कामा नये.
आज गोव्यात दिव्यांची लोभस आरास करण्याऐवजी नरकासुराचे स्तोम अधिकाधिक माजलेले असल्याने त्याचा मनःस्ताप सर्व समाजाला भोगण्याची पाळी निर्माण झाली आहे. भारत हा लोकशाहीप्रधान देश असून येथे साजर्या होणार्या सण-उत्सवांच्या वैविध्यपूर्ण परंपरेतून विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडत असते. घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य लाभलेले असल्याने त्यांना आपल्या परंपरेनुसार सण-उत्सव साजरे करण्याची मुभा असली तरी आपल्या कृतीने दुसर्यांना वेठीस धरण्याच्या बाबींवर येथे अभावानेच मर्यादा घातली जात असल्याने, दिवाळीसारख्या उत्सवाच्या सादरीकरणातून असंख्य समस्यांचा उगम होत असतो. यासाठी आज दिवाळीच नव्हे तर प्रत्येक सण, उत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी आपण सार्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आज गोव्यात ठिकठिकाणी नरकासुरांचे इतके स्तोम वाढलेले आहे की त्यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन राज्यस्तरावर संपन्न होणार्या स्पर्धांमधून व्यापक प्रमाणात होऊ लागलेले आहे आणि त्यामुळे दिवाळी म्हणजे नरकासुर अशी भावना वाढू लागली आहे. दिवाळीचा सण ही आनंदाची पर्वणी असून पूर्वी पावसाळी भातकापणीनंतर घरात येणार्या नव्या दाण्यागोट्यांच्या उत्साहापोटी हा सण साजरा केला जायचा. पावसाळ्यात निर्माण झालेला केरकचरा जाळून पूर्वी लोक प्रतीकात्मक गवताचे नरकासुर करायचे. काही वेळा बांबूचा आराखडा तयार करून, त्यात गवत ठासून भरून त्याला कागदी नरकासुराचा मुखवटा लावला जायचा आणि अशा नरकासुराच्या प्रतिमा ढोल-ताशांवरती मिरवणूक काढून अल्प प्रमाणात जाळल्या जायच्या. आज गोव्यात नरकासुर प्रतिमांचे स्तोम बरेच वाढले असून ते मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरत चालले आहे.
आज राजकारण्यांनी मतपेटी सुरक्षित ठेवण्यासाठी सण-उत्सवांना प्रायोजित करण्याचे सत्र राबवलेले असल्याने, त्याला नरकासुर तरी कसा अपवाद असेल? गावोगावी, शहरोशहरी असणारे तरुणांचे गट काबूत ठेवण्यासाठी नरकासुर आणि त्याच्याबरोबर व्यसनांना प्रोत्साहन देण्यात राजकीय नेत्यांना अभिरूची असल्याने नरकचतुर्दशीला त्यांचा बेशिस्त धांगडधिंगा दृष्टीस पडतो.
नरकासुराच्या प्रतिमा तयार करण्यासाठी पूर्वी बांबू, कागद, गवती केरकचरा यांचा उपयोग केला जायचा. आज मात्र हे सारे कालबाह्य ठरले असून नरकासुराचा सांगाडा करण्यासाठी धातूच्या तारा, मुखवट्यासाठी प्लास्टिक आणि सजवण्यासाठी कागदाबरोबर प्लास्टिक आणि तत्सम प्रदूषणकारी घटकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे अशा हायटेक नरकासुराच्या प्रतिमांचे दहन त्या-त्या परिसराला प्रदूषणाच्या विळख्यात गुरफटत असते. नरकासुराच्या नावाखाली फटाके आणि वारेमाप दारूकामाची आतषबाजी केली जाते, त्यामुळे ध्वनी, हवा, पाणी यांच्या प्रदूषणाची समस्या विकोपाला जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. दारूकामाच्या आतषबाजीच्या वेळी निर्माण होणार्या धुरातल्या विषारी घटकांमुळे जीव गुदमरणे, दमा, श्वसननलिकेचा व फुफ्फुसाचा दाह व त्यावर सुज येणे यांसारखे विकार निर्माण होतात.
दिवाळीच्या वेळी लावल्या जाणार्या फटाक्यांमुळे अल्पकाळासाठी बहिरेपणा आला असला तरी अशा वारेमाप आतषबाजीमुळे मानसिक स्वास्थ्य बिघडल्याने बर्याच जणांना रात्रीची शांत झोप येणे मुश्किल बनते. नरकासुर प्रतिमांच्या मिरवणुकीवेळी निर्माण होणार्या गोंगाटामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेला माणूस फार चिडखोर होतो. अपचन, अधूनमधून मळमळणे, कामात निरुत्साह, हृदयविकार, श्वनससंस्थेचे विकार आणि दृष्टीवरती दुष्परिणाम उद्भवतात, त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाच्या कार्यात अनियमितता येते. अचानकपणे मोठ्या फटाक्यांचा वा दादा बॉम्बच्या स्फोटांचा तीव्र आवाज एखाद्याच्या कानांवर पडला तर भीतीमुळे त्या व्यक्तीची बुबुळे विस्फारित होतात, त्वचा निःतेज होते, पोटात कळा येतात, रक्तातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. स्नायूंमध्ये ताठरता येते, मानसिक विक्षोभ व ताणतणाव निर्माण होतो.
‘रॉक ऍण्ड रोल’च्या संगीताचा नृत्यासाठी काही ठिकाणी नरकासुराच्या मिरवणुकीच्या प्रसंगी वापर करतात आणि त्यामुळे अशी मिरवणूक जेथून जाते तेथील लोकांना विनाकारण ध्वनिप्रदूषणाच्या संकटाला सामोरे जावे लागते. प्राग्य ज्योतिषपुराच्या दैत्यसम्राट नरकासुराने देशोदेशीच्या कित्येक राजकुमारींना आणि रूपवान स्त्रियांना बंदिवान केले होते. त्या सर्व अबलांची मुक्तता श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून केली होती. त्यामुळे श्रीकृष्णाने देत्याचा वध केल्याबद्दल त्याची गौरव मिरवणूक काढण्याऐवजी आज नरकासुराचा बाऊ करण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे.
मुंबईत दिवाळीला दिव्यांऐवजी विजेच्या रोषणाईचा लखलखाट असतो. फटाके आणि दारूकामाची आतषबाजी होते. मुंबईचा हाच प्रकार गर्भश्रीमंत आणि नवश्रीमंतांनी गोव्यात आणला असून गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत असे प्रकार येथे वाढले आहेत. दारूकामाच्या आतषबाजीमुळे पर्यावरणाला घातक ठरणार्या रासायनिक घटकांचा हवेत आणि परिसरात प्रादूर्भाव होऊन असंख्य लोकांच्या आरोग्यावरती दुष्परिणाम होत आहेत. फटाक्यांची आणि दारूकामाची आतषबाजी करणे हे नवश्रीमंतांचे पैसा, प्रतिष्ठा यांचे प्रतीक ठरल्याने सध्या दिवाळीच्या प्रसंगी अशा प्रकारांत वाढ झालेली दृष्टीस पडते. नरकचतुर्दशीचा दिवस हा गोव्यातल्या रस्तोरस्ती अधिकाधिक गडबडगोंधळ निर्माण करणारा, कलहांना निमंत्रण देणारा ठरलेला आहे. नरकचतुर्दशीच्या एक दिवस अगोदर धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंती येते. परंतु आयुर्वेदाशी निगडित मंडळी वगळता अन्य लोकांना या दिवसाचे विस्मरण झालेले आहे. परंतु नरकासुराशी निगडित असलेल्या नरकचतुर्दशीचा थाट मात्र काही औरच असतो. आज आपली दिवाळी दिवसेंदिवस आपल्या परिसरातल्या पर्यावरणाला, वन्यजिवांना त्रासदायक ठरू लागलेली आहे. केवळ वृद्ध, आजारी, गरोदर महिलांनाच नव्हे तर सर्वसामान्य जनतेलाही त्याचे त्रास होऊ लागलेले आहे. त्यासाठी आपली दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याची प्रतिज्ञा करून आपण त्याप्रमाणे आपला व्यवहार करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे चांगले परिणाम केवळ परिसरावरतीच नव्हे तर आपणावरतीही होणार आहेत. परंतु त्याची सुरुवात करणे तातडीची गरज आहे.
दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची मोहक आणि शिस्तबद्ध आरास. पूर्वीच्या काळी निसर्गात उपलब्ध असणार्या खष्टाच्या फळापासून घरोघरी तेल काढले जायचे आणि हे तेल मातीच्या पणत्यांत घालून पेटवलेले ते छोटे दिवे मानवी मनाला खरं तर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा देत होते. जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता त्याकाळात अशा असंख्य पणत्यांच्या रोषणाईने लोकमानसाला सत्प्रवृत्तीची प्रेरणा मिळत असे. दिवाळी जवळ येऊ लागली म्हणजे बांबूच्या कामट्या काढून त्यांच्यापासून आकाशकंदील केला जायचा. असे आकाशकंदील बाबूंच्या लांबलचक काठ्यांवरती लटकवले जायचे. त्यांची शोभा पाहून पितरांना समाधान मिळते ही लोकश्रद्धा दृढ होती. घरोघरी नवधान्यांपासून पोहे तयार केले जायचे आणि दिवाळी दिवशी गोड, तिखट, बटाटे पोहे असे प्रकार आपला आनंद द्विगुणित करत असत. आज दिवाळीसाठी आपण विकता फराळ, तेल, तूप, मलईयुक्त मिठाई यांचा वापर करत असल्यामुळे आरोग्याला असंख्य समस्या निर्माण करतो आहोत याची आपणाला जाणीव नसते. त्यासाठी आज पर्यावरणस्नेही दिवाळी साजरी करण्याचे व्रत अंगिकारले पाहिजे.
प्लास्टिकचे मुखवटे, धातूच्या तारींचा वा लोखंडी सांगाडा टाळून बांबूच्या कामट्यांपासून तयार केलेला सांगाडा साध्या, टाकाऊ कागदांनी कल्पकरीतीने तयार करून रंगवणे शक्य आहे. फटाके, दारूकामाची आतषबाजी टाळून, ध्वनिक्षेपकाचा अथवा कर्कश संगीताचा वापर टाळून दिवाळीचा सण साजरा करता येतो. नरकासुराऐवजी आपण प्रतीकात्मकरीत्या केरकचरा अल्प प्रमाणात जाळून नरकचतुर्दशी साजरी करू शकतो. पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थांचे सेवन करून हा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मुघल कारकिर्दीत सम्राट अकबर दिवाळीला महालात सर्वत्र दीपोत्सव करत असे याचे उल्लेख ‘ऐने अकबरी’ ग्रंथात आढळतात. दिवाळीत दीपोत्सव करून आयुष्यवृद्धीचा एक धागा जोडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. जी अविवेकाचा काळा अंधार नाहीसा करते आणि विवेकाचे, ज्ञानाचे दीप उजळते, ती ‘योगियांची दिवाळी’ आहे असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे हे ध्यानात ठेवणे महत्त्वाचे आहे.
मी अविवेकाची काजळी| फेडुनि विवेकदीप उजळी|
ते योगिया पाहे दिवाळी| निरंतर॥