पर्यटन हंगामाला धडाक्यात सुरुवात; रशियातून 120 पर्यटक गोव्यात

0
14

आदरातिथ्याने पर्यटक भारावले; आजपासून पुढील तीन दिवसांत आणखी 600 पर्यटक येणार

राज्यातील पर्यटन हंगामाला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात झाली असून, या हंगामातील पहिले खास चार्टर विमान रशियातील नोवोसिबिर्स्क येथून मोपा-पेडणे येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल दाखल झाले. या खास विमानातून 120 विदेशी पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान, पुढच्या तीन दिवसांत आणखी 600 रशियन पर्यटक गोव्यात दाखल होणार आहेत.

विदेशी पर्यटकांच्या स्वागतासाठी विमानतळावर खास सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विदेशी पर्यटकांना गोव्याच्या समृद्ध आदरातिथ्य आणि संस्कृतीचे दर्शन घडवत उत्साहात स्वागत केले. या कार्यक्रमात समई नृत्य, घोडे मोडणी, धनगर नृत्य आणि ब्रास बँडचे सादरीकरण करण्यात आले. विदेशी पर्यटकाच्या स्वागत समारंभाला पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, उपसंचालक जयेश काणकोणकर व इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
राज्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात होत आहे. गोवा राज्य विदेशी पर्यटकांचे स्वागत करण्यास सज्ज आहे. गोवा पर्यटकांसाठी एक पसंतीचे जागतिक ठिकाण म्हणून आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. राज्यात भेट देणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षा, उत्तम सुविधा आणि मनमोहक अनुभव मिळेल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी म्हटले आहे.

आणखी खास विमाने येणार

पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रशियातून पर्यटकांना घेऊन येणारी आणखी काही खास विमाने येणार आहेत. त्यात 3 ऑक्टोबरला नोवोसिबिर्स्क (रशिया) येथून सुमारे 150 पर्यटक घेऊन दुसरे विमान मोपा विमानतळावर दाखल होण्याची शक्यता आहे. 4 ऑक्टोबरला येकातेरीनबर्ग (रशिया) येथून 158 प्रवासी घेऊन विमान मोपा येथे उतरणार आहे. तसेच, 5 ऑक्टोबरला मॉस्को (रशिया) येथून 296 प्रवासी घेऊन एक विमान मोपा विमानतळावर दाखल होणार आहे.