पर्यटन क्षेत्राशी संबंधितांनी कायदा हातात घेणे टाळावे

0
10

पोलीस महासंचालक आलोक कुमार यांचे आवाहन; अनुचित घटनेविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याची सूचना

राज्यातील पर्यटन हंगामाला गालबोट लागेल अशा प्रकारचे कोणतेही कृत्य पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, नाईट क्लब, रेस्टॉरंट आदी आस्थापनांनी करू नये. या आस्थापनांनी कायदा हातात घेण्याचे टाळावे आणि कोणत्याही घटनेची तक्रार थेट पोलिसांकडे करावी. पोलीस सदर प्रकरण योग्य पद्धतीने हाताळतील, असा सल्ला पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमानंतर काल पत्रकारांशी बोलताना दिला. वागातोर येथील एका नाईट क्लबमधील पर्यटकांना मारहाण आणि रेंट-अ-कार चोरीनंतर तरुणाचा खून या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राज्यातील हॉटेल, नाईट क्लब, रेस्टॉरंट, शॅक व्यावसायिकांनी बेशिस्त वर्तन करणाऱ्या पर्यटकांशी व्यवहार करताना कायदा हातात घेऊ नये आणि गरज पडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. राज्यातील पर्यटन हंगामाच्या सुरुवातीला वागातोर येथे घडलेल्या पर्यटक मारहाण प्रकारणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील व्यावसायिकांची बैठक घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेबाबत योग्य सूचना करण्यात येणार आहेत. एका नाईट क्लबमध्ये पर्यटकांना मारहाण प्रकरणी हणजूण पोलिसांनी संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.

ओशियन मॅन स्पर्धेशी कुठल्याही
आयपीएस अधिकाऱ्याचा संबंध नाही

करंजाळे मिरामार येथील समुद्रकिनाऱ्यावरील सरकारी मान्यता न घेता आयोजित ओशियन मॅन जलतरण स्पर्धेच्या आयोजनामध्ये राज्यातील कुठल्याही आयपीएस अधिकाऱ्यांचा संबंध नाही, असेही पोलीस महासंचालकांनी स्पष्ट केले. राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी करंजाळे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदा आयोजित ओशियन मॅन स्पर्धेला एक आयपीएस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला होता. आपण याबाबत चौकशी केली असून, त्यात राज्यातील कुठलाही आयपीएस अधिकारी गुंतलेला नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

तपासणी सुविधा उपलब्ध करणार
बनावट कागदपत्रे सादर करून वाहन भाडेपट्टीवर घेण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जलदगतीने कागदपत्रे तपासणीची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून वाहतूक खात्याच्या सहकार्यातून प्रयत्न केला जाणार आहे, असेही पोलीस महासंचालकांनी सांगितले. बनावट कागदपत्रे सादर करून एखादा पर्यटक वाहन भाडेपट्टीवर घेतल्याचे आढळून आल्यास त्याबाबत पोलीस यंत्रणेला माहिती द्यावी. एखाद्याला कार चोरून नेताना पकडले तरी सुध्दा कुणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘त्या’ दोन पोलिसांची चौकशी सुरू
उगवे पेडणे येथील गोळीबार प्रकरणातील दोन आयआरबी पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असून, त्यांच्यावर आवश्यक कारवाई केली जाणार आहे. तसेच नावेली-मडगाव येथील एका तरुणाला मारहाण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक दोषी आढळून आल्यास त्याच्यावर सुध्दा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.